Friday, May 23, 2014

स्थलांतर पक्षी आणि माणसांचं...

            स्थलांतर पक्षी आणि माणसांचं...


आपल्या सभोवतालचे जीवन ,त्यातल्या कथा–व्यथा अगदी जवळून पाहण्याची लहानपणापासून उत्कंठा लागलेली.  त्यासाठी भटकंती आलीच. पण खऱ्या अर्थाने त्या भटकंतीला साथ लाभली ती छायाचित्रणाच्या छन्दाने! छंद जडला अन तेव्हापासून एका वेगळ्या  जगात प्रवेश झाल्यासारखे वाटले. त्यातला वावर हवाहवासा झाला . काहीतरी करण्याच्या इच्छेने मनाची  कास धरली.. . त्यात वेगळेपण हवे यासाठी धडपड सुरु झाली.   समाजजीवनाचं  चित्र लोकांसमोर उभ करायचं म्हणजे,  एकतर ते शब्दात सांगायचं; नाहीतर छायाचित्रणाच्या माध्यमातून लोकांसमोर आणायचं.!  त्यातला दुसरा पर्याय मला, पहिल्यापेक्षा सुकर वाटला. 'अगदी हजार शब्दातून जे सहज शक्य नाही,  ते एका छायाचित्रातून व्यक्त करता येतं ' हे समीकरण मनावर बिंबल होतं. आणि म्हणूनच छायाचित्रणाचं  क्षेत्र मनाला अगदी वेगळ्या मार्गाने घेऊन गेलं. मनाला भावलेले विषय मांडायला एक साधन मिळालं … कॅमेरा ! अन प्रवास सुरु झाला…

त्या  प्रवास  मार्गातीलच एक ठिकाण  - नलसरोवर ! मुंबईहून रात्रीचा प्रवास …सकाळी अहमदाबाद. तिथेच नाश्ता उरकून बसने सानंद मार्गे नलसरोवर.  नलसरोवर-पक्ष्यांसाठी राखीव वन असल्याने, वन विभागाच्या नियमांनुसार सगळे सोपस्कार आटोपून संध्याकाळच्या फेरीच्या तयारीला लागलो.  मिळालेल्या माहितीप्रमाणे सर्व पर्यटकांना परिचित  असलेल्या ' कासम' ची भेट खूपशा प्रयासानंतर एकदाची झाली. एव्हाना सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला होता. पिवळ्या-नारंगी किरणांनी सरोवरातील पाणी सोन्याच्या झळाळीने चकाकत होते. दिवसभर घरट्याबाहेर असलेले पक्षी थकून-भागून, थव्याथव्याने  आपापल्या घरट्याकडे परतत होते. पेलिकन्स, सीगल, इग्रेट, किंगफिशर, ग्रीन बी इटर, काईट, रेडशंक, स्पूनबिल, कार्मोरन्ट इत्यादी पक्ष्यांची आकाशात अक्षरशः सभा भरली होती.  कासम आम्हाला तिथल्या पक्ष्यांची माहिती सांगत असतानाच त्या पक्ष्यांच्या किलबिलाटाचे पार्श्वसंगीत सुरु होते. जणू ते पक्षी आपली दखल घेण्यास भाग पाडत होते. भल्या पहाटे भेटण्याचे वचन देऊन ते पक्षी आपापल्या घरट्याच्या दिशेला रवाना झाले.

दुसऱ्या  दिवसाची सुरुवात, लाखोंच्या संखेने स्थलांतरित झालेल्या रोहित पक्ष्यापासून  करायची होती. तीन चार फूट उंची लाभलेल्या या पक्ष्यांना  लांब मन, उंच पाय आणि लांबसडक पंखांचे वरदान ! निखळ सौंदर्य ! हे सैबेरिअन पक्षी आपल्या उपजीविकेसाठी कच्छ नंतर नल सरोवराला पसंती देतात नि जवळपास सहा-सात महिने आपला मुक्काम या ठिकाणी ठोकून असतात.  या काळात या परिसरात लाखोंच्या संख्येने गुलाबी चैतन्य भरून राहिलेलं असतं . निसर्गप्रेमी, छायाचित्रकार यांच्यावरच नाही तर त्या सरोवरात पर्यटकांच्या पोटापाण्याच्यी सोय करणाऱ्या आदिवासी कुटुंबावर सुद्धा त्यांचे उपकार आहेत. आपले कर्तव्य बजावणाऱ्या वन विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच इथल्या आदिवासी कुटुंबाकडूनही या स्थलांतरित पाहुण्यांची पुरेपूर काळजी घेतली जाते. ठरल्या प्रमाणे पहाटे उठून, सर्वसाधारणपणे  सूर्योदय होण्यापूर्वीच,  कासम आणि त्याचे सहकारी  यांच्या सोबत एका नावेत दोन-दोन असे मिळून  सरोवरातील प्रवास सुरु झाला . कानटोपी घालूनसुद्धा,  थंड हवेमुळे नाकातून  थेंब ठिबकत होते. हातात कॅमेरा पण नजर मात्र आकाशात... उंच उंच  उडणारे पक्ष्यांचे थवे मध्येच विविध आकार घेत तर कधी मुरक्या मारत, कधी अवखळ तर कधी शिस्तबद्ध विद्द्यार्थ्यांसारखे एकाच रांगेतून इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्गक्रमण करत होते. हे सारं विलोभनीय दृश्य  नुसत्या डोळ्यांनी टिपून मनः शांती कशी लाभणार ? मग त्यासाठी  कॅमेऱ्याचे हात वर यायचे. त्या अर्ध्या -एक तासाच्या प्रवासादरम्यान काही पक्ष्यांच्या आकृत्यांनी  कॅमेऱ्याच्या पटलावर सुबक कोरीव काम केलं होतं… कोवळी उन्हं अंगावर सोनेरी किरणांचा वर्षाव करत होती. आजूबाजूच्या निळ्याशार रंगाची जागा आता पिवळ्या तांबूस उबदार रंगांनी घेतली होती. या कोवळ्या उन्हात दूरवर सरोवराच्या मध्यभागी, छोटेखानी भूभागावर  काही  झोपड्या थाटात उभ्या असलेल्या  दिसत होत्या . फारच ओढ लागलेली त्या झोपड्यांची. सकाळ पासून एक कप चहा सोडला तर काहीच नव्हतं  पोटात .  त्यामुळे गरमा-गरम बटाटे पोहे खायला  मिळणार या जाणीवेने जठराग्नी तप्त झाला होता. विचार चालू असता-असता आमची नाव किनारी केव्हा लागली हे कळलच नाही. . गुढघाभर पाण्यात उतरून, एकदाचे झोपडी समोर ठेवलेल्या बाजल्यावर प्रथम कॅमेरा बंगा विसावल्या आणि नंतर आम्ही.
त्या शांत परिसरात दुरून दिसणाऱ्या झोपड्या जवळून पाहता आल्या . झोपड्या तरी कसल्या… संत तुकडोजी महाराज यांच्या कवितेतील झोपड्या होत्या त्या.…
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनी होती चोऱ्या,
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या…
भूमीवरी पडावे, ताऱ्या कडे पाहावे,
प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या…
अडीच - तीन फूट उंचीच्या कुडाच्या भिंतींवर खुलं  आकाश.  नाही म्हणायला डोक्यावर छत -उन्हापासून बचावासाठी बस्स. त्यातच संसार, भांडी-कुंडी, चूल-मुलं. सगळं सगळं काही तेवढ्यात सामावलेलं. त्या आदिवासींच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही नव्हता.  गरिबीचं हे दारूण चित्र आम्ही डोळ्यांनी पाहत होतो.  मात्र त्यांच्या डोळ्यात मात्र आमच्याबद्दलची आपुलकी-जिव्हाळा दिसत होता. आम्ही त्या कुटुंबाचे सदस्य होतो हे आम्हाला त्यांच्या वागण्यातून दिसून येत होतं. तिथल्या निसर्गाच्या  विशालातेसारखं त्यांचं मनही विशाल होतं.    सकाळच्या रम्य वातावरणात गप्पांमध्येच आमची न्याहारी उरकली. दोन तीन तासांच्या छायाचीत्रणामध्ये अग्निपंख पक्ष्यांनी आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले. केवळ मनाला भावणाऱ्या प्रतिमाच नाही तर जीवनाचा अर्थ उलगडणाऱ्या त्यांच्या दैनदिन व्यवहारातून बरंच  काही उमजून गेलो. कॅमेऱ्याच्या पटलावर त्या पक्ष्यांनी  घर तर केलंच  पण आमच्या मनः पटलावर ती  गरीब कुटुंबं घर करून बसली होती. तिथलं दुपारचं जेवण म्हणजे नलसरोवारातील मेजवानीच होती ती. गरम-गरम भाकरी त्यावर लोण्याचा गोळा शेवेची भाजी. तोंडी लावायला कांदा पापड लोणचं. वर दही-साखर. यथेच्छ भोजनाचा आनंद ! 

