Monday, September 7, 2015

त्या उतार वेळी...

त्या उतार वेळी...

त्या दिवशी संध्याकाळी बागेतील एका बाकड्यावर मी शांत बसून  बागेत फेऱ्या मारणाऱ्या वयस्क मंडळींना न्याहाळत होतो… वयाची साठी सत्तरी ओलांडलेली मंडळी… मग ते आजोबा असोत नाहीतर आजी. छानपैकी -अंगात टी शर्ट… पूर्ण इजार… पायात बूट… तसे आजींच्या ही पायात बूट… अशा जय्यत तयारीत बागेत प्रवेश होताना दिसत होता त्यांचा. त्यांचे बागेतील मोठ्या पट्यातून फेऱ्या मारण्याचे काम चालू होते.  प्रत्येकासोबत कोणी तरी होतेच. चालता- चालता गप्पा मात्र चालू. 
आयुष्यातील आपल्या जबाबदाऱ्यातून निवृत्त झालेली मंडळी संध्याकाळच्या वेळेस नाक्यावरच्या कट्ट्यावर अगदी गटागटाने गप्पा मारताना नाहीतर बागेत फेऱ्या मारताना दिसतात.  मला थोडी उत्सुकता होती... निवृत्ती नंतरचं शहरातील आयुष्य कसं असतं ? त्यांचे विचार कसे असतात ? त्या विचारांची देवाण घेवाण कशी असते ? त्यांची जगायची रीत कशी ? वागायची रीत कशी ? एकंदरीत त्यांच्या आयुष्याचा प्रवास कसा ? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं, शोधण्याचा म्हणण्यापेक्षा जाणून घेण्याचा माझा प्रयत्न होता… मला प्रश्न पडत होता तो- रोज भेटणारी ही मंडळी रोज काय गप्पा मारत असतील ? हेच जीवनाचे  अंतरंग मला उलगडलेले पाहायचे होते. 
पण मनात लगेच विचार आला…  आयुष्यातील सत्तर वर्षांचा अनुभव काय कमी आहे  ? विषय काय कमी आहेत ? बरं, व्यक्ती वेगळ्या... प्रत्येकाचं आयुष्य वेगळं… त्यातील प्रसंग वेगळे…  पाहिलेले सुखाचे क्षण वेगळे… भोगलेले दुःख वेगळे…
 त्यातीलच दोघेजण गप्पा मारत मारत   माझ्या शेजारी बाकड्यावर येऊन बसले… सावकाशपणे… वयाची सत्तरी पंचाहत्तरी गाठलेले… चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, वार्धक्याने आलेल्या सुरकुत्यांपेक्षा जास्त खोल दिसत होत्या… त्यामुळे चेहरा खाली ओघळल्यासारखा दिसत होता. डोक्यावरच्या केसांनी केव्हाच निरोप घेतलेला दिसत होता. थोड्याफार प्रमाणात कानाच्या  मागच्या बाजूस मानेवर घसरलेले  तुरळक पांढरे  लांब केस मध्येच दिव्यांच्या प्रकाशात चमकत होते. ते दोघे मोठमोठ्याने गप्पा मारताना दिसत होते. आणि असे असूनसुद्धा एकमेकांचे काही शब्द ऐकू येत नसल्याचे त्यांच्या भावचर्येवरून स्पष्ट जाणवत होते… मधल्या काळात ते एकमेकांना भेटले नसावेत असं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते.  माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. बागेतील त्या मंडळींना नुसतंच न्याहाळत बसण्यापेक्षा काहीतरी नवीन उद्बोधक कानावर पडणार, ह्या विचाराने मी संतुष्ट झालो. तरीही मी त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता स्वस्थ बसून राहिलो. नाही म्हणायला मी एक छानसं छोटंसं पुस्तक हातामधून नेलं होतं… त्यात नजर खिळवून माझ्या कानांचे, हत्तीचे कान करून एकाग्र झालो…
