Monday, September 7, 2015

मानवतेचे मंदिर…

मानवतेचे मंदिर…

                सामाजिक जाणिवेची पाळंमुळं, खरं तर माणुसकीत लपलेली असतात. आपल्या भोवतालची कौटुंबिक, सामाजिक विषमता, अशा माणुसकी जपलेल्या सुहृदय माणसाला स्वस्थ बसू देत नाही. बसू देत नाही म्हणण्यापेक्षा झोपू देत नाही. ज्या समाजात आपण जगत आहोत, तिथे सामाजिक बांधिलकी म्हणून त्या समाजाचे प्रति एक परीने आपलं काही देणं लागतं...  ह्या आणि अशाच जाणीवेतून उदयास आलेला एक संगीतमय गट म्हणजे स्वरगंधार!!!
                ह्या संस्थेने आयोजित केलेल्या संगीतमय महफिलीचा एक सहभागी घटक म्हणून बदलापूर येथील  ‘आधार’ संस्थेस भेट देण्याचा योग आला. खरं तर, ह्या उपक्रमात माझा सहभाग तसा अचानक झाला.  कारण होतं… मला असलेली संगीताची आणि गायनाची आवड.  उद्देश तसा दुहेरी !!!  म्हणजे आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते आहे आणि त्यातूनच काही अंशी समाजसेवा साधली जातेय!!!
                पहाटे उठून महाफिलीच्या सर्व जय्यत तयारीनिशी आम्ही ठाण्यावरून सकाळी ९ वाजता बदलापूरच्या दिशेने प्रस्थान केले.  जवळपास दहा वाजता आम्ही त्या निसर्गरम्य परिसरात पोहोचलो. गाडीतून उतरतानाच प्रत्येकजण चक्क आपलं सगळं सामान घेऊनच सभागृहात पोहोचला. तसा थोडासा उशीरच झाला होता आम्हाला तिथे पोहोचायला. त्यामुळे आम्ही लगेच व्यासपीठाचा ताबा घेऊन सामान लावायला सुरुवात केली. व्यवस्थापनाशी अगोदरच बोलणं झालं असल्याने त्यात पुन्हा वेळ दवडला नाही.  मध्येच लगबगीने नाश्ता-चहापान झाला अन ताजे-तवाने होऊन तयारी पूर्ण केली.  कार्यक्रमास सुरुवात अर्थात माझ्याकडूनच झाली. कारण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती.  
                माझ्या समोर येऊन बसलेला श्रोतावर्ग कसा असेल ह्या उत्सुकतेत होतो मी. दोन-चार मुलं सोडली तर सारेचजण कसे शांत बसले होते खाली टाकलेल्या सतरंज्यावर !!!  एक दोघेजण मधूनच आपला हात उंचावून मला नमस्कार करत होते. त्यातले एक वयस्क गृहस्थ माझ्याशी हात मिळवून निघून गेले.  पूर्ण सभागृह लाल रंगाच्या टी-शर्ट मधील मुलांनी आणि वयस्क लोकांनी तसेच मुलींनी तुडुंब भरून गेलं होतं. आमच्या कार्यक्रमाला अशा पद्धतीने असलेली उपस्थिती पाहून मी अचंबित अन आनंदीतही झालो. सुरमयी सकाळला सुरुवात झाली. पहिली दोन-तीन गाणी संपल्यानंतर, श्रोत्यांच्या शारीरिक हालचालींना वेग येऊ लागला. हे सारं मी अगदी निरखून बघत होतो. सभागृहातील तो श्रोता वर्ग व  त्यांची शारीरिक जडणघडण बघून, एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणविली ती- त्या सगळ्यांची शारीरिक घडण सर्वसामान्य माणसासारखी नव्हती. वयोवृद्ध चेहऱ्यावरसुद्धा निरागसता दिसून येत होती. त्या संगीतमय सकाळचं फलित, पूर्ण प्रहर संगीताला वेड्या झालेल्या श्रोता वर्गावरच्या आनंदावरच अवलंबून होतं.
                रविवारच्या त्या सकाळला खरी दाद मिळाली ती, त्या श्रोत्यांकडून, ज्यांच्या आयुष्यात, जग रहाटीप्रमाणे सामान्य माणसाचं आयुष्य जगण्यासाठी सामान्यपणे असलेले तीन प्रहर नव्हते.  कार्यक्रम चालू असताना गाण्याच्या तालावर थिरकत असलेलली त्यांची पावलं अन सळसळणाऱ्या विजेची अंगात संचारलेली चेतना, त्यांना पूर्ण सभागृह नाचायला लावत होती. सलग दीड ते दोन तास ती मुलं शरीराच्या मुक्त हलाचाली करत आनंदाने बेदुंध नाचत होती. ‘कधी नव्हे ते मिळाले साथी, अंतरंगातून सारे गाती !!!’  ह्या उक्तीप्रमाणे सारेचजण आनंदोत्सव साजरा करत होते.
                कार्यक्रम आटोपला. तिथल्या कर्मचारी वृन्दासह सारेजण समाधानी चेहऱ्याने आपापल्या  खोल्यांकडे जायला निघाले.  ती वेळ खरं तर सगळ्यांच्याच जेवणाची.  पण आमच्या दृष्टीने "पोटोबा पेक्षा विठोबा महत्वाचा !!!"  एवढा सगळा पसारा सांभाळणारी आणि त्या मुलांची माता -पित्याप्रमाणे काळजी घेणारी ती संस्था म्हणजे  विठू माऊलीच होती. म्हणून आम्ही मुलांसाठी नेलेला खाऊ सोबत घेऊन व्यवस्थापकांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो.
                साधे दालन. उजव्या बाजूला भिंडीवर संस्थापकांची तसवीर.  टेबलच्या डाव्या बाजूच्या आलमारीवर  कागदी पिशव्यात काहीतरी ऐवज भरून एक रांगेत ठेवलेल्या दिसल्या. त्या पिशव्यांनी आमचं लक्ष वेधून घेतला होतं. कोरीव काम केलेल्या त्या पिशव्या, व्यवस्थापकांनी एक एक  करत आम्हाला भेट वस्तू म्हणून हातात  ठेवल्या ते हे सांगत, " ह्या वस्तू  बाहेरून विकत आणल्या नाहीयेत तर  इथेच मुलांनी बनविल्या आहेत. "
मनात विचार आला -आम्हीच काहीतरी इथे द्यायला आलोय तर मग आपण काय न्यायचं इथून. ती भेट म्हणजे त्या मुलांच्या मेहनतीचं अन कलेचं कौतुक होतं!!! 
                श्री. पटवर्धन यांच्याशी परिचय झाला अन ते संस्थेविषयी बोलू लागले,  “पूर्वी ह्या जागेवर काहीही नव्हतं. मोकळी जमीन. ११ लाख रुपये देऊन ही जमीन घेतली.  ह्या मोकळ्या जागेवर,   समाजातील मतीमंद मुलांच्या संगोपनासाठी अन अशा प्रकारच्या पालकत्वाने व्यथित, हतबल झालेल्या पालकांची मातृ-पितृत्वाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दि. १७ जानेवारी १९९४ रोजी असा पद्धतीचा प्रकल्प सुरु केला. पकल्प सुरु झाल्याच्या तीन महिन्यात संस्थेतील मुलांची संख्या ७० वर गेली.”
                ती संस्था विश्वस्थ मंडळ स्थापन करूनच चालविली जाते.  खुद्द काही विश्वस्थ मंडळींची मुलं इथे आहेत. 'ना नफा ना तोटा' ह्या तत्वावर चालविली जाणारी संस्था, शासनाकडून कोणत्याच प्रकारचं अर्थ साहाय्य घेत नाहीय. त्यामुळे शासनाकडून कसलाच त्रास नाही ह्याचं खूप समाधान दिसलं त्यांच्या चेहऱ्यावर.  संबंधित पालकांकडून मिळणारा देखभाल खर्च आणि देणग्या ह्यावरंच हा सारा डोलारा गेली बावीस वर्ष उभा आहे.  
                संस्थेची प्रेवेशाची प्राथमिक अट एकच- पाल्य मतीमंद असावं. मग त्यात नानाविध असमर्थता असल्या तरी चालतील. आज मितीस संस्थेत २०० मुलांची क्षमता आहे. त्यातील १५५ मुलं आहेत तर ४५ मुली आहेत.  आणि हा भला मोठा दोनशे मुलांना उभं करण्यासाठी भक्कम आधार आहे तो संस्थेत कार्यरत असलेल्या १४० कर्मचारी वर्गाचा. म्हणजे जवळपास एकास एक अशा प्रकारचे सेवेचे गुणोत्तर, इतर कोणत्याही संस्थेत क्वतीतच बघावयास मिळेल.  
