Sunday, June 22, 2014

दुष्काळ…

दुष्काळ

गेल्या महिन्यात माझ्या पत्नीच्या चंडीगडच्या मैत्रिणीने घरी प्रसाद आणला… एक छानशी शाल आणि गोड प्रसाद म्हणून गव्हाची सुकडी… मी नमस्कार करून त्या गोड सुकडीचा प्रसाद तोंडात टाकला.  ती तोंडात विरघळत असतानाच माझ्या मनाचा ताबा घेत, मला घेऊन गेली… चाळीस वर्षापूर्वीच्या काळात… तो महाभयावह काळ जसाच्या तसा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला…

तो काळ… ज्यावेळेस माझ्या आयुष्यातील वयाची पांच वर्षेही पूर्ण केली नसावीत मी.  ज्या वयात अल्लड… निरागस बालपणाचा आनंद लुटायचा, त्या वयात सृष्टीवरच्या एका महान संकटाला सामोरे जाणाऱ्या समाजातील, एक घटक बनण्याचं माझ्या नशिबी आलं होतं… महाराष्ट्रातील एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाचं ते विदारक सत्य होतं…

विधात्याने माणसाला मेंदू दिलाय विचार करायला.  मन दिलंय भावना व्यक्त करायला. भाषा दिलीय भावना प्रभावीपणे मांडायला. शब्द भांडार आहे भाषा प्रगल्भ करायला… आज याच भाषेच्या आधारामुळे जीवनातील साहित्य उभं राहिलंय… आयुष्याच्या जीवनग्रंथातील सुख-दुःखांची पाने उलगडून त्यातील अंतरंग जसेच्या तसे मांडण्याचे कार्य साधलं जातंय… ते अनुभवाच्या शिदोरीतून

तो कोरडा दुष्काळ होता. दरवर्षी नियमित वेळेत आपली हजेरी लावणारा वरूणराजा ह्या वर्षी कुठे गायब झाला आहे?  सर्वच शेतकऱ्यांप्रमाणे सामान्य लोकांनाही पडलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, जसं सगळ्या जाणकारांनाही मिळालं नाही, तसं मांत्रिक तसेच देवदेव करणाऱ्या भगत मंडळींनाही मिळालं नाही. हेच काय, पण खुद्द सरकारी यंत्रनेकडेही त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्यावेळेस.  वरुण राजाची वाट बघून शेवटी शेतकरी कुटुंबांनी पेरण्या सुरु केल्या. आपल्या नशिबाच्या वाट्याला आलेल्या ज्या जमिनीच्या तुकड्यात पूर्ण कुटुंबाची गुजराण करायची, त्याच तुकड्यातील धरणी मातेला साकडं घालून गरीब शेतकऱ्यांनी पेरणीचं  पाऊल उचललं…

डोक्यावरील तळपत्या सूर्याच्या कडकडीत उन्हाने, भौगोलिक रचनेनुसार आधीच काळ्या असलेल्या मातीचा चेहरा, अधिकच काळवंडून गेला होता. तिच्या जिवातील तो शुष्कपणा आमच्यापेक्षा शेतकऱ्यांना जास्त जाणवत होता. अंगाची लाहीलाही करणारी उन्हं, धरतीमातेच्या अगदी खोलवर पोटात शिरून, शिल्लक असल्या-नसल्या पाण्याचा अंश शोषून घेत होती. मग काय ओलावा राहणार तिच्यात… स्वतःत प्राण आणायला आणि इतरांचा प्राण वाचवायला ? भेगाळलेल्या जमीनीचं ते वास्तव रूप, बघणाऱ्याच्या डोळ्यांच्या खाचा करत होते. खूप खोल जखमा होत्या त्या… मलमपट्टीने बऱ्या न होणाऱ्या.  त्याच तळपत्या सूर्याच्या धगीने जमिनीत रुजू पाहणाऱ्या त्या तृनधान्यांचा श्वास कोंडला गेला. अन बेचिराख होऊन त्याच मातीत विलीन झाली.  इकडे पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र मनःस्थिती फार कोलमोडून गेली. सगळीडेच अन्न धान्याचा तुटवडा भासु लागला… जनावरांना चारा मिळणं दुरापास्त झालं. ओला नाहीच पण सुकलेल्या चाऱ्याचा साठा सुद्धा संपुष्टात आला. जिथं जनावरांना खायलाच काही नाही तर दुध तरी कोठून मिळणार शेतकऱ्यांना ? काही लोकांचे ते एक उपजीविकेचे साधन होते तेही संपलं.  उष्णतेच्या त्या धगीने ओसाड पडलेली माळरानं डोंळ्यात आग फेकीत होती. सभोवतालच्या झुडुपांनी तर केव्हाच जमिनीत समाधी घेतली होती. वर्षानुवर्षं दिमाखात उभी असलेली झाडं मात्र मुंडण केल्यासारखी ओकीबोकी पडली होती. 

सगळीकडे कल्लोळ माजला होता. पिण्याचा पाण्याचा वणवा पेटला. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या   लज्जित होऊन कोरड्या पडल्या होत्या… अंथरुणावर मरणासन्न अवस्थेत पडलेल्या रुग्नासारखं आपलं अंग टाकून दिलं होतं त्यांनी… पावसाळ्यातच काय पण उन्हाळ्यातसुधा काठोकाठ भरत असलेल्या विहिरीं… त्यांनाही आता खोल तळाशी गेलेल्या पाण्याच्या पातळीची लाज वाटायला लागली होती. पण त्याही हतबल होत्या. आपली नियमित कर्तव्य पार पडायला असमर्थ ठरल्याने त्या विहिरींकडेही लोकांची पाठ फिरली  होती…

ह्या साऱ्या वणव्यात होरळपून निघत होती ती माणूस नावाची जमात. रोजगार नाही म्हणून पैसा नाही… पैसा नाही म्हणून अन्न नाही… मग उपासमार सुरु… ही शोकांतिकेची एक बाजू तर दुसरीकडे पैसा असूनही अन्न नाही ही दुसरी बाजू…. ज्यांना इतर ठिकाणी थोड्याफार प्रमाणात आधाराची आशा होती त्या कुटुंबाचं त्याचबरोबर जनावराचं स्थलांतर सुरु झालं. आपली राहती घरं सोडून लोक गेले. पण ज्यांच्यापुढे  तोही पर्याय नाही ते मात्र परिस्थितीच्या वावटळात पुरते फसून गेले होते

त्याच पहिल्या प्रकारच्या कुटुंबापैकी आमचं कुटुंब. सात माणसांचं कुटुंब. त्यातला एक सदस्य लग्न होऊन मुंबईला स्थिरस्थावर झाला होता. बाकी उरलेल्यांमध्ये पोटासाठी मारामारी…  घरातली सगळी पोरं खात्या तोंडाची… त्यामुळे वडिलांच्या नोकरीच्या तुटपुंज्या पगारात घर चालणं कठीणच. रेशनवर मिळणारं स्वस्त धान्य म्हणजे सातू,  मका,  मिलो बस्स. पण त्या व्यतिरिक्त इतर सामान आणायचं कसं आणि कोठून ? त्याही काळात जे लोक दुकाने चालवून किरकोळ मालाची विक्री करायचे, ते तरी आमच्या सारख्यांच्या प्रपंचाला लागणारं सामान उधारीवर  किती दिवस देणार ? जी काही पत होती ती ठराविक काळापर्यंत चालली; पण त्यानंतर मात्र ती संपुष्टात आली. आता उधारी मिळणंही बंद झालं.  त्या परिस्थितीत त्यांनाही दूषणं देता येत नव्हती. खाण्यासाठी  वणवण तशी पाण्यासाठी  वणवण… गावातल्या आड-विहिरींनी जणूकाही संपच पुकारला होता. पाण्याचा ठिपूस नव्हता… सारा खडखडाट झालेला.  स्मशानासारख्या भकास झालेल्या ओढ्यात, इतस्तः पसरलेल्या दगड-गोट्यातील पाण्यानेसुद्धा प्राणांची आहुती दिली होती. 'वाळूचे कण रगडीता तेलही गळे'  ह्या  उक्तीने, त्याच ओढ्यातील चार-चार  फुटावर खोल खड्डे खणून पाण्याचा थेंब हाती लागतो का तेही पाहत होतो आम्ही. इकडे तर आड आणि पोहरा एकच झाला होता.  चिमण्या-कावळ्यांना पाण्याचा थेंब मिळेनासा झाला. किमान ज्या गोष्टीला पैसे मोजावे लागत नाहीत त्या गोष्टी तरी सहज उपलब्ध होतील ही भाबडी आशा उराशी बाळगून आमच्या सारखे हजारो कुटुंबं रान न रान पालथे घालत होती.  त्यासाठी  वणवण सुरु…  ह्याss मोठाल्या घागरी घेऊन मैल न मैल दूर जावं लागत होतं पाण्यासाठी. त्या लोखंडी घागरी फार वजनाच्या.  पण करणार काय ? छोट्या कळशीत पाणी कमी मावते म्हणून मोठ्या घागरी… शिवाय एकदा नंबर लागला तर एकच कळशी… म्हणजे तेवढ्याच पाण्यासाठी पुन्हा एवढ्या लांबची पायपीट… त्यामुळे, एवढ्या दुरून खांद्यावरून पाणी वाहत आणायचं म्हणजे म्हणजे साऱ्या शरीराची कसरत. पण पर्याय नव्हता…



दुष्काळ म्हणजे भल्या मोठ्या रोगाची साथ. त्यातून कोणीही वाचू शकत नाही. लहान-मोठा…  गरीब-श्रीमंत  सगळे सारखे.  स्वर्गवासी होण्यासाठी न्यायला येणाऱ्या यमाला जसे सारेजण  सारखे अगदी दद्वतच. ह्याही दुष्काळाने कोणालाही मोकळं नाही सोडलं.  सारेच त्याचे बळी… आपल्या कुटुंबाची भुक-तहानेपोटी होणारी ससेहोलपट बघून, आई बापाच्या डोळ्यांतील आसवं ही, अपघाताने झालेल्या जखमेतून भळाभळा वाहणाऱ्या रक्तासारखी होती. लाल भडक.… किती यातना… कशा असह्य वेदना…! आपल्या पोरा-बाळांसाठी तीळ तीळ  तुटणारं त्याचं काळीज त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. आपल्या डोळ्यांदेखत आपली पिल्लं उपासमारीनं किडा-मुंगीसारखी पटापटा मरून पडावीत ह्या  कल्पनेणेच जीवात काहूर माजला होता…

आता मात्र पर्याय उरला एकच… कर्जं काढायची. कर्ज काढून सण साजरा करायचा नसतो; पण इथे जगण्यासाठी तोच रस्ता होता मोकळा दिसत होता…. सावकार नामक बांडगुळांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी ही परिस्थिती पोषक होती. ह्या भौगोलिक… आर्थिक… सामाजिक… मानसिकदृष्ट्या कोसळलेल्या कुटुंबांचे शोषण करण्यासाठी सावकार पुढे सरसावले… त्यांचा मदतीचा हाss मोठा हात गरीब कुटुंबांना जीवनदायी वाटला.  ह्या पृथ्वीतलावर प्रेषिताच्या रुपात तारणकर्ता  आपल्या समोर उभा आहे, ह्या जाणीवेने त्यांनी त्याच्या स्वागतासाठी आपल्या  कमकुवत… मनोदुर्बल्याच्या  पायघड्या घातल्या… आणि इथेच घरघर लागली प्रत्येकाच्या संसाराला. घरातला एक-एक जिन्नस गहाण ठेऊन, प्रसंगी तो विकून पैसा मिळवला केला. तशानेच आपला जीव ह्या भीषण परिस्थितीत तग धरू शकेल एवढीच आशा त्यांना जगण्यासाठी पुरेसी होती…

सावकाराचा तो मदतीचा हात म्हणजे कर्जाचा उंट होता. घरात शिरताना खूप छोटा होता. पण हळूहळू तो वाढत गेला. घराच्या ज्या चौकटीतून त्याने घरात प्रवेश केला, तीच चौकट त्याला घराबाहेर पडायला लहान पडू लागली.  पहिलं कर्ज फेडायच्या आतच दुसरं कर्ज घेण्याची वेळ आली. कर्जफेडीचा वायदा तोच. शर्त ठरलेली.  एक वेळ… दुसरी वेळ… तिसरी वेळ… कर्ज उचलण्याच्या वेळा वाढत गेल्या तरी परतफेडीचं नाव नाही. परतफेड करणार तरी कशी? एका दमडीचीही कमाई नसल्याने कर्जाच्या व्याजाची परतफेड दमडीनेही कमी होत नव्हती… सावकार मंडळी ठरलेल्या वेळेला हफ्ता वसुलीसाठी येऊ लागले. त्यांचा तगादा सुरु झाला. मानसिक पिळवणूक सुरु झाली. मग मात्र हवालदिल झालेले कुटुंबप्रमुख सावकार येण्याच्या वेळेस घराबाहेर पडू लागले. आपलं तोंड लपवू लागले. घरी असलेल्या मुलांना काहीतरी खोटंनाटं कारण सांगण्याची वेळ आली. त्यात एक गोष्ट समाधानाची होती, ती म्हणजे ती सावकार मंडळी कर्जबाजारी झालेल्या कुटुंबातील मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नव्ह्ते… जोपर्यंत हातात पैसा येत नव्हता तोपर्यंत हा लपंडाव चालूच होता…

जसं बाहेरचं वातावरण तप्त अगदी तसाच पोटातला जठराग्नी तप्त. तो शमणं आता जिकरीचं होऊन बसलं. कर्जाचा मार्ग आतासा बंद झाला होता. संसार उध्वस्त व्हायला निघाले. नाही म्हणायला घराच्या चार भिंती अन अगदी विकून किंवा गहाण ठेवून, घराच्या फडताळावर निश्चलपणे पडून राहिलेली दुःखी कष्टी  उरली सुरली जर्मनची (अल्युमिनियमची ) भांडी… हाच संसार.  त्या काळात संसाराची परिभाषाच बदलली… सुखी माणसाचा सदराच पार फाटून गेला होता… किती ठिकाणी ठिगळं लावायची आणि किती वेळा ? सारी लक्तरं वेशीवर टांगल्यासारखी अवस्था झाली होती साऱ्या कुटुंबांची…  दाही दिशा वणवण भटकंती. अन्नाची दाणादाण. घरातल्या एखाद्याला जरी काम मिळालं तरी रात्रीच्या जेवणाची आशा लागायची. जेवण तरी काय ? त्या मजुरीच्या पैशात पावट्याच्या शेंगांचे वाटे आणायचे. चुलीवर पाण्यात मिठाचे चार खडे टाकून त्या शेंगा उकडून घ्यायच्या  अन त्या आपापसात वाटून घेऊन   सोलून खायच्या.  त्याची भाजी करावी किंवा कालवण करावं तर तेल-तिखट… कांदा-लसूण  हवा. शिवाय त्याच्या जोडीला भाकरी हवी. तीही आता दृष्टीआड झाली होती. काही वेळेस तर नुसते गहू उकडून, अन्नाला आसुसलेल्या आपल्या पोटाची खळगी भरायचं काम करावं  लागत होतं…  सगळ्याच कुटुंबांचे, घराबरोबर वासेही फिरले होते… सारा आसमंत ओसाड माळरानासारखा शुष्क झाला होता. उगवत्या सूर्याच्या साक्षीने दिवस सुरु झाला तरी रोजगाराची हमी नाही मिळायची. त्याकाळात रात्रींसोबत दिवसही वैऱ्याचे झाले होते. त्यामुळे सारे दिवस असेच चिंतेत उगवायचे. अन मावळताना मात्र जीवघेणी तळमळ… उद्या मरण आहे म्हणून आजचं जगणं आहे की काय ? असा प्रश्न पडायचा…

दुष्काळ म्हणजे एक काळसर्प होता… साऱ्या मानव जातीला गिळंकृत करत होता… ज्या वृद्ध मंडळींनी आपल्या उभ्या आयुष्यात असा काळ पाहिला नव्हता तो त्यांच्या मावळतीच्या काळात त्यांना पाहावा आणि सोसावा लागतोय यासारखं त्यांच्या लेखी दुसरं दुःख नव्हतं. हा काळच बघायचा राहिला होता त्यांच्याकडून. आपल्या आयुष्यातील सुख-दुःखाचे चढ-उतार त्यांनी लीलया पार केलेले असल्याने ह्या काळात त्याचं धीरगंभीर व्यक्तित्व त्यांच्या कुटुंबाला आधार देत होते…

वैराण वाळवंटातील तापलेल्या वाळूवर, चालताना होणाऱ्या दमछाकीपेक्षा, ह्या रणरणत्या उन्हाने कोरड्या पडलेल्या, आयुष्याच्या ह्या वळणावर चालताना होणारी दमछाक, जास्त तीव्रतेने जाणवत होती… उंटासारखं आपलंही शरीर असायला हवं होतं असं त्या वयात मला वाटत होतं. अन्न नाही निदान पाणी तरी सहा-सहा महिन्यासाठी साठवून पुरवून-पुरवून पिता आलं असतं… आजचा दिवस भयाण परिस्थितीत गेला याचं दुःख मनाला सलत असताना त्यातून समाधान म्हणजे आयुष्यातील असा वाईट दिवस निघून गेला… कमी झाला… अशा ह्या विचित्र मानसिकते मध्ये, आपलं आयुष्य असं एक-एक दिवसांनी कमी होतंय याचं काडीमात्र दुःख नव्हतं आम्हाला.  मृत जनावराच्या शरीरावर आपला हक्क दाखविणारी गिधाडे, उद्या उपासमारीने गतप्राण झाल्यावर आमच्याही शरीरावर तसाच हक्क दाखवणार… आपल्या शारीराच्या प्रत्येक अवयवाला दोन्ही बाजूंनी ओढून ते छिन्न विछिन्न करून… त्याचे छोटे छोटे तुकडे करून मssस्त मेजवानीचा आनंद घेणार… ह्या विचाराने माझं बालमन त्यां गिधाडांच्याच धारदार चोचीने कुरतडलं जात होतं.  उद्याचा दिवस असाच येणार…  आजच्यासारखा… ही भीती मनामध्ये घट्ट मूळ धरून बसली होती. दिवसामागून दिवस-रात्रीमागून रात्र जात होत्या… परंतु परिस्थिती, होती त्यापेक्षा     जास्त खालावत चालली होती. सगळी स्वप्नं… आशा… आकांक्षा… सगळ्या सगळ्यांचा चक्काचूर झाला होता. पण 'ब्रम्ह सत्य जग मिथ्या…’ त्याही काळात माणुसकी नावाचं ब्रम्ह सत्य होतं… जिवंत होतं. एकमेकांना नैतिक आधार द्यायला तीच माणुसकी सगळ्यांचा आधारस्तंभ होती. तीच्या जिवंतपणामुळेच माणूस जिवंत होता… त्याच माणुसकीतून पाझरत असलेला आशावाद, उद्याच्या उज्वल पहाटेची चाहूल देत होता…

  आतासं कुठे दुष्काळाचं भीषण चित्र शासकीय यंत्रणेसमोर उभं राहिलं होतं. नेते मंडळी… शासकीय अधिकारी खाडकन जागे झालेले दिसले. गावागावांची पाहणी सुरु झाली. ग्रस्त कुटुंबांची गणती सुरु झाली. आकडेवारी तयार… शासन दरबारी ह्या गोष्टीचे पडसाद उमटले अन शासनाने रोजगार हमी योजना  सुरु केल्या. त्याखाली वेगवेगळी कामे हातात घेतली गेली.

त्या दिवशी उगवलेला सुर्य साऱ्या कुटुंबाला एक आनंदाची बातमी घेऊन आला होता. त्याही परिस्थितीत जीवाचं रान करून दुष्काळाशी दोन हात करत उभ्या असलेल्या झाडांवरील निरस झालेली पाने ताजीतवानी होऊन उठून उभी राहिल्यासारखी वाटत होती. त्यांच्याही जीवात जीव आला होता. आपल्या सावलीखाली वाढत असलेली… खेळणारी… बागडणारी…  पोरं  सोन्याचे दोन घास खाऊन आता शांत झोपी जातील ह्याच जाणीवेने  जणू ती हर्षोल्लीत झाली होती. त्या परिसरात पाझर तलावाचे काम हाती घेतले गेले. पंचक्रोशीतील सर्वच कुटुंबाना हायसं वाटलं. काम सुरु झाले… कुटुंबातील प्रत्येक मोठ्या सदस्याला रोजगार मिळाला… आनंदाला भरतं आलं होतं.  त्या दिवशी गावात आनंदी वातावरणाचा परिमल दरवळत होता…

त्या दिवशीची सुंदर पहाट सोनेरी किरणांच्या तेजाने उजळून निघाली होती. रोजगारप्राप्त लोक मनाच्या नव्या उभारीने घरातून बाहेर पडले.  एकमेकांच्या सोबतीने… गटागटाने… गावातील तो  खडबडीत मुरमाड रस्ता पादाक्रांत करू लागले. मुरमाड रस्त्यावर सर्वत्र फुफाटा पसरला होता… पायात पायतान नसलेल्या दीन लोकांच्या पाऊलांना त्या लालसर पांढऱ्या रंगाच्या मातीचा, हलकासा उबदार स्पर्श होत होता. तिचा  तो स्पर्श इतर दिवसांपेक्षा खूपच वेगळा जाणवत होता. त्या खेडूत लोकांचं सारं आयुष्य त्याच मातीत मिसळून गेले असल्याने तिच्या त्या कोमल स्पर्शातून एक प्रकारची स्फूर्ती… जिव्हाळा… आधार… मिळत असल्याचं, त्या लोकांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं. आपलं सारं शरीर गालीच्यासारखं रस्त्यावर पसरून, लोकांसाठी त्याच्या जणू पायघड्याच घातल्या आहेत असा भास होत होता. लोकांच्या चेहऱ्यावरचं ओसंडून वाहात चाललेलं समाधान, प्रत्यक्षात त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर परावर्तीत झालेलं दिसत होतं… आज कितीतरी महिन्यानंतर त्यांच्या आशेला पालवी फुटली होती… आजचा दिवस उद्याचं भवितव्य ठरविणार असेल तर आज जगायला मिळणार हेच इच्छापूर्तीचं समाधान, आभाळाएवढं मोठं होतं…

लोकांचा कामाचा पहिला दिवस… त्या रोजगाराच्या पहिल्या दिवशी, मीही हजेरी लावली होती तिथे आई-भावांबरोबर… सर्व सामान्यपणे बाहेरची परिस्थिती कशीही आणि कितीही भयानक असली… कितीही भेदक असली… करुण असली… तरी त्याची धग प्रत्यक्ष पोराठोरांना नाही लागत. किंबहुना ती लागूच नये याची आई-वडील खूप काळजी घेतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे काबाडकष्ट करायची तयारी असते त्यांची. कुटुंबामध्ये जी समंजस पोरं होती ती आपल्या आई-बाबांना मदतीचा हात देत होती. आजपर्यंत ज्या कामाची सवय नाही किंवा ते कधी करायची वेळच  आली नाही,  ते काम करायला आजच्या परिस्थितीने  भाग पाडलं  होतं त्यांना. अर्थात, त्या दुःखाचा लवलेश ही त्यांच्या मनात डोकावताना दिसत नव्हता.  कारण आजच्या कठीण प्रसंगी कुडीतील प्राण वाचवायला तेच एक वरदान होतं. जरा अवघडच जात होतं सारं…  हातात खोरं, कुदळ, पाटी घेणं… त्या कडकडीत उन्हात अशी कष्टाची कामं अंगातून घाम निघेपर्यंत करायची म्हणजे जीव मेटाकुटीस. काही पुरुष मंडळी अंगातला सदरा काढून, उघड्या अंगाने काम करताना दिसत होती. कारण एकच… घामाने कपडे खराब झाली तर धुवायला पाणी नाही. तीच-तीच कपडे तीन-तीन चार-चार दिवस घालायची हे अंगवळणी पडलं होतं.  त्या कष्टकरी लोकांमधल्या काहींचं पोलादी शरीर, कष्टाचं काम करताना आगदी पिळदार दिसत होतं. त्या शरीराला एक प्रकारची तकाकी आली होती.  आग ओकीत असलेल्या मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याच्या उन्हानं, डोक्यावरील केसातून घामाच्या धारा, सरळ गळा-मानेवरून खाली छाती-पाठीवर ओघळताना दिसत होत्या. त्यांचं ते घामानं डबडबलेलं शरीर, उद्याच्या शाश्वत वाटचालीची ग्वाही देत होते…  

नित्यनेमाने मीही त्या पाझर तलावाच्या कामाच्या ठिकाणी जात होतो. घरापासून जवळपास पाच किलोमीटर दूर असणाऱ्या त्या तलावावर, भर दुपारी अनवाणी पायाने जाताना कष्ट पडत होते. मुरमाड रस्त्यावरील उष्ण फुफाट्याचे पायाला बसणारे चटके थेट मेन्दुपर्यत जात होते. त्यातूनच पर्याय म्हणून पुढचं पाऊल ठेवायला फुफाट्यात दडलेला दगड शोधत रस्ता पादाक्रांत करायचा. गावाबाहेर पडल्यावर रस्त्याच्या कडेने झाडाखालून किंवा झुडपाच्या सावलीचा आधार घेत चालायचा प्रयत्न करायचा. गावाबाहेरुन, त्या ठिकाणी जाणारा रस्ता हमरस्ता होता. कोणे एके काळी तयार झालेला. त्या डामरी रस्त्यालाही मोठाल्या भेगा पडल्या होत्या.  परिणामी, मध्येच छोटे-छोटे खड्डे तयार झाले होते. दुपारच्या वेळेस वितळलेल्या डामरावरून चालणे कष्टदायी होत असल्यामुळे त्या रस्त्यावरून न चालता कडेच्या मुरमाड मातीतून चालने सुखावह वाटत होते. शिवाय एवढे अंतर उन्हातून चालत जायचे म्हणजे तहानेने जीव व्याकूळ व्हायचा…

 अशाही बिकट परिस्थितीत काही परोपकारी लोक समाजसेवेचं व्रत हाती घेतात आणि सेवा चालू ठेवून आत्मानंद मिळवतात. तसेच एक कुटुंब होते. त्यांचे घर त्या हमरस्त्याच्या कडेलाच होते.  माझ्या गावापासून दोन-अडीच किलोमीटरवर.  चिंचेच्या झाडाखाली असलेलं त्यांचं घर म्हणजे आम्हाला परोपकाराचं मंदिर वाटत होतं.  तहानलेल्या शरीराचं शमन होत होतं तिथे. त्यासाठी घरासमोरच चौकटीच्या उजव्या बाजूला चिंचेच्या झाडाखाली दोन मोठे पाण्याचे रांजण ठवले होते. त्यावर एक जर्मनची थाळी… वर एक तांब्या… जणू आमचं विश्रांती स्थान झाला होतं ते. चिंचेच्या पारावर घाम पुसत बैठक मारायची अन गार सावलीत शरीर थंड करत, एकाच झटक्यात तो थंड पाण्याचा तांब्या घशाखाली उतरवायचा… अर्धं अंतर कापून कासावीस झालेल्या शरीराला, पाण्याच्या रूपाने तिथे संजीवनी मिळत होती. त्या रांजणातील एक तांब्याभर थंडगार पाणी, जीवनदान देत असल्याचं समाधान होतं.  आज चाळीस वर्षे उलटून गेली तरी, घशाला झालेल्या त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाची जाणीव अजूनही त्याच पाण्यासारखी ताजीतवानी वाटतेय. आजही सुखाने अंग शहारून येतेय… मन भरून येतं… आणि त्या कुटुंबाचे आभार मानण्यासाठी हात वर जातात… मनात विचार येतो… ते दिवस होते म्हणूनच की काय आजचे दिवस मी पाहतो आहे ?

हे मात्र खरं की… आजच्या दिवसांची… सुखाची… दुःखाची… नांदी ही भूतकाळातील काही प्रसंगांमधुनच झालेली असते. आपल्या समोर असलेली आजची परिस्थिती, अशाच प्रसंगांच्या श्रुंखलांनी तयार झालेली असते. तिला जोड असते ती त्या वेळच्या घडामोडींची.  

घरच्यांसाठी दुपारचं जेवण घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावरच येऊन ठेपली होती.  तीन खणांचा अलुमिनिअमचा कडीवाला डब्बा एका हातात घेऊन घरातून निघायचं. ठरल्याप्रमाणे चिंचेच्या झाडाखाली पाच मिनिटे विश्रांती… अन नंतर थेट तलाव गाठायचा.  घरातून चार घास खाऊन निघालो असलो तरी तिथे गेल्यावर आई-भावंडांसोबत दोन घास खाण्यात एक वेगळा आनंद मिळायचा. सोबत इतर मंडळी ही असायची.  अन ते सुख कधीही गमवायचं नाही असं मनानं पक्कं केलेलं. त्यामुळे एकही दिवस एकत्र जेवल्याविना गेला नाही. त्या कष्टाच्या काळातही मला भावंडांचा सहवास मिळायचा, हेही माझ्यासाठी काही कमी नव्हतं.  तिच समाधानाची शिदोरी आजही भरभरून आनंद देतेय.

पाझर तलावाचं काम सुरु होऊन आज महिना पूर्ण झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून अन्नाला पारखा झालेला पंचक्रोशीतील सारा समाज, त्यातील कुटुंबं, आज चेहऱ्यावर आनंदाचं भरतं आल्यानं, एकमेकांशी अगदी खुशीत गप्पा मारताना दिसत होती. वातावरणात खूप मोठा बदल झालेला आढळून येत होता. सर्वसामान्यपणे ह्या काळात  वाऱ्याच्या ज्या उष्ण लाटेचे झोत, अंगाची लाही लाही करत होते पण तेच झोत आता, कडाक्याच्या थंडीत रग अंगावर घेतल्यासारखे उबदार जाणवत होते.  सारी भोवतालची  परिस्थिती बदलली होती. लोकांच्या मानसिकतेत बदल झालेला दिसून येत होता.  गरिबीच्या दारूण धक्क्याने सुरु असलेले कुटुंबातील कलह आता कमी झालेले दिसत होते.

त्या दिवशी मी दुपारच्या जेवणाचा डब्बा घेऊन गेलो होतो. नेहमीप्रमाणे जेवानाचा यथेच्छ  आनंद घेतला. मी ठरवलंच होतं, जेवण झालं की लगेच घराकडे परतायचं नाही. तसा तो आठवड्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे रोजंदारीवरच्या सर्वच लोकांना कामाचा मोबदला मिळणार होता. कामावर येणाऱ्यांना खर्चासाठी थोडी आगाऊ रक्कम मिळाली होती. परंतु आज पूर्ण महिन्याचा पगार मिळणार होता. माझीही उत्सुकता शिगेला पोहोचलेली… माध्यान्हीचा सूर्य हळूहळू मावळतीला कलू लागला होता. त्या परिसरावर होणारी सोनेरी किरणांची बरसात मंत्रमुग्ध करून टाकत होती… डोंगराळ भागातल्या त्या ओबडधोबड जमिनीवरील छोट्याशा सपाट जागेवर, एका सरकारी अधिकाऱ्याचे आणि बाजूला ठेकेदाराचे टेबल लागले होते. जसजशी काम बंद करण्याची वेळ समीप येऊ लागली, तशी लोकांची धावपळ-गडबड होताना दिसू लागली. सगळे लोक आपापल्या पिशवी-सामानाच्या जागेवर येऊन आवराआवरी करू लागले. ज्याचे  जसे लवकर होईल तसतसे ते लोक मुकादमच्या सूचनेनुसार एका रांगेत उभे राहू लागले. रांगेत उभ्या असलेल्या लोकांचा चेहरा आज वेगळंच काहीतरी सांगून जात होता. आपापसात चर्चा सुरु होत्या. एका हातात कापडाची पिशवी त्यातच जेवण बांधून आणलेली फडकी, थाळी, पाण्यासाठी आणलेला पेला-नाहीतर तांब्या. त्या रांगेत येऊन उभं राहताना एकमेकांच्या पिशवीला पिशव्या लागून होणारा भांड्यांचा आवाज निराळाच ऐकायला येत होता. परंतु कानांना अवीट गोड वाटत होता. ती भांडीही आपापसात काहीतरी कुजबुज करत आहेत असा भास होत होता. त्या खुल्या आसमंतात चढ-उतारावर लोकांनी लावलेली रांग म्हणजे एक शिस्तबद्ध समाजाचं प्रतिक होतं. निसर्गानं कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांनाच एका रांगेत उभं केलं होतं. रोजंदारीचं वाटप सुरु झालं तसा एक एक नंबर पुढे सरकू लागला.  माझीही आई-भाऊ रांगेत उभे होते. खरं बघायला गेलं तर, माझी त्यांच्या सोबत उभं राहण्याची आवश्यकता नव्हती. पण एक प्रकारची उत्सुकता होती मला. तो दिवस… त्यातला आनंद मलाही अनुभवायचा होता. कदाचित तोच आनंद मला आयुष्यभर ह्या काळाची कायम आठवण करून देत राहणार होता…  

   समोरचे नंबर जसे कमी होऊ लागले, तसे मागचे लोक पुढे पुढे सरकू लागले. माझीही पावलं आईसोबत पुढे सरकत होती. आम्ही त्या टेबलापाशी जाऊन थडकलो. मुकादमाने एका कागदावर, टेबलवर बाजूलाच असलेल्या शाईच्या पॅडमध्ये आईच्या हाताचा अंगठा बुडवून, त्याचा ठसा घेतला आणि दहा, पाच आणि एक रुपयाच्या नोटा हातावर टेकवल्या.  एक महिन्याची कमाई हातात पडल्यावर चेहऱ्यावरचा आनंद ती लपवू शकली नव्हती.  माझ्याकडे जी पिशवी होती त्यातला एक डबा त्यांनी बाहेर काढून पुढे करायला  सांगितला. त्यात मोठी पळीभर गोड खाऊ टाकला. तो खाऊ पाहून मला लगेच खाण्याची इच्छा झाली.  गेले काही महिने अशा प्रकारच्या खाऊला पूर्णपणे मुकलो होतो.  तो गोड खाऊ खाण्याच्या इच्छेने तयार झालेले चेहऱ्यावरचे भाव त्या मुकादमाच्या नजरेतून सुटले नाहीत.  त्यांनी प्रेमाने मला हात पुढे करायला सांगितला अन माझ्या हातावर मुठभरेल एवढा खाऊ दिला. क्षणाचाही विलंब न करता मी तो खायला सुरुवात केली… खाताना जे आत्मिक समाधान मिळत होतं, ते माझ्या हृदयात कायमचं कोरलं जात होतं ह्याची जाणीव होत होती मला.  दुष्काळ पूर्ण संपल्याची म्हणण्यापेक्षा, तो आलाच नव्हता अशी भावना झाली माझी. माझ्या मुठीत पडलेला गोड खाऊ म्हणजे सुकडी होती ती!!! त्या सुकडीची चव आजही माझ्या जिभेवर जशी होती तशीच रेंगाळत, मला तोच आत्मानंद देतेय हे मात्र खरं !
                           ----x----
दिनांक- 03-02-2014         

[Edited story published in PRAHAR newspaper in two parts.viz-dtd.  08/06/2014 and 15/06/2014-


&

http://epaper.prahaar.in/detail.php?cords=20,1510,1076,2274&id=story5&pageno=http://epaper.prahaar.in/15062014/Mumbai/Suppl/Page2.jpg ]                                                                                                           



         

No comments:

Post a Comment