‘काय रे नारायणा, अरे कुठे होतास इतके दिवस? भेट नाही की फोन नाही… ना एखादा निरोप…
त्या रामदासाकडे चौकशीही केली… पण हाती काहीच लागलं नाही…’ माझ्या शेजारी बसलेल्या काकांच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
माझ्या लक्षात आलं… बाकड्याच्या त्या टोकाला बसलेले नारायण काका होते. माझ्याकडेच त्यांचे तोंड होते. पण अलीकडे बसलेल्या काकांची मात्र माझ्याकडे पाठ होती.  एका अर्थी ते बरेच होते माझ्यासाठी… नारायण काका बरेच दिवस बागेत फिरायला आलेले नव्हते म्हणजे काही तरी विशेष असणार त्यांच्याकडे आणि तेच मला आज ऐकायला मिळणार, अशी माझी पक्की खात्री झाली…
‘अरे कुलकर्णी,  मी गावी गेलो होतो. बरेच दिवस योजत होतो… पण जमत नव्हतं. पण शेवटी जमलं एकदाचं… आलो जाऊन… अरे छान पंधरा दिवस मित्राकडेच राहिलो होतो…  माझा बालमित्र. अगदी लंगोटी यारच म्हण ना. त्या कोकणच्या लाल मातीतलं आमचं खेळणं… बागडणं… त्या वातावरणातलं हसणं… खिदळणं… सारं सारं काही उराशी साठवून यावेळेस गेलो होतो गावी… आयुष्यातील सोळा-सतरा वर्षे आणि त्यातलं बालपण त्याच मातीत वाढलं होतं… उमललं होतं… मातीतल्या गंधात एकरूप होऊन गेलं होतं. काजू… फणस… आंब्याच्या रुपात उतरलेल्या, त्या मातीतल्या अमृताची चाखलेली चव अजुनही जिभेवर रेंगाळतेय. तीच चव त्याच बालीशपणाने मला चाखायची होती. त्या खेळाचा आनंद लुटायचा होता माझ्या सवंगड्या बरोबर… त्याच मस्तीत… त्याच धुंदीत… आणि ते ह्या वयात जमतंय का ते आजमावून पाहायचं होतं…’
‘कुलकर्णी, तुला खरं  सांगू ? गेली साठ पासष्ट वर्षांपूर्वीच्या साऱ्या आठवणींवर साठलेली काळाची धूळ मला माझ्या ह्या थरथरत्या हाताने हळुवार बाजूला सारायची होती.  त्यानंतरचा त्याच्या ताजेपणाचा सुगंध मला हुंगायचा होता… काय ते दिवस होते… मित्रा, माझं बालपण फार फारच मजेत गेलं… शिक्षणही  बरं  चाललं होत… पण माझ्या शालेय जीवनांतच माझ्या डोक्यावरचं छत्र हरपलं. माझे बाबा आम्हाला सोडून गेले. अकस्मात. कुठली रोगाची साथ आली अन संपलं सगळं. आमचं कुटुंब तसं छोटंच होतं.  दोन बहिणी आणि मी. सगळी जबाबदारी आईवर येऊन पडली. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे थोडं सावरलं गेलं पण शेवटी प्रत्येकाचा संसार… कोण कुणासाठी किती करणार ? कुणाला दोष द्यायचा ?’
‘एक मुलगा म्हणून  कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर होती. कशी बशी दहावी पूर्ण केली अन बाहेर पडलो ते थेट मुंबापुरी. अरे मुंबईतही येऊन राहायचं म्हणजे कुणाचा तरी आधार हवाच… त्याशिवाय स्थैर्य येणं कठीण. आपलं म्हणायला आणि मानायला कोणीतरी असावंच लागतं… माझ्या काकीकडून मला ते मिळालं…  त्यांच्याकडेच माझं सगळं स्थिरस्थावर झालं… नोकरी मिळाली. बहिणींची लग्नं झाली… हळू हळू सगळं मार्गावर येऊ लागलं… शेवटी विवाह बंधनात गुंफून घ्यायची माझी वेळ होती… कोकणातल्या एका सुशील कन्येशी माझा विवाह झाला… कुटुंबाला आधार मिळाला… संसाराची घडी नीट बसली… आणि माझा संसारिक जीवनप्रवास सुरु झाला.  खूप उशिरा कन्या रत्न झालं. खूप आनंदी झालो आम्ही. गिरणगावातील दहा बाय दहाच्या खोल्या म्हणजे एकत्रीत कुटुंबासाठी कबुतरांची खुराडीच म्हणायची…  अशा  छोट्या खोलीत दिवस काढायचे म्हणजे दिव्यच म्हणावे लागेल. काही दिवस तसेच काढले.  पण मग गिरणगाव सोडावे लागले. कन्या मात्र इकडेच राहिली… आजी-आजोबांकडे. तिचं शालेय शिक्षण चालू होतं…’
माणसाचा जीवन प्रवास असाच… सुख-दुःखाचे चढ उतार अगदी स्वाभाविकपणे चढायचे… उतरायचे… त्याला इलाज नसतो. प्रत्येकजण आपापल्या परीने… कुवतीने त्यावर मात्रा शोधत असतो. केव्हा ती लागू पडते तर केव्हा नाही… पण माणूस जगायचा… चालत राहायचा थांबत नाही… हीच तर जीवनाची खासियत आहे…’
‘कुलकर्णी, आम्ही ठाण्याला असतानाच माझे श्वसुर वार्धक्याने गेले.  सासूबाई घरी एकट्याच… माझी पत्नी, एकुलती एक कन्या असल्याने आम्हाला परत गिरणगांवात येऊन राहावं लागलं. शिवाय माझी कन्या तिथे… त्यामुळे सारा संसार पाठीवर उचलला आणि लालबागच्या त्या छोट्या खोलीत विसावलो. मध्येच माझ्या नोकारीवर गडांतर आले. विवंचना वाढल्या… मानसिक खच्चीकरण झालं… त्या काळात माझा आधारस्तंभ म्हणू माझी पत्नी माझ्या मागे उभी राहिली.  त्यातूनही सावरलो. भांडुपच्या एका नामांकित कंपनीत मला चांगली नोकरी मिळाली… सगळं कसं छान चालत राहिलं… एका बाजूला संसार सुरळीत चालला होता आणि दुसरीकडे कन्येचं शिक्षण चांगल्या पद्धतीने चाललं होतं. खूप मेहनती माझी मुलगी… शिक्षण पूर्ण होऊन तिला चांगली नोकरी लागली. तशी सुशील आणि प्रमाणिकही… आता तिची जबाबदारी जवळ येऊन ठेपली होती. केव्हा ना केव्हा दोनाचे चार करायचे तर मग ह्या कार्याला उशीर का ? म्हणून चांगलं स्थळ शोधून तीचं मंगलकार्य करून टाकलं…’
‘पण कुलकर्णी, नाशिबाचे फेरे कुणालाही चुकलेले नाहीत. थोड्याच दिवसात तिच्या संसाराची राख रांगोळी झाली. उदयास आलेली स्वप्नं धुळीस मिळाली. नैराश्याने पाठलाग सुरु केला.  ऐन उमेदीत असह्य धक्का… त्यातून सावरणे तसं अवघड असतं. प्रत्यक्षात साकारत असलेल्या त्या भातुकलीच्या खेळाची सुरुवातच, संपण्याने झाली. अरे, ह्या कोवळ्या वयात खरं तर असे धक्के माणसाच्या आयुष्यात कधीच यायला नकोत रे. आयुष्य म्हणजे असंच सारं असतं हेही मान्य.  पण ते ह्या वयात भोगायला लागावं ह्यापेक्षा दुसरं दुर्भाग्य नाही… तिच्या आयुष्याच्या ह्या उमेदीच्या वळणावर तिच्या वाट्याला आलेल्या दुःखातून सावरणं तर आवश्यक होतं… समोर एक विराण वाळवंट … भर दुपारच्या कडक उन्हाने तयार झालेल्या मृगजळा सारखं दिसणारं आशावादी आयुष्य… खरंच प्रत्येक्षात तिच्या वाट्याला येणार होतं की नव्हतं याची खात्री नव्हती…’
‘दूसरीकडे माझी दुसरी नोकरीही गेली. आमची कंपनीच बंद झाली… पुनः त्या वयात नोकरीसाठी वणवण… मानसाला कडक उन्हाचे चटके बसले तरच सावलीची महती कळते… तेच परिस्थितीचे कडक चटके मला बसत होते…’
मानवी जीवनातील अत्यंत मोलाची भूमिका बजावणारा… ‘काळ’, हा आपल्याच गतीने चालत राहतो… अन त्याबरोबर आपल्यालाही चालत राहावं लागतंएक आशावाद उराशी बाळगूनपदरी आलेल्या निराशेवर काळ हाच जालीम उपाय असल्याची जाणीव मनाला पटवून देऊन मार्गक्रमण करत राहतो माणूस…’
‘त्याच सूत्राने मला माझी नवीन नोकरी मिळाली… घर स्थिरस्थावर झालं…. कालक्रमण चालू होतं तसं आयुष्यक्रमणही चालू होतं. कन्येच्या त्या मानसिक धक्यातूनही तिचं सारं चित्त नोकरीत. आपल्या व्यवसायात गुंतलं होतं ही  एक त्या वेळेपुरती तरी समाधानाची बाब होती आमच्यासाठी… तिचा हा स्वभाव, तिला तिच्या भावी आयुष्याच्या जडणघडणीस सहाय्यभूत ठरला. लवकरच एक चांगलं स्थळ आलं अन ती आनंदाने संसारात एकरूप झाली. सर्वस्वी स्वतःची जबाबदारी समजून. गेल्या काही काळात आमच्या संसारावर आलेलं चिंतेचं अन दुःखाचं मळभ दूर झालं. आमचा संसाररूपी रथ आनंदाने चालत राहिला… सगळं कसं व्यवस्थित मनासारसं चाललं होतं… माझ्या कन्येला एक गोंडस कन्यारत्न झालं. आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. घरात एक बाळ. तेही माझ्या कन्येनंतर पहिलंच. सामान्य   आई वडिलांना आणखी दुसरं काय हवं असतं ? आपल्या बाळाचं आयुष्य सुखी समाधानी असावं एवढंच. तीच सार्थ अपेक्षा परमेश्वराने पूर्ण केली आमची…’
नारायण काकांचं चाललेलं कथन मी तर कान टवकारून ऐकत होतो. तसंच कुलकर्णी काकासुद्धा मन लावून ऐकत होते. खरं तर त्यांचंही आयुष्य तेवढ्याच उंचीचं, खोलीचं असणार… तरीही एक जिव्हाळा होता त्यामागे.  जीवनाच्या मावळत्या काळात एक मित्र म्हणून एकमेकांना नैतिक पाठबळ देणं… आधार देणं हे मैत्रीचं प्रथम कर्तव्य आहे हे ते पूर्णपणे जाणून होते. चार शब्द ऐकून समोरच्याचं दुःख हलकं होण्यास मदत करायची; अन दोन शब्दांनी  मानसिक आधार वा पाठबळ द्यायचं, हे गणित त्या वयात सर्वांनाच अनुभवाने अवगत असतं…  माझ्या लक्षात आलं… नारायण काका आज आपला जीवनग्रंथच कुलकर्णी काकांसमोर वाचत होते…
‘आम्ही शोनुल्याचं म्हणजे माझ्या नातीचं बालपण बघितलं… तिला अंगाखांद्यावर खेळवल्याचं सुख उपभोगलं… माझी पत्नी तर खूप आनंदी होती. त्यातच सहा सात वर्षे कशी पाखरासारखी  भुर्रकन उडून गेली हे कळलं सुद्धा नाही. पण माझ्या पत्नीच्या डोळ्यांच्या आजारामुळे तिची नजर एकदम कमी झाली. तिला दिसेनासं झालं… औषधोपचार करूनही काही विशेष फायदा झाला नाही. घरात वावरणं सवयीचं झालं होतं तिला.  पण बाहेर जाणं कमी झालं. हळूहळू  घरातली हालचालही कमी झाली. मनाने एकदम खचून गेली ती. अन तिने बिछाना पकडला तो परत कधीही न उठण्यासाठी… त्या काळात तिचे शारीरिक हाल झाले… ते हाल पाहवत नव्हते मला… पण ह्या वयात मी तरी काय करू शकणार होतो ? सर्व काही परमेश्वराच्या हवाली केलं होतं… तरीही एक दिवशी ह्या पृथ्वीतलाबरोबर माझाही निरोप घेऊन ती स्वर्गलोकी झाली.  खूप यातना झाल्या रे… कुलकर्णी, ज्या वयात माणसाला खरोखरच एका साथीदाराची गरज असते त्या काळात असा वियोग होणे मनाला सहन नाही झालं. पुरता कोलमडून गेलो. पण  समोर पिल्लू होतं आमचं…  तिचा सुखी संसार होता… मन रिझवायला  नात होती… इथेही पुढे काळ उभा राहिला. मित्रा, काळापुढे सगळे नतमस्तक !’
‘मित्रा, तेव्हापासून माझा आधार माझी कन्याच.  तिच्याकडेच माझं उर्वरित आयुष्य व्यतीत होत आहे. पाहुणे मंडळी, नातलग थोड्या दिवसांचेच असतात ह्या मुंबईसारख्या शहरात. प्रत्येकजण आपापल्या व्यापात. कुणाला वेळ असणार आपल्यासाठी वेळ द्यायला ?  माझं जीवन असं एकमार्गी झालं. उर्मी खलास झाली. निवृत्तीनंतर काय करायचं हा फार मोठा प्रश्न असतो माणसापुढे.   त्याला उत्तर तेव्हा मिळतं, जेव्हा आपल्या भाव-भावना वाटून घ्यायला आपलं हक्काचं माणूस आपल्या जवळ असतं. की ज्याने आपल्या बरोबरीने संसाररुपी रथ हाकलेला असतो… सुख दुःखात साथ दिलेली असते… कठीण प्रसंगी परमेश्वरासारखी, भक्कम आधारस्तंभ म्हणून पाठी उभी राहिलेली असते… केव्हा केव्हा वाटतं आपलं आयुष्य कुणासाठी ओझं म्हणून राहायला नको… त्यांच्या संसारात अडचण म्हणून आपण नसावं… अशा प्रकारचे विचार कितीही मनाला काट्यासारखे  बोचत असले, तरी आहे ह्या परिस्थितीत दिवस काढल्याशिवाय पर्याय नाही. अर्थात कन्येच्या वागण्या-बोलण्यातून मला कधीही असं जाणवलं नाही. तो तिचा स्वभावच नाही.  किंवा जावईबापूंच्या मनालासुद्धा हा विचार कधी शिवला नाही…   हेही माझ्या पूर्व जन्माचं संचित आहे हे मात्र नक्की…’
 ‘कुलकर्णी, आपण बघतोच ह्या समाजात काय चाललंय ते… पोटची पोरं एक-दोन नाही तर चार-चार  असून सुद्धा म्हातारपणात हाल होतात लोकांचे. त्याही पलीकडे, पोरं सुजान असली तरी ह्या शहरी संस्कुतीमुळे त्यांच्या वागण्यात बदल झालेला असतो… घरी सुबत्ता… सगळी व्यवस्था असून सुद्धा आपल्यासारख्या इतर वृद्धांना वृद्धाश्रमात राहावं लागतं ह्याला काय म्हणावं… बोल ? त्यांचंही काही चुकतंय असं नाही वाटत… अरे ह्या जगाची संस्कृतीच बदललीय… जगण्याची रीत बदललीय आणि त्याच बदललेल्या जगाचा ते घटक आहेत म्हटल्यावर ते तसेच वागणार… प्रत्येकाने आपलं स्वतःचं, स्वतःभोवती एक वलय करून घेतलंय. त्यात ते आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त कुणालाही सामावून घेत नाहीत. आई-वडील हे कुटुंबातले सदस्य तोपर्यंतच, जोपर्यंत त्यांचं आपलं स्वतःचं असं कुटुंब तयार होत नाही… बस नंतर संपलं… जाऊदे, आपल्या नाशिबाने तशी वेळ आपल्यावर आणली नाही ह्याबद्दल परमेश्वराचे आभारच मानावे लागतील.’ नारायण काका आपल्या मनात घुसमटत असलेल्या विचारांना वाट मोकळी करून देत होते. भोवतालच्या परिस्थितीचं विदारक चित्र ते कुलकर्णी काकांसमोर वाचत होते… कुलकर्णी काकांचंही जवळपास तशाच प्रकारचं शल्य. दोघांचाही वार्धक्याच्या दिशेने प्रवास… फक्त वाटा वेगवेगळ्या… भोवतालची परिस्थिती वेगळी…’
‘नातीचं शिक्षण अन शाळा ह्यातच मी रमून गेलोय. दिवसभराचा वेळ, घरात एकट्याला भूतासारखा खायला उठायचा. परंतु हळूहळू  सवय झाली त्या मोकळ्या वेळाची.  नित्य नेमाने वर्तमान पत्रं पिंजून काढायची हा ठरलेला शिरस्ता. सहा वर्षे झाली…. पण आता सारं सारं काही अंगवळणी पडलंय…’
‘परवा गावी गेलो.  हरिणीच्या पाडसासारखं दुडूदुडू उड्या मारणारं बालपण मी पुन्ह्यांदा अनुभवलं. मनातल्या सर्व इच्छा… ज्या आयुष्यात कधी योजल्या नव्हत्या त्या पूर्ण झाल्या… जी स्वप्नं कधी पाहण्याचं मनांत आलंच नाही तिही पूर्ण केली माझ्या मित्राने… ‘हा माझा मार्ग एकला’ ह्या सूत्राने माझं आयुष्यक्रमण चालू होतं. विधात्याने दिलेला जन्म त्याच्याच इच्छेपर्यंतच्या काळासाठी ह्या देही ठेवायचा हेच अनुक्रमलं  होतं  मी. माझ्या मित्राचा बेत काही वेगळाच होता. त्याची पंचाहत्तरी साजरी करण्याचा बेतच मला गावी घेऊन गेला होता.  त्याच्या आणि माझ्या वयात जास्त अंतर नव्हतं… फक्त दहा दिवसांचं. मी गांवी गेल्यानंतर आम्ही आमच्या बालपणाला आमंत्रित केलं होतं… त्याच मस्तीत चालत होतो… वागत होतो… राहात होतो… मीही खूप आनंदात होतो त्याच्या त्या कार्यक्रमामुळे. कारण असे योग खूप कमी येतात…’
‘त्या दिवशी बरीच धावपळ… घरातील सदस्य… मित्र मंडळी… सारे व्यस्त… पाहुण्यांची उठबैस… ये जा… सगळं  कसं  छान चाललं होतं… सर्व तयारी झाली… कार्यक्रमाची वेळ समीप येऊन ठेपली… तसे सर्वजण माझ्या दिशेने… मला काहीच कळेनासं झालं…   त्यांनी माझा हात हळुवार हातात पकडला आणि त्या पवित्र खुर्चीत नेऊन बसवलं… मी अवाक ! हे काय चाललंय… कार्यक्रम कोणाचा… कोणासाठी… ह्या माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्यावर मित्राचा हळुवार हाथ फिरला…. पाठीवर प्रेमाने थाप पडली… तसा मी शांत झालो. तो पंचाहत्तरीचा कार्यक्रम खास माझ्यासाठी आयोजित केला होता त्यांनी आणि त्यात त्यालाही न्हाऊन निघायचं  होतं. माझ्या आयुष्याच्या मावळत्या काळात पुन्हा नव्या उमेदीने उर्वरित आयुष्य जगायला प्रेरणा देणारे  ते संस्कार अनुभवून खरच मी निःशब्द झालो होतो… माझा कंठ दाटून आला होता… स्वर ओला झाला होता… मनाचा बांध  आता फुटला होता… डोळ्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली होती… मित्राने आणि त्याच्या कुटुंबीयांनी आमच्या मैत्रीच्या जागेपणाला एक वेगळा आकार देऊन वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते… मी शांतपणे डोळे मिटून  बसलो होतो… जसे संस्कार होत होते तसे माझ्या डोळ्यांसमोर माझी पत्नी उभी ठाकली होती. तिच्याच करकमलांनी माझ्या अंगावर पुष्पवृष्टी होतेय असा भास होत होता… मला तिची ती प्रेमाची उब क्षणाक्षणाला जाणवत होती… त्या पाच दहा मिनिटांत माझा साठ वर्षांचा संसार आठवला…. त्यातले प्रत्येक सुखाचे क्षण आठवले त्यामागच्या प्रेमळ भावनांची अभिव्यक्ती आठवली… महाभारतातल्या भगवान श्रीकृष्णासारखं तिचं आमच्या संसाराचं सारथ्य आठवलं… आणि मी दिपून गेलो.   डोळे उघडले तेव्हा मी भानावर आलो. समोर मित्र आणि माझी वहिनी  होती… मी कृतकृत्य झालो होतो मनात आभार मानत होतो  माझ्यासमोरसाक्षात परमेश्वर म्हणून  उभ्या असलेल्या दाम्पत्याचे.… त्या कुटुंबियाचे आणि हे नातं शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात सिंहाचा वाटा  असलेल्या माझ्या प्रिय पत्नीचे.…
‘मित्रा, मला त्यादिवशी प्रकर्षाने आठवण आली रे तिची. त्या घरात त्या रात्री त्या सगळं आनंददायी वातावरण असूनसुद्धा मला मात्र झोप नाही आली. माझ्या हळव्या मनचक्षुसमोर एक  प्रतिमा  दिसत होती. तो समाधानी चेहरा काहीतरी सांगू पाहत होता… आपल्या मनातलं इंगित माझ्या कानात हळुवार व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता… माझा ह्या इहलोकीचा कार्यभाग संपलेला आहे…? आता मी परतायला हवं…? इथंला निरोप घेऊन तिच्या कडे जायला हवं…? असं तर तिला सांगायचा नसेल ना ?’ ही वाक्य उच्चारता उच्चारता ते कुलकर्णी काकाचं शरीर गदागदा  हलवून त्यांना  विचारात होते… डोळ्यातील आसवांनी त्या  चेहऱ्याच्या सुराकुत्यांमधून  मार्ग शोधत खाली घरंगळायला एव्हाना सुरुवात केली होती. त्यांच्या त्या थरथरत्या ओठांतून एकच वाक्य बाहेर पडत होते… आज ती असायला हवी होती…. आज ती असायला हवी होती… '
कुलकर्णी काकां त्यांना शांत करत हातात हात घालून, त्यांना घेऊन गेले… पण मी मात्र तिथेच त्या बाकड्यावर बसलो होतो… त्या बागेतील दिव्यांच्या प्रकाशात लुप्त होणाऱ्या त्यांच्या  पाठमोऱ्या आकृतीकडे निश्चल पणे एकटक बघत… रस्त्यांच्या कडेला असलेल्या दिव्यांच्या खांबासारखे, आयुष्याच्या वळणा-वळणावरील सुख-दुःखांचे दिवे न्याहळत…
                         -----x----

दिनांक- 26-12-2013                                                     

Published in Prahar Marathi newspaper

http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=16,1532,2220,2270&id=story5&pageno=http://epaper.eprahaar.in/29062014/Mumbai/Suppl/Page4.jpg



&

http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=18,1638,2228,2266&id=story5&pageno=http://epaper.eprahaar.in/06072014/Mumbai/Suppl/Page4.jpg

2 comments: