Monday, September 7, 2015

निरोप

'श्री अक्षरधन' च्या  'मे २०१५'  च्या विशेषांकामध्ये प्रसिद्ध झालेली पारितोषिक विजेती कथा ---

आयुष्यावर बोलू काही…निरोप     

 संध्याकाळची वेळ.  सारं  आकाश  काळ्या  कभिन्न ढगांनी झाकोळून गेलं होतं.  बाहेरचा  अंधार, सारं आयुष्य दुःखाच्या खाईत  लोटून देत  असल्याचा आभास होत होता.  ढगांचा  कर्णकर्कश   गडगडाट, काळजाची कंपनं वाढवत होता.  वीजांच्या कडकडाटाने धरणी भेगाळून जावी तशी मनोवस्था झाली होती.  घरातील दिवे गेल्याने, देव्हाऱ्यातील मिणमिणत्या  समईचा अंधुक प्रकाश,  उगाचच घरभर पसरण्याचा केविलवाणा  प्रयत्न करत होता.  एव्हाना ढगांच्या रुद्रावताराची जागा, भरधाव वेगाने वाहणाऱ्या  वादळ वाऱ्याने घेतली होती.  तो पिसाटलेला  बेभान वारा  मिळेल त्या जागेतून घरात घुसखोरी करत होता.   दिवाणखान्यातील पडदे वाऱ्याच्या झोताबरोबर चित्र-विचित्र आकार घेत जोरजोरात फडफडत होते.
 वीजांचं तांडवनृत्य  आताशा मुसळधार पावसाच्या सरींमध्ये विरून गेलं होतं.  धो-धो कोसळणारा पाऊस, हळू हळू शांSSSत झाला होता.  आता आमच्या सोबतीला होती फक्त निरव शांतता...सर्वांग जाळून टाकणारी  शांतता...

आज  माझी, परीक्षा होती म्हणण्यापेक्षा, सत्व परीक्षा होती. गेले पाच महिने, अमृत समजून विष पचविण्याची ताकद येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आलो होतो.  ‘ज्या जर्जर आजाराने अन असह्य वेदनेने  तिला अंथारुणावर  खिळून पडावं लागलं होतं, तो आजार म्हणजे  न मागता मिळालेलं दुःखाचं महा संकट होतं. ती पूर्व जन्मातील केलेल्या कर्माची फळं होती की  तो अभिशाप होता ? काहीच कळायला मार्ग नव्हता. पण एक मात्र खरं,  तिचं आयुष्यं, आज मरणाच्या उंबरठ्यावर उभे राहून जगण्याची अपेक्षा करत होतं.  सहस्त्र योनीतून मिळालेला  मानवाचा जन्म,  कसल्याही प्रकारचं ऐश्वर्य न उपभोगता परतीच्या मार्गाला लागला होता. जन्म जन्मांतरीचा प्रवास अखेरच्या श्वासात अडकलेला जाणवत होता मला… ज्या वयात सामाजिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या,  त्याच्या आतच, त्या शरीराला, अगदी न पेलवणाऱ्या कष्टी मनाने,  कर्मभूमीचा निरोप घ्यावा लागणार होता... नियतीनं अगदी निश्चित केलं होतं ते... आणि या साऱ्याची पुसटशीसुद्धा कल्पना नसल्याने, आपल्या आयुष्यावर आलेलं छोटंसं मळभ समजून, ते निर्विकारपणे सावकाश दूर सारण्याचा प्रयत्न करत होती;  पुन्हा  नव्या उमेदीने आयुष्य जगता येईल ह्या विश्वासाने,  आकाशात नजर खिळवून विधात्याकडे पाहात, आशेच्या पायरीवर उभी होती… 

आज मी ठरवलंच होतं.  मनावर दगड ठेऊन... तिला विश्वासात घेऊन सssगळं  काही सांगायचं.  'हे फुलासारखं कोमल आयुष्य काही काळाने कोमेजून जाणार... विधात्याने आखून दिलेल्या चौकटीतच ते फिरत राहणार... वेळप्रसंगी नियतीच्या हातातलं बाहुलं  बनणार... ज्या मातीत जन्म घेतला त्याच मातीत आपलं हे शरीर विलीन होणार... हा जीवन प्रवास कुणालाच चुकलेला नाही. दस्तुरखुद्द परमेश्वरालाही हा फेरा चुकविता आला नाही. मग आपण तर मनुष्यप्राणी.  नियतीच्या हातातल्या कठ्पुतल्या !’