                ‘समाजातील मध्यमवर्गीय घटकांची निकड जाणून घेऊन अशा प्रकारची सेवा देणारी आणि भारतातील निवडक संस्थामध्ये तिची गणना होते’ असं श्री. पटवर्धन सांगत होते.
                त्यांच्याकडे केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर दिल्ली, बंगळूर, कलकत्ता इत्यादी ठिकाणाहून, आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी संपर्क केला जातोय. कारण त्या शहरामध्ये अशा प्रकारचा एखादा प्रकल्प राबविला जाऊ शकतो ह्यादृष्टीने कुठे विचारच झालेला दिसून येत नाही.      
                आमची स्वरगंधार संस्था, खारुताईच्या अंगावरून वाहून नेत असलेल्या मदतीपैकी केवळ १० टक्के मातीचे योगदान देण्याचा प्रयत्न करतेय, तर 'आधार' ह्या संस्थेचा समाजाच्या सेवेतील योगदानाचा किती मोठा वाटा असू शकतो ह्याची कल्पना करूनच मन सुन्न होऊन जातं...  त्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघून झालं तसं.
                आज संस्थेत आश्रयास असलेल्या मुलांमध्ये, सर्व प्रकरच्या शारीरिक आणि मानसिक असमर्थता आहेत. त्यावर, त्यांच्याच मानसिक धैर्यावर उभं राहून मात  करण्यात संस्थेला यश मिळत आहे.   आपल्याच  कुटुंबात आई-वडिलांसोबत, भावंडांसोबत, आई-वडिलांच्या शारीरिक-मानसिक-सामाजिक  विकलांगेपोटी, अशा मुलांचं जगणं असह्य झालेलं असताना, त्यांना अक्षरशः दत्तक घेऊन, मांडीवर असलेल्या बाळासारखं, त्यांचं सगळं करण्याची मेहनत घ्यावी लागतेय, त्यांना न्हाऊ घालण्यापासून सकाळ-दुपार-संध्याकाळ घास भरवण्यापर्यंत करावं लागतंय, ही फार मोठी कौटुंबिक जबाबदारी पार पाडली जातेय. कोणत्याही मुलाला संस्था सोडावीशी वाटत नाहीय, घेरी गेलेलं प्रत्येक मूल  चार दिवसांनी पुन्हा 'आधाराला'  "आधार" कडे परत येतंय, ही  किती जमेची बाजू आहे.  कोणाच्याही आयुष्यात इतर कोणत्याही नात्याची जागा घेता येते परंतु आई वडिलांची जागा घेणं वाटतं तेवढं सोपं काम नाहीय.
                त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्यातल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी, मनोरंजनासाठी, देखभालीसाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी जी काय दक्षता घेतली जातेय त्या शक्तीला आणि सामर्थ्यवान माणुसकीला मनोमन सलाsssssम. आणि म्हणूनच, आम्हाला मिळालेलं दुपारचं भोजन म्हणजे अशा ‘मानवतेच्या मंदिरातील महाप्रसाद’ च लाभला होता ह्याचे कधीही विस्मरण होणार नाही. "आधार" नावाच्या मंदिराचा पत्ता-"आधार" , पुलगाव, ठाकूरवाडी, बदलापूर (पश्चिम). महाराष्ट्र.                                
                                                                                  xxxxxx
सुभाष जिरंगे,


भ्रमणध्वनी क्र.  ९९६९० ६०५०४,   
subhashjirange@gmail.com   

Published in  'Mi Marthi'  marathi newspaper on dtd. 23-08-2015 on page no. 15            

4 comments: