Wednesday, June 18, 2014

ह्याला जीवन ऐसे नाव…

ह्याला जीवन ऐसे नाव…2

माझं सारं बालपण तसं गावीच (खेडेगावी) गेलं. शालेय दिवसांत, मी सवंगड्यांबरोबर बालपण  आनंदत होतो.  खेड्यातले खेळ आणि तेही गरिबांचे… मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद देत असत.  त्या खेळाला आजच्यासारखी पैशाची वलयं नव्हती… श्रीमंतीचा थाट नव्हता…जाती पातीचा स्पर्श नव्हता… की वेळेची बंधनं नव्हती… खरं तर, खेड्यातलं बालपण म्हटलं की, हसणं-खिदळणं… बागडणं… हुंदडणं… खेळणं… मस्ती… ह्यातच दिवस व्यतीत व्हायचे. अभ्यासाला माझ्या कडून विशेष महत्वच दिलं जात नव्हतं.
तो काळही तसाच… लहान वयात आयुष्याची फार मोठी स्वप्नं ना कोणी दाखविली, ना आम्हाला ती बघण्याची संधी मिळाली. ‘तू भविष्यात कोण होणार?’ हा अवजडवजा मनाला न पेलवणारा प्रश्न शिक्षकांकडून विचारल्या नंतर, रोज आपली जुनीपुराणी… मोडकी-तोडकी सायकल घेऊन, तर कधी पायी, नित्याने घरोघरी पत्रं पोहोचवणारा… आपल्याला जवळचा वाटणारा… सुख-दुःखात सहभागी होणारा, खाकी गणवेशातील- आपला “पोस्टमन मामा किंवा काका” हेच आपलं भविष्याचं साकार होणारं स्वप्नं (!) समजून, मी मोठा झाल्यावर पोस्टमन होणार! ही व्यक्त होणारी निरागस इच्छा अगदी निखालसपणे बोलून दाखवायचो.   

बुद्धीने तल्लख पण अभ्यासातील एकाग्रता कमी, असं माझं शालेय जीवन भरधाव वाऱ्यासारखं निघून गेलं. ती विटी-दांडू… त्या सूर-पारंब्या… तो सूरपाट्यांचा खेळ… स्वतःच बनवलेले  भोवरे… अल्युमिनीयमच्या तारांनी बनवलेली गोल चक्राकार गाडी... लपाछपी… भातुकलीच्या खेळातील गमती-जमती… रात्रीच्या वेळी झोपताना आजी आजोबांच्या त्या रसाळ, ऐकायला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी… अंथरुणावर पडल्यावर ती अंगाई गीतं… जात्यावर दळण दळताना आईच्या हाताला हात देत फिरवलेलं जातं… अन त्यासोबत तिच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न करत गायलेल्या पहाटेच्या ओव्या… या सगळ्याबरोबर त्या खेड्यातल्या मातीत कणाकणाने माझं व्यक्तित्व घडत गेलं… जीवन म्हणजे काय ? आयुष्य ते काय असतं ? हे यक्ष प्रश्न कधी पडलेच नाहीत त्या वयात.  कारण जे आयुष्य मी जगत होतो त्यापेक्षाही काही वेगळं आयुष्य  असतं, याची जाणीवच नव्हती.  मी आणि माझ्या सभोवतालच्या जीवनाचा रंग एकच होता. जात, पात, धर्म जरी वेगळा, तरी थोड्या फार फरकाने आयुष्य, त्याचा जीवनप्रवास मात्र सारखाच…

‘मानवी जीवनांत अनन्य साधारण महत्व कशाला असेल तर ती ‘पोटाची खळगी’. माणसाचे  हात पाय चालतात ते यासाठीच…  जीवन प्रवास कितीही खडतर असला तरी, करावा लागतो तो यासाठीच…’ आणि म्हणून अशाच जीवन प्रवासातला मी एक प्रवासी झालो…

कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून मी निघालो मुंबापुरीला…  नोकरीच्या शोधात...  अडीचशे तीनशे किलोमीटर दूर…  आपल्या वीतभर पोटाची खळगी भरणे हा खरा उद्देश… त्यानंतर कौटुंबिक जबाबदारी.  ते वीतभर पोट आयुष्यात काय काय शिकवून जातं ! कधी जगायला शिकवतं… तर कठीण प्रसंगी मरायला प्रवृत्त करतं… दुःखामध्ये सुख पाहायला शिकवतं, तर हर्षामध्ये संयम राखायला… खेळातील हार पचवायला शिकवतं… तर विजयामध्ये आकाशाला टेकलेल्या हाताबरोबरच, पायांना जमिनीवर राहायला शिकवतं… कधी सहानुभूती घ्यायला, तर कधी गरीबीवर प्रेम करायला शिकवतं… आणि म्हणूनच मला गरिबीची कधी लाज वाटली नाही; की कधी दुःख झालं नाही. कठीण परिस्थितीत, वेदनेच्या काळात सभोवतालच्या जगाकडे पाहायला शिकवलं… त्याचीच परिणती म्हणून मी मित्रांबरोबर आदिवासींचं जीवन अनुभवायला गेलो… अर्थात हातात कॅमेरा घेऊनच…

मित्राने निश्चित केलेल्या कार्यक्रमाला ज्या उत्कंठतेने मी होकार दिला, त्यातली ती तळमळ माझी मलाच जाणवत होती. कार्यक्रम होता जव्हारच्या आदिवासी पाड्यांना भेट देण्याचा. आपल्या नित्याच्या जीवनातून मनाला भावलेलं विश्व आणि त्यासाठी काहीतरी करण्याची उमेद, माणसाला सामाजिक कार्याला वाहून घ्यायला प्रेरित करते. तशाच विचाराने मित्राच्या सुचनेनुसार आम्ही आदिवासी पाड्यातील लहान मुलांसाठी खाऊ घेऊन जाण्याचे ठरवले. आमचा दोन दिवसांचा कार्यक्रम होता. त्यामुळे विवंचित मनाने आम्ही प्रवासास सुरुवात केली.  जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. मुख्यालयापासून   केवळ १३८ किमी अंतरावर असूनही  समाजातील उदासीनता, मागासलेपणा नष्ट झाला नसल्याचं ते ज्वलंत उदाहरण. पाड्यातील मानवी जीवन, तेथील लोकांचे दैनदिन व्यवहार याबद्दल थोडी उत्सुकता लागलेली. ऐकलेले आणि प्रत्यक्षातील जीवन यातला फरक आज उमजून घ्यायचा होता…मित्राकडून तेथील भोगौलिक परिस्थितीची माहिती मिळालेली होती. त्यानुसार तयारी केली गेली. आमच्या जेवणाची सोय तिथे आमच्या पद्धतीने होणे शक्य नव्हते म्हणून भुसारी मालाचं गाठोडं बरोबर नेण्याचं  ठरलं. त्यात  ज्वारी, तांदूळ, तेल, पालेभाज्या, फळभाज्या, चटणी, कांदा-लसूण इत्यादी जिन्नस काखोटीला मारले. ठाण्यावरून एस टीने जव्हार आणि नंतर पुढे जुनाट जीपने पाड्यापर्यंत प्रवास.. एका जीपमध्ये बारा ते पंधराजण. त्यातच सर्वांचे घरगुती सामान. आमच्या कॅमेऱ्यासोबत ह्याss मोठाल्या सामानाच्या पिशव्या.  पश्चिम दिशेला काळ्या-पांढऱ्या ढगांनी आपलं सामर्थ्य पणाला लावून रविराजाला झाकोळून टाकण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता.  त्यामुळे वातावरणात उष्मा खूप जाणवत होता. त्या वातावरणात जीव गुदमरल्यासारखा झाला होता. मेटाकुटीस आलेला जीव केव्हा एकदा त्या पाड्यातील जमिनीवर उतरतोय असं झालं होतं. एकदाचे त्या पाड्याच्या कोपऱ्यावर पायउतार झालो अन सामानाची कसरत करत इच्छित स्थळी पोहोचलो. 

एका छोट्याश्या खोलीत आमची राहायची व्यवस्था केली होती  ती जागा त्या पाड्याच्या सरपंचांची होती. शिवाय आमच्या जेवणाची सोय सुद्धा त्यांच्याच घरातल्या जेवणाने होणार होती. त्यामुळे राहायचा आणि जेवणाचा प्रश्न सहज सुटल्याचं समाधान होतं.  आम्ही संध्याकाळच्या उष्ण वातावरणातून बाहेर पडण्यासाठी, पिशवीतल्या बिसलेरीच्या थंड पाण्याचा चेहऱ्यावर शिडकावा मारला. प्रवासातील शिल्लक राहिलेले खाण्याचे पदार्थ संपवून बाहेर मोकळ्या, निर्जन रस्त्यावरून दूरवर नजर खिळवत उद्याच्या कार्यक्रमाविषयीच्या गप्पा सुरु होत्या. एव्हाना त्या ढगांच्या वेढ्यातून कशी बशी जागा काढत, सूर्याची ती कोमल किरणं हिरव्यापिवळ्या गवताने आच्छादलेल्या जमिनीवर पसरली होती. आमच्या खोलीच्या समोरील मोकळ्या जागेत, दुपारच्या वेळी अनाहूतपणे पडलेल्या तुरळक सरींच्या आगमनाने ओल्या झालेल्या मातीत, पाड्यातील लहान मुलं घसरगुंडीची मनमुराद मजा लुटत होते. त्यांचं ते खेळातलं रममाण होणं, मला पुन्हा एकदा माझ्या बालपणात घेऊन गेलं…

आम्हीही सवंगड्यासोबत     घराबाहेर   खेळ  खेळत असायचो...  म्हातारीचे पंख …  खूप हलके.... हळुवार...  हवेत तरंगत असायचे… हाताला  लागत  नाही  म्हणून  उंचउंच  उड्या मारून पकडण्याचा निकराने प्रयत्न करायचो…  तरी हाताला लागत नाही,  वर-वर … पुढे-पुढे  जाताहे असं  दिसल्यावर त्याच्या मागे मागे धावत जायचं... मग पायाखाली दगड काय, चिखल काय,  काटे काय...क़शाचिही   जाणीव  नाही व्हायची... कारण माहित आहे ?    आपण   नकळत  त्या पंखाच्या हळुवारपणावर  बेफाम,  बेधुंद  प्रेम  करायचो…  कधी कधी ते पंख हातात मिळायचे;  तर कधी कधी  खूssप  दूssरपर्यंत   पाठलाग  करूनसुद्धा  ते हाती  नाही लागायचे...  उंच उंच  आकाशात उडालेलं  पहायचो ते…  खाली येत नाहीसं पाहिल्यावर  जड  पावलांनी गेल्या मार्गाने परत… पदरी निराशा… कधीकधी वाटतं… आपलंही आयुष्य त्या हातातून निसटत असलेल्या पंखासारखं तर नाही ना ? आपण सुखाचा शोध घेत असताना वणवण भटकत मात्र राहतो दुःखाच्या छायेत… तुलनात्मक जीवन जगताना अवतीभोवती असलेले सुखाचे क्षण आपल्या डोळ्यांना दिसेनासे होतात… सारं आयुष्य असंच  व्यतीत होतं; पण हाती मात्र विवंचना, दुःख,  मनस्ताप ,पश्चाताप यापेक्षा वेगळं काहीच लागत नाही… सुखाचे धागे दुःखाच्या विचारांनी गुंफत बसतो अन आयुष्य वैराण वाळवंटासारखे करून टाकतो… या प्रयत्नात आपण सभोवतालचं विश्व  विसरून जातो… 

पूर्वेकडचं निळसर आकाश आता रजनिकांताच्या प्रतीक्षेने काळवंडलेलं दिसत होतं… सगळीकडे शांतता…  मोकाट फिरणारे दोन-तीन कुत्रे सोडले तर  रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नव्हते. आता मात्र आमचा आदिवासी पाड्यातील जीवन प्रवास सुरु झाला होता… हातपाय धुवायला पाणी नसल्याने ते आणण्यासाठी बादल्या घेऊन आम्हाला अंधारात घराबाहेर पडावं लागलं.  हातात छोटी विजेरी घेऊन दोनशे मीटरवर एका ओघळीच्या काठी असलेल्या बोरींगवर गेलो. त्या थंड पाण्याने ताजेतवाने झालो व थोडी विश्रांती घेतली. जेवणाचे सर्व जिन्नस देऊनही जेवणाचा स्वाद निराळाच होता. मेणबत्तीच्या प्रकाशात कसेतरी दोन दोन घास खाऊन  जेवण उरकले. अन सकाळच्या तयारीसाठी लवकर झोपून गेलो…

आदिवासी वस्तीतील आमचा सकाळचा प्रवास सुरु झाला… मुलांसाठी आणलेला सगळा खाऊ बरोबर घेऊन घराबाहेर पडलो.  एका पाड्यात पोहोचतो न पोहोचतो तोच मुलांचा हाsss मोठा गलका. ती छोटी छोटी बाळं फेर धरल्यासारखे सभोवताली जमा झाली. उघडी… नागडी… पोट पुढं आलेली … हातापायाच्या काड्या झालेली… पण चर्येवर जरासुद्धा त्या परिस्थितीचं प्रतिबिंब नाही. वेगळ्या जगातून ही माणसं आली आहेत ह्या नजरेनं ती आमच्या कडे पाहत होती. उत्कंठा… जल्लोष… आनंद… सारं सारं काही त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं… खाऊचे  वाटप करताना त्यावर सगळ्यांच्या उड्या पडत होत्या. जी लहान-सान पोरं घाबरून घराबाहेर पडली नव्हती त्यांना त्यांच्या आया खाऊ आणण्यासाठी आमच्या दिशेने धाडत होत्या. काही लहान  मुली आपल्या लहान भावंडांना कडेवर घेऊन त्या घोळक्यात सामील झाल्या होत्या. हेही एक परिस्थितीचं विदारक चित्र आम्हाला पाहायला मिळालं! त्यांना खुश करून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपला…


 आनंदाने फुलून गेलेले त्यांचे चेहेरे पाहून शरीरातला माणूस जागा झाला. तिथल्या वडीलधाऱ्यांची जातीने विचारपूस करत होतो. काही मंडळी मित्राच्या  परिचयाची म्हणून त्यांच्यात मिसळायला  विशेष कष्ट सोसावे लागले नाहीत आम्हाला. आमचा डेरा तसाच दुसऱ्या पाड्यात निघाला. सगळा प्रवास चालतच होता.  आदिवासींसाठी काम करणाऱ्या एन जी ओ मधील एक कर्मचारी आमच्या मदतीला होता.  त्यामुळे   कॅमेरा सोडला तर  इतर पिशव्यांचं ओझं त्याच्या मोटार साइकलवर ठेवूनच आमचं मार्गक्रमण चालू होतं.  प्रत्येक कुटुंबाला भेट देत होतो… त्यांचं जीवन अगदी जवळून बघत होतो… घरात जावून त्यांच्या जीवनाची परिभाषा समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो. वितभर पोटाची खळगी भरायला सुद्धा पुरेसं अन्न नाही… अंगभर वस्त्राला पारखी झालेली ती मंडळी, अशाच समाजसेवी संस्थांकडून मिळालेल्या कपड्यांनी आपलं अंग झाकाताना दिसत होती.… छोट्यातील छोटी भेट सुद्धा त्यांना आसमानाएवढी वाटत होती… मनीचे स्वप्न साकार झाल्याची भावना प्रकटलेली दिसली… कसं  आयुष्य असतं  माणसाचं ?  केवळ मुलभूत गरजा जरी भागल्या तरी सामान्य माणूस समाधानानं जीवन कंठीत असतो. पण इथं फक्त सामाजिक बांधिलकीनं, एकमेकांना साहाय्य करून बांधलेल्या, गवताने शाकारलेल्या कुडाच्या झोपड्या, हाच निवारा होता. पण मग अन्न-वस्त्राचं काय?

 आमच्यासोबत चालत असलेली मंडळी, त्यांच्या प्रामणिकपणाचा, गरिबीचा बळी कसा जोतोय याची उदाहरणं ऐकवत होती. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ती मंडळी शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवण्याची आपली नैतिक जबाबदारी समजून पार पाडण्याचं सफाईदारपणे नाटक करतात. योजनांतर्गत मिळालेला पैसा हा राजा हरीश्चन्द्राच्या कथेतील, रांजणातील पाणी होतं ते.  रांजणात कितीही पाणी भरलं तरी रांजण मात्र रिकामाच. तद्वतच  आदिवासींच्या कल्याणार्थ कितीही योजना राबविल्या… त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला…. तरी आदिवासीं पर्यंतच्या त्या पैशाच्या प्रवासाला गळती लागलेली असते… ह्या प्रवासातील दहा टक्केतरी पैसा शेवटच्या स्थानापर्यंत सुखरूप पोहोचतो की  नाही ही शंकाच वाटते… सामाजिक सुधारणा… भौगोलिक सुधारणा… सांस्कृतिक सुधारणा… अशा प्रकारच्या योजना आणि त्याबद्दलच्या घोषणा,  कानांना ऐकायला सुखद आणि आशावादी वाटल्या, तरी त्या प्रत्यक्षात धरतीवर  लाभार्थीसमोर अवतरल्या तरच, त्याचा मूळ उद्देश सफल झाल्यासारखा वाटेल आणि दिसेलही… पैशाच्या लोभापायी आजकाल सगळी मंडळी माणुसकीला तिलांजली देताना दिसतात. ज्यांचा, ज्या गोष्टींवर  अधिकार आहे तो हिरावून घेण्याचा हक्क ह्या मंडळींना दिला कोणी ? या समाज जीवनात अशाही प्रकारे ‘माणूस’ नावाच्या प्राण्याचं शोषण केलं जातय आणि तेही राजरोसपणे... हे सगळं दिःड्मुठ होऊन आपण पाहत राहतो… हतबल होतो… आवाज उठवण्याचा प्रयत्न  केला तरी तो दाबला जातो… त्यामुळे जैसे थे अवस्था… या विचारांनी मन कासावीस होतं… तेवढ्यापुरतं अंगातलं रक्त सळसळून येतं… पण पुन्हा सारं शांssत…



परिस्थितीचा मागोवा घेत दुसरा, तिसरा पाडा करत गेलो. दुपारची वेळ...  जवळपास दीड दोन तासांच्या त्या डोंगराळ भागातल्या प्रवासाने आमची पुरी दमछाक झाली होती. जेवणासाठी परत मुक्कामाच्या ठिकाणी परतणे शक्य नव्हते. मध्येच तुरळक जलधारा बरसल्याने उष्माही चांगलाच वाढला होता. पाड्यातल्या मंडळींना जेवणाच्या सोयीबद्दल विचारले असता तशी सोयच नव्हती. मात्र त्यातल्या एकाने विचारणा केली 'साहेब दुपराचं जेवण माझ्याच घरी घ्याल का ?' आमचा होकार नकार ऐकायच्या अगोदरच  'चला तर मग जेवायला'  म्हणून आमच्यापुढे स्वतःच्या घरी गेला. त्याच्या मागून आम्ही… जेवणाची सोय होतेयसं पाहून आनंदून गेलो. कॅमेरा बाहेर ठेवून आम्ही जेवायला बसलो. एका थाळीत उकड्या तांदळाचा भात आणि उकडलेली चवळी…  बस्स... ते बघूनच थोडं विचित्र वाटलं. पण इलाज नव्हता.  समोर आलेलं ब्रम्हान्न होतं आमच्यासाठी… दोन-चार घास, मिठाचा नि पाण्याचा आसरा घेत घशाखाली कसे बसे उतरवले. आमच्यावर दाखवलेल्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो होतो… त्यांना दोन-चारशे रुपये देऊ केले. मनोमन त्यांचे आभार मानले. परतत असताना डोक्यात विचार चक्र सुरु झाले… माणुसकीचा झरा होता तो ! त्याला पैशाची श्रीमंती लागत नाही…

 शहरीकरणामुळे माणूसपण हरवलेली आम्ही माणसं, स्वतःच्या मस्तीत, स्वतःच्याच वलयात स्वःताला गुरफटून घेत असतो. परिणामी माणूसकीतलं देवपणच विसरून गेलोय… अशा सामाजिक प्रश्नांच्या विचारचक्रामधुनच, जव्हारच्या उत्तरेकडील, नासिक हद्दीलगतच्या पाड्यात जायचं  ठरवलं. डोंगर दऱ्यातून चालून चालून दमछाक झाली असली तरी आणखी काही वेगळं चित्र पाहायला मिळतंय का या उत्सुकतेने भराभर पाउलं उचलत आम्ही पाड्यात पोहोचलो. समोर एक चित्र दिसत होतं. त्या पाड्यात एक सायकलस्वार आमच्या अगोदर पोहोचला होता. त्याच्या भोवती लहान मुलांचा, बायांचा गराडा पडला होता. कारण स्पष्ट होत नव्हते.  न राहवून आम्ही जवळ जाऊन पाहिलं, तर तो भंगारवाला होता…

 बाजूलाच एका लहानग्याच्या हातात एक पाव दिसला. तो पाव खात असताना, त्याच्या उघड्या पोटावर पावाचे लहान लहान तुकडे पडलेले दिसले. त्या पावाला वरच्या बाजूस काहीतरी लागलं होतं. पावावर, पोटावर, चेहऱ्यावर माशा घोंगावताना दिसत होत्या. ते ओंघळवाणे दृश्य पाहून मन चलबिचल झालं.  तो भंगारवाला अन पाववालाही होता.  काचेच्या दारूच्या बाटल्यांच्या बदल्यात तो पाव विकत होता. पैसा नाही… पाणी नाही… अंगावर कपडे नाहीत… खायला अन्न नाही… जे अन्न मिळेल ते सकस आहे की नाही हे माहित नाही… मग कुपोषण होणारच !  "कुपोषणाचे बळी” म्हणून दिवसागणिक वर्तमानपत्रात ठळक अक्षरात बातम्या छापल्या जाणार… पण याचं कोणाला सोयरसुतक…? जो तो आपल्याच धुंदीत मश्गुल. डोंगराळ भागातल्या त्या कुटुंबांच्या मालकीच्या शेतजमिनीचे लहान लहान तुकडे! काय पिकणार आणि काय पिकवणार ?  निसर्गावरच अवलंबून सगळं… जे पिकेल ते खायचं… असेल तेवढंच खायचं… अशी पद्धतीने गुजराण. आपल्या संसाराला हातभार लागेल म्हणून काही रोजगार करायचा तर त्याचा मोबदला कुठे ? तो कष्टाचा मोबदला त्या आदिवासींच्या ओंजळीत नाही तर ठेकेदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या खिशात… निबर मनाचे लोकच गबर होत असतात… अशा जगात कष्टाचं मुल्य शुन्य असतं… गाळलेला घाम व्यर्थ असतो… सामाजिक, शैक्षणिक सुधारणा कशा होणार ? शाळा नाही… शाळा असेल तर शिकवायला शिक्षक नाहीत… मुलांविना ओसाड पडलेल्या शाळा पडझडीला आलेल्या दिसल्या. दूssर दूरवर, डोंगराळ भागातल्या शाळांमध्ये आठवड्यातून एक दोन दिवसच शिक्षक हजेरी लावणार तर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार कसा होणार ?  हे सगळे अनुत्तरीत प्रश्न, त्या बालकांचं भविष्य धुसर करत होते हे मात्र निश्चित.

 पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा, त्या पाड्यात चालवली जात होती. मुलींच्या वयाच्या अठरा-एकोणिसाव्या वर्षीच, त्यांच्या झोपडी बाहेर पाच पाच मुलं रांगताना दिसत होती. त्या बिचाऱ्या कन्यांचा तरी काय दोष ? पुरुषप्रधान संस्कृती, परंपरा आणि पंचायत… याला बळी पडलेल्या त्या अबला… एनकेन प्रकारेन शिक्षण झालं तरी पाडा सोडून जाणार कुठे? तिथेच… त्याच जंजाळात आयुष्य वेचायचं… ज्या मातीत जन्म घ्यायचा, त्याच मातीत ठरल्या पद्धतीने जीवन कंठत राहायचा… स्वःताच्या जगात बदल नाही की बाहेरच्या जगाचा स्पर्श नाही… तरीही त्या लोकांच्या नजरेत आशावाद ठासून भरला होता. आमच्या बेचैन झालेल्या मनाला त्यांचा आशावाद हाच एक सुखावह किरण वाटत होता…

दुपार टळून गेलेली. आम्ही एका दिवसांत पाहिलेलं, अनुभवलेलं गरिबीचं दारूण चित्र समोर उभं राहिलं होतं. त्याच चित्राच्या झाडा-झुडुपातून वाट काढत आम्ही डांबरी सडकेवर येउन पोहोचलो… चालून चालून पायांचा पिट्टा पडला होता. छायाचित्रणाला तसा वाव नव्हता म्हणून कॅमेरे आत ठेवले होते.  ती पाड्यातली गंभीर परिस्थिती, मळभ बनून आकाशात पसरली होती. गुरांना चरायला घेऊन आलेली पोरं ठोरं रस्त्यात मस्ती करत होती.  हातातल्या काठ्यांवर  चढून लांब उड्या घेणं…. गाई-म्हशींच्या  पाठीवर बसून गाणी गुणगुणत एकमेकांच्या खोड्या करणं… गुरांना पळविण्यासाठी त्यांच्या शेपटीला चावा  घेणं इत्यादी मजेशीर प्रकार चालले होते. दिवसभराच्या शेतीतील कामातून थोडीशी उसंत मिळालेली मंडळी, रस्त्याच्या कडेला येऊन झाडाखाली शांत बसली होती. तसेच पुढे येताना दूरवर रस्त्याच्या कडेला एक बाई 


उभी असलेली आम्हाला दिसली.  तिच्या बाजूलाच खाली आडवं पडलेलं लहान पोर होतं. ते पाहून आमचे डोळे विस्मयचकित झाले.  ह्या वेळेस असं चित्र कसं  असू शकतं ? ती घटना होती ?  अपघात होता ? की  विश्रांती होती ? हे कळायला मार्ग नव्हता…

फोटोग्राफर म्हटला की आनंद असो, दुःख असो,  अपघात असो, की  मयत असो  तिकडे धावलाच पाहिजे. त्याही परिस्थितीत थोडं तसंच झालं… आमचा कॅमेरा बाहेर आला एक-दोन इमेजेस क्लिक केल्या आणि मग जवळ गेलो. ते बाळ रस्त्यावर झोपल्याचं कारण विचारलं असता, ‘सकाळपासून त्याच्या अंगात ताप भरला होता. घरात एकट्याला कसं ठेवायचं  म्हणून सोबत घेऊन आले होते.  आई-वडील दोघेही शेतमजूर. आज काम नाही केलं तर मजुरी कशी मिळणार ?  कोणीतरी काम केलंच पाहिजे ह्या विचाराने, ती बिचारी मुलाला कसेबसे कडेवर घेऊन शेतातून बाहेर रस्त्यावर आली होती. ताप पाहिला तर एकशेचारच्या वर. आम्ही कपाळाला हात लावून पाहिले.  चटके बसत होते. ते बाळं बेशुध्दच होते. कदाचित ताप डोक्यात गेला आहे की काय ? या विचाराने आम्ही हवालदिल झालो होतो. त्या वेळेस त्याला द्यायला कोणत्याच प्रकारचं औषध नव्हतं.  मग त्याचा ताप उतरणार कसा ? तो मेंदूपर्यंत गेला होता तर मग तो शुद्धीवर येणार कसा ? त्याला तातडीच्या उपचाराची गरज होती.  काय करावं  हे सुचत नव्हते. आम्ही आणलेले मेडीसीनसुद्धा आमच्या सोबत नव्हते.  आता काय करणार ? विचारलं असता  'त्याच्या वडिलांना बोलावणं पाठवलंय. ते आल्यानंतर ह्याला घेऊन घरी जातील आणि मी कामावर जाईन.'  त्या बाईच्या ह्या उत्तराने आम्ही अवाक झालो.  ती पुढे सांगत होती ‘देवाची देण… जगलं तर आपलं… दवाखाना नाही… डॉक्टर नाही… औषध नाही… ह्याला घेवून जायचं तरी कुठे ?’ आम्ही ज्या ठिकाणी उतरलो होतो तेथून पंधरा वीस किलोमीटर दूर होतो. लगेच औषध उपलब्ध होणंही शक्य नव्हतं. असाच थोडा वेळ विचार् करत उभे… नंतर मन घट्ट करून,  काळजावर दगड ठेवला नि परतीचा प्रवास सुरु केला…

विकसीनशील देशात मागासलेपणा…   स्वातंत्र्याच्या अठ्ठावन्न-साठ वर्षाच्या काळात एवढीही मानसिक सुधारणा होऊ नये की, जी सामाजिक सुधारणा आपल्या हातून झालेली नाही, किंबहुना ती करण्याची टाळाटाळ केली, त्याची लाज वाटावी. आपली सामाजिक कर्तव्यच आपण विसरलो आहोत.  त्या गरीब कुटुंबाची फसवणूक करून माणुसकीला कलंक फासतोय याची चाड उरली आहे कुठे ? केवळ औषध उपचार नाहीत, तशी सुविधा नाही म्हणून त्या निरपराध बालकाचा हकनाक बळी जातोय याला जबाबदार कोण ? अशा एक न अनेक प्रश्नांनी मनाचा ताबा घेतला होता. आमची परतणारी पाउलं जड झाली होती. अंतर कापलं जात नव्हतं. समोरच्या सडके ऐवजी ते बालक समोर दिसत होतं…. नंतरच्या कालावधीत त्याचं काय होणार ? ते शुद्धीवर येणार की नाही ? त्याला औषधोपचार मिळणार की नाही ? त्याचं  भावितव्य  काय असणार ? समाजात मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, शिक्षणाशिवाय सुशिक्षितपणा येणार कोठून ? अशा प्रकारच्या शंकेचं काहूर माजलं होतं मनात… एवढ्या महाभयाण वास्तवाचं, काळजाला पीळ पडेल असं चित्र…. परंतु त्या बाईच्या चेहऱ्यावर दुःखाचं किल्मिषही दिसत नव्हतं… जी पोरं जन्माला आली ती देवाची देण आणि मरणासन्न झाली तरी त्याचीच इच्छा… मनुष्यजन्म किती स्वस्त झाला आहे… आम्ही कसे बसे आमच्या सामानाच्या ठिकाणी पोहोचलो. गाठोडी उचलली आणि घरच्या रस्त्याला लागलो..


 आदिवासींचं जीवन…आयुष्य अनुभवायला आनंदाने आलो होतो पण जाताना मात्र  दुःखाने भरलेले अंतःकरण घेवून निघालो  होतो... घरी गेल्यावर दोन दिवस अन्नाचा घास माझ्या व्याकूळ  घशाखाली उतरला नव्हता. विचार… चिंता चालूच होती… दोन दिवसांनी एन जी ओ च्या कर्मचाऱ्याचा फोन आला तो आनंदाची वार्ता घेऊनच… ‘त्या बाळावर ओढवलेला धोका टळला होता… ते बाळ मृत्युच्या जबड्यातून बाहेर आलं होतं आणि आता त्याची प्रकृतीही ठीक होती.’ ते शब्द कानावर पडल्या पडल्या माझ्या हातातून फोन खाली केव्हा निसटला हे समजायच्या आतंच माझे दोन्ही हात चटकन वर गेले त्या आदिवासीं सारखेच… विधात्याचे, हात जोडून शतशः आभार मानायला…    
                         -----------x----------
दिनांक- 22-10-2013                                                           

[This article is published in PRAHAR newspaper dtd.23-03-2014-
    


संदकफू–गुर्डूम

                  संदकफू–गुर्डूम

‘सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्तां हमारा…’ आपल्या भारतभूमीबद्दल किती समर्पक शब्द आहेत हे. आसेतुहिमाचल जरी भ्रमंती केली, तरी भारत देशाचं विलोभनीय चित्रंच जिकडे तिकडे पाहायला मिळेल. विविध संस्कृती… विविध भाषा… विविध धर्म… विविध जाती… हे सारं गुण्यागोविंदानं एकत्र नांदत असल्याचं चित्रं देशाच्या कानाकोपऱ्यात दिसेल. भारताच्या पर्यटन क्षेत्रातील हेच प्रमुख आकर्षण आहे. म्हणूनच भारत देश परदेशी पर्यटकांचं आकर्षण बनलाय. हे सगळं जरी खरं असलं, तरी देशाचं खरं सौंदर्य, हिमालय आणि परिसरातच दडलंय ह्यात तिळमात्र शंका नाही. हे सौंदर्य अनुभवायचं असेल तर त्यासाठी भटकंती हवी. अशीच एक भटकंती संदकफूची…

भारताचा उत्तरपूर्व भाग म्हणजे सौंदर्याची खाणच जणू.  पश्चिम बंगालच्या उत्तरेला उंच उंच डोंगरांच्या चढ उतारावर, समुद्र सपाटीपासून २१३४ मीटर उंचीवर वसलेलं शहर… दार्जीलिंग… एक थंड हवेचे ठिकाण… हिवाळ्यात २ अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरणारा थंडीचा पारा सर्वसामान्यांसाठी मनोरंजनाची मेजवानीच…. स्वप्न पूर्ती…. त्याच बरोबर अशा तापमानातील ट्रेक म्हणजे एक प्रकारचा स्वर्ग असतो आणि अशी स्वर्गायात्रा करण्यासाठी 'राष्ट्रीय हिमालयन ट्रेकींग मोहीम' अंतर्गत ‘युथ होस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया’ चे सभासद बनून आपल्याला त्याचा मनमुराद आनंद लुटता येऊ शकतो. त्यातीलच एक ट्रेक… संदकफू-गुर्डूम…  
  
आम्ही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील तारीख निश्चित केली होती.  असोसिएशनच्या मार्गदर्शक सुचनेसुसार तो थंडीतला ट्रेक असल्यामुळे, शारीरिक हाल होणार नाहीत याची खबरदारी म्हणून गुलाबी नव्हे पण बोचऱ्या थंडीपासून दूर राहाण्यासाठी शॉपिंग मात्र जोरात चालू… अन तेही गटागटाने… आठवड्याला… एकेक जिन्नस आठवेल तसं…

आमचा प्रवास मुंबई-कोलकोता नंतर न्यू जलपायगुरी पर्यंत रेल्वेने नि त्यानंतरचा प्रवास मात्र रोडने होता. सामान्यपणे सर्वच गिर्यारोहक भ्रमंतीसाठी जंगल-दऱ्या-खोऱ्यांना जास्त पसंती देतात. मग ती कोणत्याही भूप्रदेशांतील असुदेत. पण मी मात्र त्याला अपवाद होतो. भ्रमंती आवडते… जंगले आवडतात… डोंगर चढाई मनमुराद आवडते… पण त्या चढाई दरम्यान घामाघूम झालेलं शरीर नि त्यामुळे आलेला थकवा मात्र नकोसा वाटतो… थंड प्रदेशतील ट्रेक जास्त प्रमाणात आवडतो. म्हणूनच त्या ट्रेकची निवड केली होती. त्याला दुसरंही कारण होतं… फोटोग्राफी… केवळ डोळ्यांनी पाहिलेला निसर्ग डोळ्यातच राहणार. फारतर अगदी तपशीलवार मध्ये कागदावर उतरणार. परंतु केवळ एका क्षणात त्या प्रदेशाची वस्तुस्थिती, त्याचं सौंदर्य डोळ्यांसमोर जसच्या तसं उभं करण्याचं काम फक्त फोटोग्राफच करू शकतो… त्याच्यातच ते सामर्थ्य आहे. त्याचीच परिणती माझा फोटोग्राफीचा छंद…

आम्ही ठरल्या वेळी न्यू जलपायगुरीला पोहोचलो. दार्जीलिंगच्या बेस कॅम्प इन्चार्जशी सतत संपर्कात  राहूनच आमचा प्रवास चालला होता. ज्या हॉटेल वर आम्ही उतरलो होतो तिथूनच आमचं प्रयाण दार्जीलिंगसाठी होणार होतं. त्या प्रवासात मात्र आम्हाला विघ्न आले… दार्जीलिंग शहरात कर्फ्यू होता कोणत्याही पर्यटकाला शहरात प्रवेश नव्हता. पूर्ण शहर शांत होतं. आम्हाला कळायला मार्ग नाही… आता करायचं काय.  रिपोर्टिंगच्या तारखेला आम्ही बेस कॅम्प मध्ये पाहिजेच होतो. परंतु कोणताही गाडीवाला दार्जीलिंगला यायला तयार नव्हता… त्या हॉटेल वर इतर ट्रेकर्स सुद्धा होते. आम्हाला थोडा धीर आला.  शेवटी फार विनंत्या आर्जवं झाल्यानंतर एक गाडी तयार झाली.  आम्ही आठ-दहाजण… एकाच गाडीने जायचं ठरलं. जीव मुठीत घेऊनच तो प्रवास… रात्री १२.४५ ला आम्ही हॉटेल वर पोहोचलो. टेन्शन्स संपली… जीव भांड्यात… शहरातला रात्रीचा थंडगार वारा अंगाला चांगलाच झोंबत होता. अगदी दारे खिडक्या बंद करूनही  दरवाजाच्या फटीतून येणारा थंड हवेचा झोत, आम्ही चार चार पांघरूणं अंगावर घेऊनसुद्धा,  आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता.. तरीही, प्रवासाचा थकवा आणि दंगलीच्या काळजीने आलेला मनाचा थकवा यामुळे तशा वातावरणातही आम्ही अगदी आरामात झोपी गेलो…

ती दार्जीलिंगची पहाट आमच्या अजुनही स्मरणात आहे. दोन दिवसानंतर आम्ही आंघोळीचा बेत केला. थंड पाण्याने तर आंघोळ करणं शक्य नव्हतं म्हणण्यापेक्षा अशक्य होतं. हॉटेल मालकाला विनंती करून सकाळी आंघोळीसाठी एक एक बादली गरम पाणी सांगितले. एका बादलीस दहा रुपये.  इलाज नव्हता. त्यात थंड पाणी मिसळणे अवघड होऊन बसले. त्या बादलीतल्या गरम पाण्यापेक्षा आम्हाला थंडीचा चटका एवढा बसत होता की केवळ दोन तीन मिनिटात आंघोळीचे सोपस्कार उरकणे भाग पडले. भल्या पहाटे उठून फोटोग्राफीच्या दृष्टीकोनातून त्या हॉटेलवरच्या जागेसाठी, आम्ही पहिलीच झाडी मारली होती  अंगावरच्या शाली-रजईसह. थंडीच्या त्या तीव्रतेत हाताच्या बोटांच्या झालेल्या बर्फाच्या कांड्यांनी टेरेस वर जाउन उघड्या जागी फोटो काढणे शक्य नव्हते.  हा शहाणपणा जाणून रूममधूनच मिळेल ते दुष्य कॅमेऱ्यात टिपायचं असा निर्धार केला. पाहटे उठून जेव्हा रूमची खिडकी उघडली तेव्हा झपकन आत शिरलेला  थंड हवेचा  झोत, नाकाचा शेंडा… कानाच्या पाळ्या बेशुद्ध करून गेला. हातात मोजे असल्याने बोटं शाबूत होती. त्याही परिस्थितीत आम्ही, त्या खोलीतून दूरवर असणाऱ्या परंतु नजरेच्या टप्प्यात दिसणाऱ्या कांचनगंगा शिखराचं नयनमनोहर  दृश्य कॅमेऱ्यात कायमचं साठविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो. शटर स्पीड, अपरचर, आयएसओ, ट्राईपॉड, लेन्सेस सगळ्यांचा आधार घेत कायमच्या   स्मरणात राहणाऱ्या काही फ्रेम्स आम्हाला मिळाल्या. हिमालयीन पर्वत रांगांमध्ये अगदी दिमाखात उभे असलेले कांचनगंगा शिखर, मागील निळसर-करड्या रंगाच्या आकाशात, सूर्याच्या पहिल्या किरणांच्या सोनेरी शिडकाव्यामध्ये खुलून दिसत होते. त्या तांबड्या पिवळ्या रंगात पहुडलेले ते बर्फाच्छादित शिखर पाहून डोळ्यांची पारणे फिटली… 

दुसऱ्या दिवशी ‘वायएचएआय’ चे सारे सोपस्कार आटोपून आम्ही, आमच्यानंतरच्या चमुंची सलामी अन शुभेच्छा घेत संदकफूच्या दिशेने कूच केले… एक उत्साही वातावरण… आनंदी मूड… आमच्या चाळीस जणांच्या विचारांची, थोडी का होईना एकमेकांत देवाणघेवाण झाली होती. -५ ते -७ अंश सेल्सिअसच्या थंडीच्या वातावरणाला तोंड देण्यासाठी प्रत्येकाची जय्यत तयारी. सगळ्यांच्या sack कपड्यांनी अन  आमच्या sack मात्र, कपडे आणि कॅमेऱ्यांनी भरल्या होत्या…

आम्ही जीपने धोत्री गावात पोहोचलो.  तिथूनच नाष्टा घेऊन भटकंती सुरु… धोत्रीपासून ७ किमीवर २९०० मीटर वर वसलेले तुमलिंग… सकाळी दहा वाजता सुरु केलेला प्रवास संध्याकाळी ४ वाजता संपायलाच हवा. फोटोग्राफर, आपल्या हातातली वेळ फोटोग्राफी करायची सोडून इतरत्र व्यतीत करेल असं कधीच होत नाही. केवळ ह्याच कारणामुळे, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत, नेमून दिलेल्या वेळेपेक्षा आम्ही तुमलिंग कॅम्पवर उशिरा पोहोचलो. खरंतर तुमलिंगच्या टापूत आम्ही पोहोचलोही होतो; पण हिमालयीन निसर्ग… तिथले वातावरण… आम्हाला नवीन होते. संध्याकाळची सोनेरी उन्हं, दऱ्या खोऱ्यातून उन सावलीचा खेळ खेळत होती. मध्येच पांढऱ्या शुभ्र ढगांनी आच्छादलेला तो डोंगरपरिसर मनाला अन कॅमेऱ्याला भूरळ घालत होता. मग साहजिकच आमचे पाय त्याच ठिकाणी रोवून बसले. प्रत्यक्षात कधीही न पाहिलेले देखावे आम्ही कॅमेऱ्यात टिपत होतो.

जसजसा सूर्य पाशिमिकडे कलत होता, तसतसा हवेतील गारवा वाढत चालला होता. तुमलिंग टापूतील ज्या ठिकाणी आम्ही उभे होतो तेथून फक्त पाचशे मीटर अंतर कापायला आम्हाला अर्धा तास लागला होता. त्यातच पूर्ण परिसर अंधारून गेला. एव्हाना कॅम्पवरील वेलकम ड्रींकबरोबर वातावरणही गरम झालं होतं. ज्या लोकांना फोटोग्राफीची आवडच नव्हती किंवा ज्यांना आमच्या उशिरा पोहोचण्याने वेलकम ड्रिंक उशिरा मिळाल्याची भावना झाली, त्यांनी मात्र चांगलंच तोंडसुख घेतलं. पण कॅम्प लीडरच्या मध्यस्थीने सगळं स्थिरस्थावर झालं.

तुमलींग ते कालीपोखरी हा प्रवास फारच सुखद वाटला. कधी शुभ्र तर कधी राखाडी रंगांच्या ढगांनी व्यापून टाकलेलं आकाश, परिसराच्या सौंदर्यात अधिकच भर टाकत होते. वादळ वाऱ्यापासून आपला बचाव करण्यासाठी, चिमुकली घरं डोंगराच्या आडोशाला लपून बसल्यासारखी दिसत होती. या प्रवासात संरक्षित जंगल असल्याने, प्रथमच वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता असते.  पुढचा सर्व प्रवास भारत-नेपाळ सीमारेषेवरून, तर काही वेळा नेपाळच्या हद्दीतून करावा लागतो. याच सीमारेषेवरील भारतीय जवानांची छावणी पहिली अन मन हेलावून गेलं… आपल्या घरापासून… कुटुंबापासून दूर अशा खडतर परिस्थितीत ते जवान करीत असलेली देशसेवा पाहून मन प्रसन्न झाले. उर अभिमानाने भरून आला. नकळत त्यांच्या बद्दल कौतुकाचे शब्द मुखातून बाहेर आले. त्यांच्या देशसेवेबद्दलच्या, कानावर पडलेल्या…  वाचलेल्या विविध कथा-घटनांना आपापसात चर्चेचे स्वरूप आले. याच चर्चेच्या उत्साही वातावरणात पुढची असह्य चढण केव्हा पार झाली हे मात्र लक्षात आलं नाही.

कडाक्याची थंडी… अंगात दोन दोन स्वेटर… कानाला माकड टोपी… पायात लेगिन्स… मोजे… चेहऱ्याला सन क्रीम… किती ते… एवढं असूनसुद्धा थंडीने बेहाल… त्या नवीन हवामानाची शरीराला सवय होणे आवश्यक असल्याने, कॅम्पवर पोहोचल्यावर नियमानुसार अंथरुणात घुसायचं नाही… अन्यथा जीवाला धोका… हे अवगत असूनही आम्ही कालीपोखरीला रूममध्ये सामान टाकलं आणि अंगावर रजई घेऊन चक्क अंथरुणात गुडूप… त्या उबेने दोन मिनिटात निद्राधीन… जेवनाच्या  वेळेस शोधाशोध… ह्याही वेळेस आमच्या नावाची बोंबाबोंब. कारण त्या ग्रुपमधून गायब होणारे आम्हीच दीडशहाणे फोटोग्राफर.

 आम्हाला असह्य होणाऱ्या थंडीमुळे अन आमच्या कॅमेरासेल रक्षणामुळे, जेवणाच्या वेळेआधीच आम्ही किचनमध्ये प्रवेश मिळवायचो. पण आज आम्हाला थोडा उशीर झाला होता. आम्ही जेवण घेत घेतच  किचनमध्ये गप्पा मारत उभे होतो. इथेही आम्ही शेवटी राहिलो. दरम्यान त्या हॉटेलच्या लोकांशी गप्पा सुरु झाल्या… ‘दार्जीलिंग शहरापासून जवळपास ६२ ते ७० किमीवरील कालीपोखरी-संद्कफु. डोंगराळ भागातून सर्व अत्यावश्यक जिन्नस घेऊन वर यायचं म्हणजे तारेवरची कसरत. शिवाय हे सर्व अंगाखांद्यावरून पायी चालत आणलं तरच परवडणारे. वाहतूक व्यवस्था सहज उपलब्ध नसल्याने आणि खर्चिक असल्याने ते शक्यही नाही. इकडे पर्यटकांची तशी वर्दळ फार नसते. ट्रेकर्स काही आले तरंच. त्यामुळे आम्हाला आधार तो फक्त युथ होस्टेल्सचाच.’ हे बोलत असताना त्यांचा सूर जरा वेगळा वाटला. त्याला व्यथेचा गंध होता. तेही खरंच होतं… एवढी मोठी गुंतवणूक करायची… रोज कष्ट उपसायचे… तर त्याची परतफेड व्हायला हवी ना. सारं आयुष्य असं डोंगराळ प्रदेशात काढायचं… निव्वळ कष्ट… मौज-मजा, सुंदर स्वप्न असं काही नाही… त्यात ऋतुमान हे असे… त्यामुळे ठराविक ऋतूतच ट्रेकर्स, पर्यटक येतात. नंतरचा काळ उद्योगाविनाच.  ह्या काळात जे काही कमावलं असेल तेच वर्षभर पुरवून खायचं. ‘युथ होस्टेल्स कडून जी रक्कम ठरवली जाईल तीच मिळणार आणि त्यावर समाधान मानायचं. पण जी रक्कम मिळते ती फार तुटपुंजी असते त्यात हा सर्व खर्च करून उरत मात्र काहीच नाही. मुलाचं शिक्षण… त्यांचं भविष्य… त्याचं जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतरगोष्टीं… हे सारं काही करता येत नाही. त्यामुळे पिढ्यानपिढ्या उत्पन्नाचं साधन अशाच प्रकारचं… पूर्णपणे जंगलावर आधारित… त्यासाठी ती रक्कम वाढवून मिळायला हवी हीच आमची रास्त इच्छा अन मागणी आहे' असं ते अगदी कळकळीने सांगत होते आम्हाला. त्यांच्या व्यथेवर काही उपाय निघतोय का ते पाहत होते. आम्ही काय करणार होतो. इतरांसारखे आम्हीही ट्रेकर्स होतो; फक्त युथ होस्टेल कडून आलेलो इतकंच काय ते…

असं म्हणतात… खूप आनंद झाला की  'आकाश ठेंगणे होते'.  मला त्या रात्री आकाश ठेंगणे  झाल्याचं प्रत्यक्ष पाहायला मिळालं. रात्री १२ च्या सुमारास एकटाच बाहेर आलो होतो. कडाक्याची बोचरी थंडी… त्यातच लघुशंका उरकून घेतली. नजर आकाशाकडे गेली… निरभ्र आकाशात टपोऱ्या चांदण्या… बालपणी अंगणातून आकाश पाहायचो… त्यातल्या चांदण्या खूप छोट्या दिसायच्या… ह्या टपोऱ्या चांदण्या धरतीवर स्वछ… शीतल प्रकाश पेरत होत्या. खूप जवळ वाटत होत्या त्या. प्रत्यक्षात असा आकार पाहून, बाजूलाच असलेल्या टेकडीवर जाऊन त्यांना पकडण्याचा मोह झाला. जंगलातील श्वापदं… खोल  दऱ्या… सगळं काही  विसरलो होतो. एकटक ते सौंदर्य न्याहाळत होतो. ते चांदणं पिऊन घेत होतो. पण क्षणात भानावर आलो. शांत उघड्या वातावरणातील थंडीच्या गार लाटेने पूर्ण  शरीर थंड पडल्याचं जाणवलं. क्षणाचीही उसंत न घेता,  उबेसाठी रुममध्ये जाऊन अंथरुणात शिरलो…

 तो ट्रेकचा तिसरा दिवस होता.  आमच्या स्वप्नपूर्तीचा दिवस.  सकाळी लवकर उठून नाष्टा घेतला. संदकफू समोर होतं आमच्या… अगदी नजरेच्या टप्यात… सर्व  तयारी करून मार्गस्थ. समुद्र सपाटीपासून ३६३६ मीटर उंचीवरचं ठिकाण… -५ ते -७ अंश सेल्सिअस तापमान. दिसायला नजरेच्या टप्प्यात असलेलं संदकफू, पण  चढाई  करता करता नाकी नऊ  आले. तब्बल सहा- सात तास चालत होतो. जंगल, डोंगर दऱ्या, खोरी… ह्या सगळ्याचा त्या सुखद वातावरणातून भटकंती करताना आनंद घेत होतो. एवढ्या उंचीवरचा ट्रेक आम्ही पहिल्यांदाच करत होतो. मुंबईतील धकाधकीच्या जीवनात दैनंदिन कामे उरकायलाच दिवस पुरत नाही तर रोज मॉर्निंग वॉक कुठून होणार ? अर्थात केवळ त्यामुळेच शरीर थकून जात होतं. पाहटे-सकाळी-दुपारी अन रात्री मनाची उभारी साथ देत होती; पण शरीर मात्र थकत होतं…
तो संदकफूच्या प्रवासातील शेवटचा टप्पा… मोठी चढण होती. आता खरी, आमच्या शरीराची परीक्षा सुरु होती. हाकेच्या अंतरावर दिसणारं संदकफू… पण प्रवास मात्र काही केल्या संपत नव्हता.  चार चार पाऊलांवर पाच पाच मिनिटांसाठी थांबावं लागत होतं. ‘धूर निघणे’ कशास म्हणतात ते तेव्हा जाणवत होतं. पाठीवर  हीss भली मोठी sack , पोटावर कॅमेरा बॅग, एका हातात ट्राईपॉड, दुसऱ्या  हातात प्लास्टिकची थैली… बेसकॅम्पवरून निघताना फार रुबाबदार वाटत होतं. अशाच प्रकारच्या पेहाराव्यामध्ये आपण कसे दिसतो ही उत्सुकता म्हणून, प्रत्येकजण आपली छबी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आपापल्या मित्रांना लडीवाळपणे सांगत होते. आम्हालाही तसा मोह आवरला नाही. कालीपोखरीहून निघल्यावर छानशा वळणावर आम्हीही अशाप्रकारचे आमचे फोटो खाढून घेतले…

 आयुष्याच्या अशाच वळणावर घडलेल्या घटना… प्रसंग… आठवणी बनून जीवनभर साथ देत असतात. सामान्यपणे जीवनांत बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडत असतात… त्या  करायलाही मिळतात… पण अशा गोष्टींचा पुन्हा पुन्हा आनंद घ्यायला त्या मिळतातच असं नाही… काही वेळा भौतिक कारणास्तव ते शक्य नसतं… काही वेळेस काळाच्या ओघात ते शक्य नसतं… अशावेळेस तोच आनंद, आपण वर्तमान जगात असताना, भूतकाळात प्रवास करून मिळवितो… आठवणींच्या स्वरुपात.  आपल्याला मिळालेली निसर्गाची देणगी… स्मरणशक्ती… तिच्या सहाय्याने तो आनंद आपण स्वतः घेऊ शकतो. फारतर तो शब्दांनी वाटून घेतो. पण तोच फोटोग्राफ असेल तर? तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवता येतो… शब्दाविना…  जसाच्या तसा… आणि हीच अनिमिक इच्छा असते प्रत्येकाची…

ती चढण चढायला शरीराला फार कष्ट पडत होते.  विश्रांतीचेही नियम… चढण चढताना कितीही थकवा आला तर खाली बसायचं नाही. विसावा उभा राहूनच. त्यामुळे त्या थंड वातावरणातही दम लागल्याने तोंड उघडे… आणि तोंड उघडे म्हणून वाफा बाहेर… उंच वातावरणात प्राणवायूची कमतरता येऊ नये म्हणून पाणी भरपूर प्यायचं अन ते तोंडावाटे वाफेच्या स्वरुपात बाहेर टाकायचं. हेच काम चालू होतं आमचं.  एक उत्सुकता होती… उल्हास होता… आवड होती… जिद्द होती…  या साऱ्यामुळे शरीराची थकान निघून जात होती.
दुपारचे साडेतीन वाजत आले होते. पण भौगोलिक रचनेनुसार सूर्य मावळतीच्या दिशेने कलू लागला होता. आम्हाला आता खूप घाई झाली. सूर्यास्तापूर्वी कांचनगंगा शिखराचं दर्शन व्हायला हवं होतं. नेटाने आम्ही चढाई सुरु केली.  दहा मिनिटात आम्ही संदकफूच्या छोटेखानी पठारावर पोहोचलो. एक विलक्षण आकर्षण… विलक्षण समाधान… शाळेच्या अभ्यासक्रमातील पुस्तकातून वाचलेले कांचनगंगा शिखर आज ‘हेचि देही हेचि डोळा’ पाहायला मिळणार होते. ह्यामुळे हर्शोल्लीत झालेलो आम्ही, नेहमी प्रमाणे aclamiatise साठी बादल्या घेऊन पाणी आणायला न जाता, कॅमेरा घेऊन हॉटेल बाहेर पडलो. दोन्ही उद्देश साध्य होत होते…

निळ्याभोर आकाशात, एखाद्या चित्रकाराच्या फराट्यासारखे पांढरे शुभ्र ढग त्या शिखाराभोवती वेढा   टाकून घुटमळताना दिसत होते. शांत… धीरगंभीरपणे… ऐटीत, दिमाखानं उभं असलेले कांचनगंगा शिखर… त्यावर गोठलेल्या हिमनगाच्या गर्तेतुनही स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देते…  त्याचं सामर्थ्य,  जिद्द पाहून ते आपल्या अंगी का उतरत नाही? याची चिंतनवजा हुरहूर मनाला लागून राहते.  कांचनगंगा शिखाराबरोबर इतर हिमालयीन रांगांचा थाटही आपल्या डोळ्यात भरून राहतो. संदकफू म्हणजे ट्रेकर्सचं नंदनवन. स्वर्गच. ह्याच ठिकाणावरूनच, कितीतरी महाकाय हिमालयीन रांगांमध्ये एका कुटुंबातील सदस्यासारखे  मांडीला मांडी लावून बसलेली-माउंट एवरेस्ट, कांचनगंगा, लोथसे , नुप्त्से,  मकालू, जानू , पम्डीम,  चोमोल होरी आणि अरुणाचल प्रदेशापर्यंतची कितीतरी शिखरे  आपल्या दृष्टीस पडतात.   

संदकफू हे ह्या ट्रेकचं अत्युच्च टोक. त्या ठिकाणी एक हॉटेल आणि भारतीय जवानांची छावणी सोडली तर काहीही नाही. मनुष्य वस्ती नाहीच. ह्या भ्रमंती मध्ये संदकफूला फक्त एक रात्र आणि एक सकाळ एवढाच कालावधी. त्यामुळे संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात विविध कोनातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून जेवढ्या प्रतिमा मिळतील त्या आम्ही नजरेत आणि कॅमेऱ्यात साठवत गेलो. रात्रीच्या जेवनानंतरचा आमचा  वेळ एकमेकांच्या कॅमेऱ्यातील फोटो पाहण्यात आणि त्यावर कॉमेंट्स करण्यात व्यतीत  झाला. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचं सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न करत होता. आपलं फोटोग्राफिक कौशल्य पणाला लावत होता. त्यामुळे साहजिकच आमच्या प्रत्येकाच्या इमेजेस वेगवेगळ्या होत्या. संध्याकालीन सौंदर्य पाहता पाहताच अंगावर सगळी पांघरूनं लपेटूनच बाजुच्यांची पर्वा न करता, संगीताचा मनमुराद आनंद लुटत झोपी गेलो…
 पहाटे ४ वाजताचे अलार्म लावूनच झोपी गेलेलो. पण त्या अगोदरच सगळे तयार. अंगावर शाल… हातात मोजे… कानाला टोपी… सगळं तसंच… म्हणजे अंथरुणातून उठून थेट कॅमेरा गळ्यात अडकवून आम्ही बाहेर पडलो. पायातही दोनदोन मोज्यांवर बूट होते. हॉटेल समोरच्या हौदातील पाण्याचा बर्फ झाला होता. तापमान उणे २ अंश सेल्सिअस होते. अगोदरच्या रात्री फिरून पाहिलेला परिसर, सकाळच्या शूटिंग साठी कितपत योग्य आहे ह्याची खातरजमा करून आम्ही निघालो. उगवत्या सूर्याच्या कोमल किरणाची सोनेरी झालर त्या शिखरांवर सोनसाखळी सारखी वाटत होती.

प्रत्येक माणूस जे जे काही डोळ्यांनी पाहणार, त्याचा पुन्हा पुन्हा आनंद घेण्यासाठी, ते डोळ्यात किती साठवणार ? आणि म्हणूनच, तो निसर्ग… त्याची किमया… त्याच्यात होणाऱ्या सप्तरंगांची उधळण… हे सारं काही कॅमेऱ्यातही साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पाहिलेला निसर्ग… घेतलेला आस्वाद… अनुभवलेलं सानिध्य… हाच इतर गोष्टींपेक्षा अधिक मोलाचा साठा घेऊन तो संसार रुपी मायाजालात परतत असतो…

संदकफूचा निरोप घेण्याची वेळ समीप आली. सकाळचा नाष्टा केला… सामान उचललं… हॉटेल समोर एक ग्रुप फोटो घेतला… अन दोन्ही हात वर करून त्या जवानांना सलामी देत परतीच्या प्रवासासाठी डोंगर उतरु लागलो.

बराच वेळ डोंगर उतरणीवरून चालत जंगलातील रस्ता पादाक्रांत करत होतो. फक्त शरीर खाली उतरत होतं असं जाणवत होतं. परंतु मन मात्र तिथेच होतं… अजुनही त्या भ्रमंतीतून बाहेर आलेलं नव्हतं… हिमालयीन परिसर… तिथलं वातावरण… भौगोलिक परिस्थिती…  सौंदर्य… तिथलं जीवनमान… ह्या  सगळ्यात ते अडकलेलं होतं… मनीची इच्छापूर्ती झाल्याचं  समाधान होतं चेहऱ्यावर; पण त्याचबरोबर त्या डोंगर दऱ्या-खोऱ्यात आपलं आयुष्य वेचणाऱ्या कुटुंबाची, त्यांनी आमच्या समोर मांडलेली व्यथा मनाला पोखरून  काढत होती… एकीकडे भारत देशाला लाभलेलं वैविध्यपूर्ण… अतुलनीय असे सौंदर्य, तर दुसरीकडे कोणत्याही उच्च जीवनाचे स्वप्न न पाहता केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी… सामान्य आयुष्य जगण्यासाठी… धडपड करणारी… त्याच वातावरणात राहणारी सामान्य कुटुंबं… ही दरी मला, हिमालयीन पर्वत रांगांमधल्या असंख्य दऱ्या खोऱ्यांहूनही फाsssर मोठी वाटली…     
                                                              

दिनांक- 19-11-2013

[Article published in PRAHAR newspaper dtd.22/12/2013-
http://epaper.prahaar.in/detail.php?cords=16,88,1488,1434&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/22122013/Mumbai/Suppl/Page8.jpg  ]                                                       
                                                                                                                                                                       
         

  

जंगल सफारी…

जंगल सफारी… 
डिसेंबरचा शेवटचा आठवडा. तो दिवस प्रवासाचाच  होता.  मुंबई –नागपूर,  नंतर सलग  खुश्कीच्या  मार्गाने ३ - ४ तासांच्या प्रवासाने पुरा  थकून गेलो  होतो.  तरीही हे सगळ क्षुल्लक वाटत होतं त्या जंगल सफारी समोर!   कॅमेऱ्यात  जेरबंद करण्याच्या   जय्यत  तयारीसाठी आमची कॅमेरा बैग परीपूर्ण भरलेली.  काहीही झालं तरी वाघाला कॅमेरऱ्यात   बंदिस्त  करून आणायचंच, अशी कॅमेऱ्याच्याच पट्ट्याला  गाठ   बांधलेली.  अशा आशावादी वातावरण अन गप्पांमधून  आमची गाडी मस्त चालली होती  . त्यामुळे प्रवास कधी संपला हे कळलंच नाही.  नियमित आणि  ठरल्या प्रमाणे, रात्री श्रम परिहार- जेवण- गप्पा,  काही वेळ संगीतात व्यतीत आणी मग सकाळच्या आशेच्या किरणांचा धागा मनात घट्ट  पकडत- निद्राधीन. 

‘जंगलवेड्या प्राण्यांना, दोन चार महिने भ्रमंती नाही केली तर,  जंगल,  दऱ्या-खोऱ्यांची स्वप्न पडतात.  कारण जे सुख, चैतन्य तेथे आहे, जी मनःशांती तेथे आहे, ती या सिमेंटच्या जंगलात कोठून असणार ? त्या ओल्या मातीचा अवती-भोवती दरवळणारा सुगंध.... दगडांवर पसरलेली  शेवाळं..... पानां-फुलांवरील  इवलेसे  दवबिंदू......त्यातून लुकलुकत डोळ्यांवर पडणारी  सोनेरी किरणे..... झाडा -झुडपांच्या आडव्या-तिडव्या पसरलेल्या छोट्या छोट्या फांद्या....मळकटलेल्या  वेड्या-वाकड्या             पाऊल वाटा.... त्यातच चिरविश्रांती घेत असलेली हिरवी -पिवळी पाने....... मध्येच संथ वाहणारे झरे... त्यातून पाय घसरणार नाही याची काळजी  घेत, चिखलानं  बरबटलेली आपली  जड पाऊलं!  अशी हि निसर्गाची भ्रमंती , शहाण्यांना वेडं करते अन वेड्यांना स्वर्गानन्दाची अनुभूती देते.’  



तो आमचा पेंच अभयारण्यातला पहिला दिवस होता.  पहाटे   ५  वाजताच  उठून शिकाऱ्याच्या गणवेशात, हातात तोफ घेऊन स्वाऱ्या  निघाल्या.  जंगलातली ती बोचरी थंडी गार वाऱ्याच्या झुळुकीने अंगाला चांगलीच झोंबत होती.  त्यामुळे  स्वसंरक्षणार्थ -अंगात स्वेटर, कानाला (माकड) टोपी , गळ्यात स्कार्फ, हातात मोजे,  आणखी काय काय ! पण तरीही गारव्यामुळे हातमोजे असूनही  बोटे बर्फासारखी  थंड पडली होती.  कानाच्या पाळ्या, नाकाचा शेंडा तर बेशुद्धावस्थेतच होता.  अर्ध्या-एक तासाच्या जंगलातील प्रवासा  दरम्यान  निसर्गाचं विलोभनीय दर्शन झालं . घनदाट, उंच-उंच वनराईतून, धुक्याचा दाट पडदा  छेदत,  हिरव्यागार गालिच्यावर पडलेली  सोनेरी  किरणं !  त्यातूनच  दुडू - दुडू धावत जाणारा हरणांचा कळप ! फांद्या फांद्यांवरून  आपल्या पोरांना पोटाशी धरून उड्या  घेणारी माकडं ! मंत्रमुग्ध करणारा   पक्षांचा किलबिलाट !  ह्या साऱ्या आनंददायी वातावरणामुळे  आमची थंडी गायब झाली. आणि  हात सरसावले कॅमेऱ्याकडे......मार्ग बदलत असताना,  लांबवर कुठेतरी इवलुशा  कोल्ह्यांची जोडी दिसली . फारच  चपळ ! मस्तीखोर !  आमच्या मार्गावरच  पुढे पुढे चालत होती.  अंतर खूप असल्याने  फोटो घेण्यासाठी  जीप जरा  पुढे नेली.  पण तेवढ्यात त्यांनी धूम ठोकली. 
 चक्क गायब!  बाजूच्या गवताळ भागात,  कोवळ्या उन्हाचा आनंद घेत,  मस्ती करत असलेले बाराशिंगे, शिंगात अडकलेले गवताचे भारे घेऊनच गवत तुडवीत मार्ग क्रमण करत होते.   असाच अभयारण्याचा  आनंद घेत आमची सकाळची सफारी संपवून रेस्ट  हाउसवर  परतलो.  पदरी थोडी निराशा होती कारण वाघोबाचं  दर्शन झालं नव्हतं. तरीही आशा सोडली नव्हती. 

 
संध्याकाळच्या सफारीसाठी, रेंज  फॉरेस्ट  ऑफिसर आमच्यासोबत जातीने होते. सफारी जीपनेच, पण वणवण करून रिकाम्या हाताने परतणार,  एवढ्यात  वोकि-टोकी वर निरोप आला. आम्हाला हवा असलेला तो क्षण समीप आला.  आमचे कान टवकारले, निरोप होता- ‘अनेक मार्गांपैकी एका मार्गावर चार बछड्यांसह एक वाघीण अगदी रस्त्यावर विश्रांती घेत होती.’   नकळत आतून आनंदाची एक लकेर, किन्नरी आवाज करत कंठातून बाहेर पडली. आम्ही आनंदून गेलो होतो. त्या मार्गावरील योग्य जागी  पोहोचण्या अगोदरच  कॅमेरे सरसावले, लेन्सेस बदलल्या.  जेवढे काही आवश्यक होती तेवढी  सेटिंग्जची खात्री करून घेतली.   तेवढ्यात आमची जीप इच्छित स्थळी पोहचली.  सुमारे ५००-६०० फूट दूर  अंतरावर-रस्त्यावरच परंतु  झाडांच्या आडोशाला तीन बछडे आपल्या आईबरोबर  शांत बसले होते.  सफारी जीपच्या चालकाला आमची जीप थोडी  पुढे घ्यायला सांगितली पण जंगलाचे काही नियम असतात त्यांना मोडून  चालणार नव्हते.   फक्त प्रतीक्षा करत होतो ते बछडे आणि आमच्यातील अंतर कमी केव्हा होईल याची. कारण आम्हाला सीमा रेषा ओलांडायला परवानगी नव्हती.  पाहिजे तसं दर्शन होत नव्हतं म्हणून  आमची  चुळबुळ चाललेली. तेवढ्यात  एकाच जागेवर बसून कंटाळलेले बछडे सावकाश उठले आणि थोड्या मोकळ्या जागेत रस्त्याच्या मध्यभागी जाऊन  बसले.  पश्चिमेकडे कलणारी उन्हं घनदाट झाडीतून, पाना-फांद्यांच्या झारोख्यांतून  संथपणे पाझरत होती.  पण त्या बछड्यापर्यंत ती पोहचत नव्हती. अंधुकशा  संधी प्रकाशात दुरूनच त्यांचं दर्शन झालं आणि कॅमेऱ्याच्या एलसीडी वर इवलीशी छबी उमटली. प्रतिमा छोटी होती पण समाधान मात्र मोठं होतं !  

आमचा कार्यक्रम चार-पांच दिवसांचा ठरलेला होता आणि तोही वेगवेगळ्या अभयारण्यातला.    प्रवास तसा खडतरंच.  भर  दुपारी आम्ही कान्हाला पोहचलो. क्षणाचीही उसंत न घेता दुपारच्या जेवणाचे सोपस्कार आटोपले अन वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सायंकाळच्या सफारीची तयारी सुरु केली. आता मात्र आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ‘कान्हा अभयारण्य’ हे वाघांसाठी राखीव असल्याने तेथे नक्कीच चांगले फोटोग्राफ्स मिळणार याची खात्री होती. शिवाय वन अधिकारी आमच्या दिमतीला होतेच. त्यामुळे आमची खात्री आणखी बळावली. प्रत्येकाने अगदी सामंजस्याने, जीप मध्ये आपापल्या  जागा घेतल्या अन सफारी सुरु झाली. ५००  मीटर अंतर कापून जातो न जातो तोच, जीपचा ब्रेक कचकन लागला. गाडी थांबली.  गाईड-वन अधिकारी यांनी,  बाजूलाच उभ्या असलेल्या झाडाच्या डोलीकडे बोट दाखून घुबडांच्या छोट्या पिल्लांचं दर्शन घडवलं. एक-ना-दोन तर पाच-पाच पिल्लं एका रांगेत बसून मिश्किल डोळ्यांनी संध्याळच्या तांबूस किरणांचा आस्वाद घेत होती. घुबडाचा तोंड पाहणं समाज जीवनांत अशुभ मानलं जात असलं तरी निसर्गाचा नियमच वेगळा. 'ह्या पिल्लांचं दर्शन झालं म्हणजे नक्की काही तरी हाताला गवसणार'  याची ग्वाही आम्हाला  त्या अधिकाऱ्याकडून मिळाली. नुसत्या दर्शनावर आम्ही समाधान मानले नाही. तर पटापट त्या पिल्लांना कॅमेऱ्यात कैद करून टाकले दुसऱ्या दिवशीच्या आशादायी-यशस्वी  सफारीसाठी…

तो दिवस सोनेरी अक्षरांनी म्हणण्यापेक्षा ‘सोनेरी  छायाचित्रांनी’ आमच्या कॅमेऱ्यात कोरला गेला. सकाळी भल्या पाहटे  उठून तशाच थंड वातावरणात आम्ही, मनोमन देवाची प्रार्थना करत रेस्टहाउस बाहेर पडलो. आज वाघ असल्याची जर बातमी आली तर  आमच्यासाठी  हत्तीच्या सफारीची सोय करण्याची  चोख व्यवस्था करण्यात आली होती; पण  त्यासाठी  जंगलात त्या मार्गावर वाघाचं असणं महत्वाचं होतं. झालं तसंच. आमच्या सोबत असलेल्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर  उमटलेली  एक स्मितहास्याची लकेर पाहून आम्ही देवाचे तिथल्या तिथे पटकन आभार मानले. आमच्या कानावर ती खबर येण्याअगोदरच आमची जीप, जंगलातील वेगाचे बंधनं थोड्याफार प्रमाणात झुगारून त्या दिशेने सुसाट धावू लागली.
एका घनदाट कांजाळात लपून बसलेल्या बलदंड 4 फूट लांबीच्या वाघाचे, त्या झुडुपांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फान्द्यांच्या फटीतून दर्शन झाले. कॅमेरे सरसावले होते. हत्तीची पावलं संथ गतीने पडत होती. मोकळ्या जागेच्या शोधासाठी माहूत प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता अन आमची मात्र, अंबारीत घुसळण होत होती. वाघ नि आमच्यातील अंतर कमी असल्याने आमची धांदल उडाली होती-लेन्सेस बदलण्यासाठी.  सुपर टेली लेन्स वरून वाईड वर येई पर्यंत वाघाच्या काही हालचालींना मात्र मुकावे लागले. ज्या कांजळात वाघ होता तो आता हळूहळू बाहेर आला अन समोरच्याच ३-४ फुट उंच  असलेल्या गवताळ भागात शिरला. आमची  उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हत्तीची एक फेरी त्या गवताळ  टापूभोवती   झाली अन "ईद  का चांद" दिसावा तसा  वाघाचा चेहरा गवताच्या झुपक्यातून दिसला. काय ते तेज ! करारी डोळे...भेदक नजर... निश्चल चेहरा...आजूबाजूला पर्यटकांचा गोंधळ...हत्तींची धावपळ... तरीही त्याच्या  चेहऱ्यावर याचा कसलाही लवलेश नव्हता. जणू काही त्या जंगलामध्ये फक्त तो एकटाच  आहे ! आणि म्हणूनच साऱ्या  जंगलावर  त्याचं  अधिराज्य असणं साहजिकच आहे.



दुपारच्या तळपत्या उन्हांनी  कसनुसे चेहरे करून पडलेली  तांबूस पिवळसर रंगांची गवताची पातीं, प्रातःकालच्या दवबिंदूंनी ताजेतवानी होवून आपल्या राजाच्या रंगात रंग मिसळण्यासाठी,  एकमेकांच्या खांद्याला खांदा देत, सोनेरी सूर्यप्रकाशात पुन्हा नव्या उभारीने सळसळत होती.  त्या गोंडस चेहऱ्याने आता पूर्णाकृती धारण करत आपला गवतातला डेरा सावकाशपणे टापूच्या कडेला हालवला होता. तेव्हा मात्र आम्ही आमच्या माहुताला अगदी कळकळीची विनंती करून, परतीच्या दिशेने निघालेला हत्ती परत फिरवायला सांगितला. डोळ्यांमध्ये साठवून ठेवलेली मूर्ती कॅमेऱ्यांमधून सोबत आणायची होती. तो  निर्विकारपणे गवतामध्येच शांत बसून राहिला. त्याची नजर जी आम्हाला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, ती थेट अंतर्मनापर्यंत पोहोचली होती. कशाचीच  भीती नसलेला हा प्राणी  आमच्याकडे एकटक बघत होता...डोळ्यात डोळे घालून! त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होतो ते  आमच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने. त्याचा हिंस्त्र स्वभाव, भेदक नजर,  अजस्त्रपण  यातलं आता काहीच दिसत नव्हतं त्याच्या चेहऱ्यावर. पण एक अनामिक चिंता मात्र डोळ्यातून बाहेर डोकावत होती- ‘पूर्ण विश्वातून दुरापास्त होत चाललेली  आपली जमात… एक-एक करत आपल्या भाऊबंधांची संख्याच कमी होत असल्याची जाणिव... नकळत आपल्यामधून अचानक गायब होणारे आपले सखे- सोबती... आणि हे सर्व प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा नशिबी आलेला करंटेपणा...’
आम्ही पटापट त्या बछाड्याला कॅमेऱ्यामध्ये स्थान देवून, परतीचा प्रवास सुरु केला.  ‘वाघ’ या नावाला  'हिंस्त्र श्वापद'  बिरुद लागल्याचं त्या बछड्याच्या   बोलक्या  चेहऱ्या वरून कुठेही दिसत नव्हतं. त्याचा तो  शांत, मवाळ, अपराधी चेहरा नजरे समोरून हालायला तयार नव्हता.... ह्या साऱ्याने माझं मन कासावीस झालं, सैरा वैरा धावत निघालं...बालपणीच्या आठवणीतल्या धुक्यातून… १९६८-६९ चा काळ. बालपणात घरातील वडिलधाऱ्या मंडळींच्या मुखातून छान-छान गोष्टी ऐकायला खूप मजा  यायची. किंबहुना रात्री अंगणात अंथरुणावर पडल्यावर, नजर आकाशातील चांदण्यांकडे खिळलेली असायची अन  कानावर मात्र आजी-आजोबांच्या हव्याहव्याशा गोष्टी. त्या कथेतील प्राणी, पक्षी यांच्या आकाराप्रमाणे, आकाशातील चांदण्यांना एकत्र गुंफण्याचा, जुळवण्याचा एक मजेशीर प्रयत्न करत असायचो..
   तो काळ कमी लोकसंख्येचा... डोंगरपायथ्याशी घनदाट अरण्यात, जेम-तेम  चार-पांच कुटुंबाचं मिळून  गाव  वसलेलं असायचं.  वनराई घनदाट असल्याने दैनंदिन कामं दिवसाढवळ्या आटोपली जायची.  रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं कोणाचं धाडस नाही व्हायचं. कारण हिंस्त्र श्वापदांची भीती असायची. छोटी-छोटी जंगलं असली तरी त्यात प्राणीमात्रांचा वावर होता. निसर्ग- वन्यजीवन यांचं जीवन चक्र पूर्ण  करण्यासाठी, त्याचा समतोल राखण्यासाठी तशी घडी निसर्गानं बसवलेली असते.  आजोबांच्या तोंडून अशा गप्पा ऐकताना भीतीने अंग कापत राहायचे, रात्री स्वप्नात सुद्धा वाघ-सिंह दिसायचे. तरीही त्या गोष्टी कुतूहलाने ऐकत राहायचो.  त्या काळी राजे राजवाडे, श्वापदांच्या शिकारी करत पण ते प्रमाण फार कमी होतं. प्राण्यांची संख्या जास्त होती त्यामुळे निसर्गाच्या सामतोलावर विशेष परिणाम झालेला दिसून यायचा नाही. परंतु काळ बदलत गेला...बेसुमार लोकसंख्या वाढली...जंगलतोड वाढू लागली...पैशाच्या हव्यासापोटी प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले...काळाबरोबर निसर्गचित्रहि बदलले...
सगळ्याचाच  कायापालट झाला...त्याची परिणीती मात्र वन्यप्राण्यांच्या घटणाऱ्या संख्येत झाली.  दिवसाढवळ्या दिसणारे प्राणी आता रात्री रात्री जागवून सुद्धा दिसेनासे झाले. जंगलंच्या जंगलं पालथी घालून सुद्धा पाउलखुणा दिसेनाशा झाल्या. हिरव्या गार गर्द झाडीने आता ओसाड माळरानाचे रूप धारण केले होते. उंच उंच वृक्षांनी, झुडुपांची जागा घेतली होती...आणि झुडपांची जागा सिमेंटच्या जंगलांनी घेतली होती... निसर्गचक्र आता अशा पद्धतीने चालू होतं. श्वापदांना राहायलाच जंगलं उरली नाहीत तर मग ते थेट लोकवस्त्या मध्ये प्रवेश करणारच...जंगलावरील अतिक्रमणे त्यांच्या जीवावर  उठल्यावर  ती रस्त्यांवर उतरणारच...जीव वाचवण्यासाठी त्यांनी गावं -शहरात शिरकाव करण्यास सुरुवारत केली तर त्यात नवल ते काय ? हिंसेच्या विविध घटना घडायला लागल्या. 
जेव्हा ‘मानवाच्या’  जीवाला धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले तेव्हा मात्र मानवाच्या सुरक्षिततेबरोबरच वन्य प्राण्यांच्या संवर्धन अन सुरक्षेचा साधा वाटणारा प्रश्न, सामान्य वन्यप्रेमींप्रमाणेच सामाजिक संस्था आणि सरकारलाहि भेडसावू लागला. हा समतोलच मुळी ढळत चालला होता. यावर आजवर बऱ्याच उपाय योजना झाल्या. सामजिक वनीकरण हाती घेतले गेले… अस्तित्वात असलेली जंगले वन्य प्राण्यांसाठी राखीव म्हणून घोषित करण्यात आली… राखीव जंगलांचे हळू हळू प्रमाण वाढत चालले… तरीही आज मितीस लाखो पर्यटक, वाघांसाठी राखीव असलेल्या अभयारण्याला भेट देताना अन दुखी कष्टी मनाने परत येताना दिसतात. मुळातच कमी झालेल्या वाघांच्या संख्येमुळे, पाच-पाच सहा-सहा दिवस जंगलात काढून सुद्धा वाघांचं मुख दर्शन दुर्लभ झालं. आणि हे दर्शन आता तर आपल्या नशिबावर अवलंबून राहू लागलं. त्याला आपल्या  पाप-पुण्याच्या  दुर्दैवी किनारीची झालर  लागली. अगदी  पाचशे-हजार फुटावरून जरी वाघ बघायला मिळाला तरी  हर्षोल्लित होऊन भगवंताचे आभार मानताना कैक लोकांना पाहिले आम्ही. कुटुंबाच्या-कुटुंबं आपल्या लहानग्यांना  घेवून जंगल सफाऱ्या करताना दिसतात. कारण नामशेष होता चाललेला हा वन्य प्राणी भविष्यात कधी पाहायला मिळणार की नाही  ह्या शंकेनं ! अशा विचारांच्या  गर्तेत आमचा प्रवास संपून रेस्ट हाउस वर पोहोचलो तरी मन मात्र उद्विग्न झाले होते.  
एक प्रकारच्या चिंतेनं मन ग्रासलं होतं. ‘उत्तरोत्तर जंगलांचा होत असलेला ऱ्हास आणि वन्य प्राण्यांच्या संवर्धन अन सुरक्षिततेची होत असलेली हेळसांड... एकीकडे भरमसाठ वेगाने वाढत असलेला लोकसंख्येचा भस्मासूर अन दुसरीकडे रोडावत चाललेली वन्य प्राण्यांची संख्या…’ जंगले...वन्यप्राणी...निसर्ग समतोल...संवर्धन...सुरक्षा...ह्यावर खरोखरच काही कठोर उपाय योजना होईल का ? या प्रश्नाने माझं मन कुरतडलं जात होतं.  एक मात्र खरं,  ह्या सामाजिक जबाबदारीला प्रत्येकाने आपले प्रथम कर्तव्य समजून या उपाय योजनेच्या मोहिमेत सहभागी  झाले तर आणि तरच उद्याच्या  पिढीला वन्य जीवांच्या जीवनाचा आनंद लुटता येईल.
आमच्या छायाचित्रणाच्या भ्रमंतीत, वन्य प्राण्यांच्या सहज सुलभ दर्शनाचा, त्यांच्या अस्तित्वाचा, पाहिजे तसा आनंद लुटण्याचे अहो भाग्य जरी आमच्या वाट्याला आले नाही, तरी भविष्यात ते जरूर येईल...आज जंगला जंगलामध्ये अस्तित्वात असलेल्या परिस्थितीत अमुलाग्र बदल होवून, वन्य प्राण्यांची शेकड्यात असलेली संख्या लाखात जाईल, केवळ याच आशेचा लामण दिवा डोळ्यासमोर ठेवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो…

[ Published in PRAHAR Maraathi newspaper dtd.03/11/2013 -http://epaper.prahaar.in/detail.php?cords=16,88,1484,1450&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/03112013/Mumbai/Suppl/Page8.jpg]