आम्ही एकमेकांच्या खूप जवळ बसलो होतो आज. गेले पाच महिने आम्हाला तसा एकांत मिळालाच नव्हता. चार प्रेमाचे शब्द व्यक्त करायला,  त्याचा आनंद घ्यायला उसंतच मिळाली नव्हती. सारा वेळ दवाखाने...वैद्यकीय चाचण्या... हॉस्पिटल्स... औषधोपचार... यातच व्यतीत होत होता. आणि म्हणूनच आज घरातील सगळ्या मंडळींना नातेवाईकांच्या घरी पूजेनिमित्त पाठविले होते. कारण एकच होतं...प्राणप्रिय व्यक्तीला आज जे काही सांगायचं होतं, ते सगळ्यांसमोर व्यक्त करण्याचं धाडस नसतं झालं. निष्पाप मुलींना, त्यांच्या बालमनावर परिणाम होईल अशी,  गंभीर  आयुष्याची करूण कहाणी ऐकवायची नव्हती. जगण्याचा अर्थ समजण्याअगोदरच, मृत्यूबाबतचं  महाभयावह  चित्र त्यांच्या नजरेसमोर उभं करायचं नव्हतं... आज मनमुराद प्रेमाच्या  गप्पा  मारायच्या होत्या... ते करता करताच आयुष्यावर बोलायचे होते...

परंतु  दिवाणखान्यातील ती भयाण शांतता तोंडातून शब्द बाहेर  काढायला मज्जाव करत होती. माझ्या मांडीवर डोकं ठेवून, निर्विकार चेहऱ्याने  ती श्रांत पडली होती. तिच्या  मनात कोणतं विचारचक्र चालू आहे हे मात्र मला कळत नव्हतं. हरेक प्रकारच्या उपचाराने  हैराण झालेली असताना, शरीरावर  औषधांचे  झालेले   दुष्परिणाम दिसत असतानासुद्धा, सात वर्षांपूर्वीचं एक बिन्धास्त व्यक्तिमत्व दिसत होतं ते.. माझं स्वत्व विसरायला लावणारे  तिच्या डोळ्यातील भाव, मला भूतकाळातील आठवणींच्या हिंदोळ्यावर घेऊन गेले......
‘ते कॉलेजचे दिवस होते… माझ्या आयुष्याची परवड आता कुठे थांबली होती. अर्ध्यावरती सोडलेला शिक्षणाचा डाव, पुन्हा ह्या नव्या शहरात  मांडला होता. शासकीय सेवेत नोकरी मिळाली तरी पुढे शिकण्याची उमेद होती. आयुष्यात सतत कोणत्या न कोणत्या कामात व्यस्त राहायची सवय असल्यामुळेच पदव्युत्तर शिक्षणासाठी, ‘मराठी साहित्य’  विषय घेऊन  अभ्यास सुरु केला.  विधात्याने  ठरवलेल्या सगळ्या गोष्टीं अगदी जश्याच्या तश्याच  होत असतात.  दरम्यानच्या काळात, सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांच्या व्यथेने अस्वस्थ झालेलं मन एका जागेवर स्थिर होत नव्हतं. कदाचित ते वयच तसं  असावं. गरज होती व्याकूळ मनाला शांत होण्याची… मानसिक आधाराची….  त्यासाठी हवी होती हक्काची व्यक्ती. समजणारी… समजून घेणारी…  मनाचा समतोल सांभाळणारी… मायेचा आधार देणारी… ती आर्त साद विधात्याने ऐकली होती.  माझ्याच कार्यालयात तात्पुरत्या काळाच्या  नोकरीसाठी तिची निवड झाली. अगदी थोड्याच कालावधीत  आमचा परिचय झाला.  कार्यालयातील महिला सहकाऱ्यानेच आमचा परिचय करून दिला होता… निमित्त झालं  'मराठी साहित्य' ! शिक्षणाचा प्रवास सुरु होता. सोबत मिळाली… मार्गदर्शन वजा सहकार्य मिळालं… सूर जुळले… भरकटलेले मन, एक चांगली जागा  मिळाल्याचं समाधान मानून,  विसावू  पाहात होतं…

आयुष्यातल्या स्वप्नपूर्तीचा तो दिवस होता…  आम्ही सारासार विचार करुन निर्णय घेतला.   काही प्रमाणात सामाजिक बंधनं झुगारून, एका नव्या विश्वात आयुष्य जगायच्या आणाभाका खाल्ल्या.   संकुचित विचारांची चौकट तोडून आमच्या प्रेमाच्या नात्याला विवाह बंधनात गुंफून टाकलं. उज्वल आयुष्याची वाटचाल आम्ही सप्तपदीने सुरु केली. घरच्या मंडळींचा रोष पत्करून,  सारं काही सोडून जीवन जगण्याची हमी देत ती माझ्यासोबत सहचारिणी बनून आली होती.  तिचा तो समंजस, प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावच मला आजचं जग दाखवू शकला... भौतिक परिस्थितीवर मात  करून गेला...आमच्या प्रेमाला अखंड आयुष्याच्या बंधनात बांधून गेला... सुखी संसाराची साकार होणारी स्वप्नं  दाखवून  गेला... अस्थिर मनाला एक भक्कम कोंदण मिळाळं  होतं, तर व्यथेला, दुःख हलकं  करायला एक कूस मिळाली होती.  स्त्रीचं मन हे किती उदात्त असतं ! सर्वसमावेशक ! त्याला सागराची गहराई असते... आकाशाची उंची असते... अंतराळाची  व्यापकता असते... किती क्षम्य... क्रियाशील... उदयोन्मुख... विशाल... ह्या साऱ्यामुळेच आमच्या संसाराची घडी चांगली बसली. सुख-दुःखाच्या समयी एकमेकांना साथ देत, सुखी संसाराचा गाडा अगदी सुरळीतपणे चालला होता. आमच्या प्रेमाच्या पाउलखुणा... दोन कन्या ! त्यांचं बालपण... संगोपन... सगळं  कसं  सुखात चाललं होतं. दृष्ट लागावा असा संसार चालला होता आमचा.

 पण काट्याविना फूल नाही...दुःखाविना संसार  नाही... तद्वतच, आमच्या संसाराला  ग्रहण लागलं. अंगावर काढलेला, तो साधा वाटणारा खोकला, क्षयरोगामध्ये प्रणीत झाला होता. अगदी महिनाभराच्या कालावधीत, त्यावरील औषधांना साथ न देता  तो ‘एमडीआर टी बी’ म्हणून  शरीरामध्ये घट्ट पाय रोवून बसला. औषधांचा हवा तसा परिणाम दिसून येत नव्हता.  खालावत चाललेली शरीर  प्रकृती,  रोगाचं   निदान योग्य  रीतीने झालं नसल्याच स्पष्ट करत होती. आता आम्ही बायप्सी करण्याचा निर्णय घेतला.  बायप्सी करताना ऑपरेशन थियटर मध्ये डॉक्टरांनी जे चित्र दाखवलं त्याने बेशुद्धावस्थेत गेलो. अंधाराचा महाभयानक राक्षस  डोळ्यांसमोर दत्त म्हणू उभा राहिला होता.  एका धास्तीने मन पोखरून टाकलं होतं. सर्व कुटुंबियांनाच रिपोर्टची प्रतीक्षा  लागली होती. रिपोर्ट निगेटिव्ह यावा म्हणून ते सात दिवस परमेश्वराच्या याचनेतच गेले. तो दिवस अजूनही अंगावर शहारे आणतोय. त्या रिपोर्ट मधले 'फास्ट ग्रोविंग लंग कार्सिनोमा-३-बी स्टेज- (फुफुसाचा कर्करोग)' हे शब्द काळजाला भोक पाडून आरपार मेंदूत गेले.  मी कोसळलो…  डोळ्यांसमोर गडद अंधार... समोरचं  काहीच दिसेनासं झालं होतं. मला स्वतःला सावरणं  अशक्य झालं.  भावनेचे बांध तुटले… हंबरडा फुटला… धाय मोकलून लहान बाळासारखा रडत होतो…त्याच जागेवर….एकटाच… डोळ्यांतून ओघळलेले  अश्रू, माझ्या थंड पडलेल्या गालावरून खाली घसरून त्या रिपोर्टवर पडत होते. मला भानच उरलं नव्हतं कशाचं.   तिचे भाऊ, बहिण, नातेवाईक… सारेजण मला शांत  करत होते… धीर देत होते... त्या आर्जवांना न जुमानणारा माझा आक्रोश अखंsssड चालू होता… आजाराच्या  अजस्त्र अजगराने तिच्या आयुष्यालाच  विळखा घातला होता, कधीही न सुटणारा… त्या असह्य वेदना, थेट काळीज कापून रक्तबंबाळ करत होत्या… मृत्यूची घंटा वाजली  होती. आता फक्त मानसिक सामर्थ्यावर जिवंत राहण्याचा प्रयत्न करायचा होता… मानसिक धैर्यच आता कामी येणार होतं. औषधांची मात्रा कितपत लागू होईल याची खात्री बाळगता येत नव्हती…

 विज्ञान कितीही पुढे  गेलं असलं  तरी निसर्गाच्या स्पर्धेत मात्र ते मागच राहतं… नियतीबरोबरच्या खेळात त्याची हारच होते…  निसर्ग आणि नियती ह्यांच्यातील ही  अहमहमिका अशीच अव्याहत  चालू राहणार… हे जरी सत्य असलं तरी, सारच नियतीवर सोडून चालणार नव्हतं. मृत्युच्या जबड्यातून बाहेर काढायची ताकद  मात्र विज्ञानामध्येच आहे, हाच एक आशाभाव उराशी बाळगून उपचार सुरु केले.

ह्या आजाराची कल्पना येऊ नये म्हणून खाजगी इस्पितळ गाठलं, तेही  ‘टाटा  हॉस्पिटल’ मधील डॉक्टरांचा सल्ला  घेऊनच. सगळेच हतबल… हताssश झालो होतो.   महागड्या  आजाराचे  महागडे उपचार… स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जेवढी कुतरओढ करावी लागली नाही, त्याच्या कितीतरी पटीने मला पैशासाठी वणवण भटकावं लागत होतं. पैशाचं सोंग करता येत नव्हतं.  नातेवाईकांनी सर्वोतोपरी आपापली कर्तव्य बजावली होती. संकटकाळीच माणसाचा खरा चेहरा समोर येत असतो. माणसाला शहाणपण शिकवून जाणारा खरा कोण असेल तर स्वतःवर ओढवलेला कठीण प्रसंग… तो जगाकडे  एका वेगळ्या नजरीयाने बघायला लावतो… ह्या अडचणीत मला,  जवळचे, दूरचे, आप्तेष्ट, नातेवाईक,  मित्र परिवार …सगळेच आपले वाटू लागले. मी संपलो होतो… माझं  हळवं मन जखमी झालं होतं… हवालदिल होऊन निपचित पडलं होतं. त्या  कठीण समयी सर्वांकडून आधार मिळाला म्हणूनच,  पांच महिन्यानंतरही तिची आज सोबत होती.  त्या जीवघेण्या प्रसंगी मी एकटा खूप कमी पडत होतो. तरीही माझी जबाबदारी मला स्वस्थ बसू देत नव्हती. जिथे जिथे म्हणून मदतीसाठी फिरलो तिथे तिथे देवासारखी माणसं भेटली. सगळ्यांचे आभार मानत गेलो… कृतज्ञता व्यक्त करत गेलो… तरीही त्यांच्या उपकाराची परतफेड होणं ह्या जन्मी तरी  अशक्य आहे. कारण जे पांच महिने मला तिचा सहवास   मिळाला,  ते  बोनस लाइफ  होतं आणि म्हणूनच मी आजही त्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. ते लोक देवच होते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियांसाठी… ज्या संबंधित व्यक्तींच्या वाचनात हे येईल, कदाचित ते अचंबित होतील…

एका गोष्टीचा अजूनही उलगडा नाही झाला… जर पृथ्वीतलावरील माणसं देव बनून मदतीला धावून आली होती तर, आस्तिक म्हणून   तिने आयुष्यभर ज्याची भक्ती केली,  पूजापाठ केले,  उपासना केली,  त्याचा  मनोभावे केलेला धावा, त्या परमेश्वराच्या कानापर्यंत, हृदयापर्यंत  का पोहोचत नव्हता ??? तिची आSSर्त साद त्याला का ऐकायला येत नव्हती ??? तो दगडाच्या काळजाचा का झाला होता ??? तो इतका  संवेदनशुन्य  का झाला होता ???  आपल्या संसाराची घडी नीट बसावी म्हणून दिवस रात्र काबाडकष्ट करत जीवन प्रवास सुरु होता...  दोन कन्या आणि त्यांचं उज्वल भवितव्यही  एक मोठी  कौटुंबिक  जबाबदारी होती.  आपल्या डोळ्यादेखत स्थिरस्थावर झालेली मुलं, त्यांचा सुखी संसार, अगदी सामान्य माणसाच्या सरळ  आणि  साध्या अपेक्षेप्रमाणे,  आपली नातवंडं पाहण्याची आशाच, एक जिद्द बनून, त्या महाभंकर आजाराशी दोन हात करत होती.  त्या वैद्यकीय उपचारादरम्यान खूप शारीरिक हाल सोसावे लागत होते तिला.   औषधांचे सामर्थ्य, शरीरावर दुष्परिणामांच्या खुणा ठेवून जात होते…

तिने माझा एक हात दोन्ही  हातात घट्ट पकडला होता.  तो स्पर्श मनाचा मनाचा ठाव घेत होता.  अबोल झालेले  शब्द, काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. तिला बोलतं  करायचा होतं. तिच्या शरीरातील  त्या दाहक औषधांबरोबरच,  तिच्या मनात चक्रीवादळासारखे  थैमान  घालत असलेले विचार शमवायचे होते. त्याला वाट मोकळी  करून द्यायची होती. त्या  विचारांच्या, इच्छा-आकांशांच्या परडीतील फुले  मला हळुवारपणे  वेचायची होती. त्यातल्या पाकळ्या-न-पाकळ्या उलगडून समजावून घ्यायच्या होत्या. काही आस-इच्छा व्यक्त करायच्या असतील, काही  अभिवचनं घ्यायची असतील तर तीही जाणून घ्यायची होती. अर्ध्यावरती सोडणार असलेला डाव पूर्ण करायचा होता मला… खरंतर ती आमची सामायिक जबाबदारी होती, परंतु आता मात्र ती मला एकट्याला पार पडायची होती.  ते  विचार   हळुवार स्वीकारण्यासाठी माझा हात प्रेमळपणे डोक्यावरून फिरला अन धस्स झाले... हाताला केसांचा स्पर्श झाला नाही. ओकं-बोकं झालेलं डोकं, उजाड भविष्याची सगळी कल्पना देऊन गेलं… ती सुकेशिनी होती...  उपचाराने मात्र  तिच्या डोक्यावरील केस गळून पडले होते. तिचा सुजलेला चेहरा बरंच काही सांगून जात होता…

माझा प्रयत्न होता, दिवाणखान्यातील त्या भयाण शांततेला खिंडार पाडायचं… माझा तो भावस्पर्शी हात हळुवारपणे तिच्या डोळ्यांवरून खाली घसरला.  माझ्या बोटांना उष्ण जलधारांची धग लागली… तिच्या डोळ्यातील मोती, एक एक करत घरंगळून खाली पडत होते… ते मोती नाजुकशा हातांनी टिपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो मी. त्या आसवांच्या पुरामध्ये  माझं सर्वस्व वाहून जात असल्याचं चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं होतं… मन दगडासारखं घट्ट करुन बोलू लागलो…

 ‘प्रिये, तुला माहित आहे ? आज पाच महिने झाले तुझ्यावर औषधोपचार चालू आहेत.  कोणता आजार झाला असावा तुला ? ज्यावेळेस अशा प्रकारची ट्रीटमेंट एखाद्या रुग्णाला दिली जाते, त्यावेळेस तो नक्की आजार कोणता ही  एक अनामिक हुरहूर तथा जिज्ञासा असते जाणून घेण्याची… मग असं  कधीच का वाटला नाही तुला ? मी मान्य करतो की  मी तुझ्याशी खूप खोटं बोललो, तुला, आजाराची कल्पना नाही दिली. मी जे काही सांगत गेलो  त्यावर पूर्ण विश्वास ठेवत गेलीस . सप्तपदी घालताना घेतलेल्या त्या शपथा… दिलेली ग्वाही… मिळालेला विश्वास…तंतोतंत पाळलास, मला कोणत्याही प्रकारची जाणीव होऊ  न देता…  अलीकडच्या  कालावधीत जे जे सोसत होतो, सहन करत होतो, भोगत होतो,  ते कुठेतरी व्यक्त करायचं  होतं मला. पण ते तसं करू शकत नव्हतो. मी माझ्या भावनांचे अश्रू, आपल्या पिल्लांसमोर ढाळू शकत नव्हतो. त्या अश्रूंना तुझ्यासामोरही अभिव्यक्त होण्याचं धाडस होत नव्हतं. खरं तर यापूर्वीच  मी तुला हे सारं सांगायला हवं होतं. तुला अंधारात ठेऊन हे सारं करायची धडपड यासाठीच होती की, त्या आजाराची कल्पना जर तुला आली असती तर तू मानसिकदृष्ट्या खचून जावून, त्यावरील उपचाराला योग्य तसा प्रतिसाद मिळाला नसता. आणि मग त्या महाविध्वंसक  आजाराने तुझं अस्तित्व, वादळ वाऱ्याच्या वेगाने गिळंकृत करून टाकलं असतं.  आपली प्रतीकं… ज्यांना अंधाराचा स्पर्श नाही… दुःखाची चाहूल नाही… ज्यांच्यावर ग्रहांची  वक्र दृष्टी नाही, त्यांना ह्या करुण कहाणीची बिलकुल झळ पोहोचू नये हीच आर्त आणि प्रामाणिक इच्छा होती. एवढ्या कोवळ्या वयात, जिथं आयुष्याची स्वप्नं भातुकलीच्या खेळातून साकार करायची असतात, तिथं उद्ध्वस्त होणाऱ्या जीवनाचं चित्र दाखवायचं माझ्या हातून पाप घडू नये ही  काळजी घेत होतो.’

मी सारं सारं काही कबूल करत होतो. तिच्या कोर्टात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात   उभा राहून मी कन्फेसर ची भूमिका पार पडत होतो. आता पर्याय उरला नव्हता... मी बोलत राहिलो, 'त्या आजाराच्या  पहिल्या कल्पनेनंच   माझं शारीरिक संतुलन बिघडल्याचं परोपरी जाणवत होतं. त्या मानसिक धक्क्याने माझा आवाज गेला. आयुष्य हे एका उजाड माळरानासारखे वाटू लागले… डोळ्यांना सुखावणारा एकही हिरवा क्षण दृष्टीपथास पडत नव्हता... घरातल्या कठीण प्रसंगांना तोंड देत असतानाच, आवाज नसल्यामुळे घराबाहेरही तोंड देता देता नाकी नऊ आले. एक सांगू  प्रिये ? एक माता म्हणून तुझ्या   जबाबदाऱ्या तशाच असताना, हतबल होऊन तुला अंथरुणावर खिळून पडावं लागलं आहे, हीच जाणीव मनाला सारखी बोचत राहिली आहे…’ तिच्या निर्विकार चेहऱ्यावर कसल्याच खुणा दिसत नव्हत्या. आजाराचं गांभीर्य कदाचित तिला समजलं असावं. तो कर्दन काळ तिने स्वतः बघितला आहे, सोसला आहे. हे जाणूनच मी पुढे सांगायचं धाडस केलं…

 'तू क्षयरोगाची शिकार झाली आहेस. त्याने तुझ्या आयुष्याला विळखा घातला आहे… कधीही न सुटणारा… प्रिये,  हा आजार मला का नाही दिला देवाने? मी तर तो सहज स्वीकारला असता...  सुखी संसारात  त्यागाची भावना असायला हवी… तर मग तो त्याग एकट्यानेच का करायचा? तुझ्यासाठी मी माझ्या जीवनाचा त्याग केला असता... तुझी अर्धवट राहिलेली मातृत्वाची कर्तव्य पूर्ण करायला तुला दीर्घ आयुष्याचं देणं लाभलं पाहिजे ना ? मग त्यासाठी माझं उर्वरित आयुष्य तुला दिला असतं… विधात्याला तसं साकडं घातलं असतं… पण हे असं का नाही झालं ? माझ्या  कुठल्या पापाची फळं, तुला भोगावी लागत आहेत ? प्रिये… नियतीचा हा खेळच विचित्र आहे… जो सर्वांना आवडतो ना, तोच....तोच देवाला आवडतो… तू  तुझ्या स्वभावामुळे सगळयांच्या गळ्यातील ताईत  झाली होतीस, सगळ्यांची प्रिय होतीस ना ? तोच धागा त्याने पकडला आणि त्या धाग्याचा गळफास होऊन आयुष्याभोवती घट्ट होत गेला.  सर्वसामान्य माणसाचं आयुर्मानसुद्धा तुला लाभू नये,  हे कुठल्या करंट्या नशिबाचे भोग आहेत ? जीवनभर साथ देण्याची शपथ मोडली जातेय याचं दूषण मी तुला नाही देत... त्याचं खापर माझ्यावर घ्यावं म्हटलं तर तसं कारणही दिसत नव्हतं. मग दोष द्यायचा कुणाला ? सुखी संसारात ज्याने विष कालवलं… त्याचा राग राग का होणार नाही ? त्यालाच जबाबदार  का धरलं जाणार नाही ? त्याच्यावर विश्वास कसा राहणार ? मग प्रश्न पडतो तो ह्या पृथ्वीतलावर परमेश्वर नावाचं  अभिधान लाभलेलं खरंच काय आहे का ? संकट समयी ज्याचा  धावा केला जातो, तो आहे कुठे ? तो तुझ्या हाकेला धावून का आला नाही ??? कर्ता करविता तोच… निमित्त मात्र आजाराचं…’

ती तशीच श्रांत, निश्चल होती. हे सारं एखाद्या लहान मुलासारखं एकाग्र होऊन ऐकत होती. मी मात्र भडभडा ओकत गेलो… मनातील व्यथा मांडत गेलो… वास्तव जीवनाचं भयाण स्वरूप तिच्यासमोर रेखाटत गेलो…  मला हेही कळून चुकलं  होतं, यापुढील  आयुष्याच्या प्रवासात तिची साथ नसणार आहे… दोघांनी मिळून सुरु केलेला प्रवास तिच्याविनाच गन्तव्यस्थानापर्यंत नेटाने न्यावा लागणार आहे… तो समोर असलेल्या दोन प्रतीकांच्या  उज्वल भवितव्यासाठी… तिचं  क्षीण होत चाललेलं शरीर आणि निस्तेज पडत चाललेला चेहरा,  भयावह रात्रीची चाहूल करून देत होता… माझं हे कथन तिच्या पचनी पडत होतं, असं दिवाणखान्यातील शांततेमुळे मला जाणवत होतं… तिला काही तरी सांगायचं  होतं… ती उठू पाहत होती पण शरीर जड झालं असल्याने  शक्य नव्हतं. तिने हातात धरलेला माझा हात अधिकच घट्ट होत गेला…
 ती बोलू लागली, ' मला सारं समजलंय… उमजलंय… सगळ्याची जाणीव झालीय… काहीही झालं  तरी दैवाचा फेरा मलाही नाही चुकविता  येणार… जन्म घेतला म्हणजे मृत्यू अटळ ! मी एका मोठ्या सामायिक जबाबदारीचं  ओझं तुझ्या खांद्यावर ठेऊन जाणार आहे… माझी अपुरी कर्तव्य,  जबाबदाऱ्या, एका आईची भूमिका साकारून पार पाडायची आहेत तुला… आपल्या पिल्लांना मोठं करायचं आहे खूssप मोठं करायचं आहे… त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे… त्यांचा सुखी संसार मला वरून पाहायचा आहे…त्यांना, सुखी जीवनाचा आनंद घेताना पाहिल्यावरच, माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी इथेच असेन… तुझ्या शेजारी… तुझ्या भोवताली... तुला कोणत्याही प्रकारची अडचण नाही येणार. तसं झालंच तर मला आठव…आपल्या निर्मळ  प्रेमाला  आठव… आपला जीवनप्रवास आठव…आपलं ध्येय आठव… सोन्या, मी जरी ह्या विश्वात नसले प्रत्यक्ष तुझ्या समोर नसले तरी आपल्या ह्या दोन कन्या मध्ये तू मला बघ. मी त्यांच्यात आहे. आत्तापर्यंत जशी माझी काळजी घेतलीस तशी त्यांची काळजी घे. ती माझीच सेवा केल्यासारखी असेल… ते तुझं आद्य कर्तव्य समजायला हवंस…’

हे सारं मनोगत, तिची आर्जवं माझ्या काळजाला घरे पाडत होती.  संध्याकाळच्या भयाणतेणे महाकाय स्वरूप धारण केले होते.  देव्हाऱ्यातील दिवा मघासारखाच मिणमिणत होता- मात्र तेजहीन! नियतीच्या मनात मात्र  निराळेच होते. ह्या गंभीर परिस्थितीत आम्ही एकमेकांना समजावत होतो. ती भयाण  शांतता... काळ म्हणून समोर उभी होती. दिवाणखान्यात आम्ही दोघे असताना सुद्धा अंधकाराचं साम्राज्य पसरलं होतं. माझ्या दाटून आलेल्या कंठातून शब्दांना बाहेर यायला जागाच नव्हती… शब्दांची जागा डोळ्यांनी  घेतली होती. माझे डोळे बोलू लागले होते…  ‘जन्म-जन्मांतरीची नाती अशी अचानक आणि सहज तुटण्यासारखी  नाजूक का केलीत विधात्याने?’  ह्या न सुटणाऱ्या कोड्याने माझ्या डोळ्यांतून, माझ्या नकळत ओघळलेल्या आसवांची फुले, त्या निस्तेज भालप्रदेशावर हळुवार अलगद उतरत  होती…. 
ती गत आयुष्याची उजळणी होती ?…  तो अखेरचा सहवास होता ?… ती अखेरची भेट होती ?…ती जन्म-जन्मांतरीच्या सहचारिणीसाठी याचना होती ?…. की आयुष्याचा खेळ संपण्यापूर्वीच वाहिलेली श्रद्धांजली होती ती…???

                                              xxxxxx
दिनांक- 09-10-2013               

No comments:

Post a Comment