काही दिवसांपूर्वी पुन्हा नल सरोवर भेट देण्याचा योग आला. स्थलांतरीत पक्षी तेच.. नल सरोवर तेच… शांत परिसर तोच…परंतु तिथल्या आदिवासींच्या झोपड्यांची उणिव मात्र भासली.  त्याबद्दल कासमला विचारले असता, त्याला  गहिवरून आले... जड आवाजात तो सांगत होता, ‘गुजरात सरकारच्या वन विभागाने सर्व आदिवासी कुटुंबाची नल सरोवर मधून उचलबांगडी केली होती. कारण होतं रोहित पक्ष्यांचं संरक्षण.’ ते कारण आम्हालाही पटलं. वन संरक्षण वा पक्षी संवर्धन यासाठी काही कडक नियम असायलाच हवेत आणि  ते काटेकोरपणे पाळलेही गेले पाहिजेत. पण असे करताना निरपराध -गरीब कुटुंबांना त्याची झळ बसता कामा नये असं वाटलं. त्यांचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत याचं तारतम्य बाळगूनच अंमलबजावणी व्हायला हवी. कारण ह्या साऱ्याची अंमलबजावणी करणारा अधिकारी / यंत्रणा शेवटी माणूसच असतो.

स्थलांतरीत  पक्ष्यांच्या स्वागतासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी धडपडणाऱ्या आदिवासी कुटुंबांना स्थलांतरीत व्हावे लागले होते हे जीवनातील शुष्कतेचे प्रतिबिंब वाटले मला.  स्थलांतरीत पक्षी आणि स्थलांतरीत कुटुंब यातील विदारक साम्य जाणून मी अंतर्मुख झालो. कासमने दिलेल्या त्या माहितीने,  खूप यातना झाल्या मनाला. ‘दिवसभराची नावेने फेरी, सकाळचा चहा-न्याहारी, दुपारच जेवण’ या कमाईवरच तर त्या कुटुंबांची गुजराण चालू होती. आपला संसार अगदी  गुण्यागोविंदाने चालू असताना त्यांच्यावर संकटाची  कुऱ्हाड  कोसळली होती. कुठे गेले असतील ? काय खात असतील ? त्या लहानग्यांचं  काय भवितव्य ? अशा एक न अनेक प्रश्नाचं मोहोळ आमच्या मनात घोंगावत होतं. आम्ही हतबल होतो,  परदेशी होतो,  इच्छा असून सुद्धा काही करता येत नव्हतं  याची खंत मनाला डंख मारत होती.  आपल्याला  त्या लोकांना भेटता येणार नाही, त्यांच्या मायेच्या हातच स्वादिष्ट जेवण मिळणार नाही, ती चिल्ल-पिल्लं अवतीभवती बागडायला नाहीत;  यापुढे पक्षांचं सानिध्य मिळणार पण माणसांना मुकणार, या जाणीवेनं अन्तःकरण जड झालं होतं.… माणसाचं जीवन हे असाच असतं का ? आयुष्यभर संकटाशी दोन हात करत राहायच … वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी, भटक्या जमाती बनून फिरत राहायचं. स्थैर्य नाही.  सुख नाही. शांती नाही.  फक्त जगणं ! मरता येत नाही म्हणून जगणं…  मावळतीचा सूर्य विश्रांतीच्या ओढीने क्षितिजाकडे कलत होता. वातावरण प्रसन्न! मात्र  आमची मानसिक स्तिथी  फारच वेगळी. त्यांचे आमच्याशी तयार झालेले अनुबंध, अवती-भोवती वावरणारी, खेळणारी मुलं डोळ्यांसमोरून हालत नव्हती. त्या कुटुंबांच्या त्यागाला मनोमन सलाम करीत त्या पक्ष्यांच्या स्वैर विहाराचे छायाचित्रण करण्यात मी रमून गेलो . अन मनाला तयार केले पुढच्या प्रवासासाठी…
सूर्यास्ताच्या तांबड्या-पिवळ्या रंगाने व्यापलेला सभोवतालचा आसमंत, अन घरट्यांकडे परतणारे  पक्षी पाहून , आमच्या मुखातून त्या बाळांना नकळत साद घातली गेली ती या ओळींनी …
या चिमण्यांनो परत फिरारे, घराकडे  आपुल्या…
जाहल्या तिन्ही सांजा  जाहल्या…
दहा दिशांनी येईल आता… अंधाराला पूर …
अशावेळी असू नका रे आईपासून दूर …
चुकचुक  करिते पाल उगाच चिंता मज लागल्या …
या चिमण्यांनो परत फिरारे…..

[ Published in PRAHAR Maraathi newspaper dtd.06/10/2013 ]