Wednesday, June 18, 2014

ह्याला जीवन ऐसे नाव…

ह्याला जीवन ऐसे नाव…2

माझं सारं बालपण तसं गावीच (खेडेगावी) गेलं. शालेय दिवसांत, मी सवंगड्यांबरोबर बालपण  आनंदत होतो.  खेड्यातले खेळ आणि तेही गरिबांचे… मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद देत असत.  त्या खेळाला आजच्यासारखी पैशाची वलयं नव्हती… श्रीमंतीचा थाट नव्हता…जाती पातीचा स्पर्श नव्हता… की वेळेची बंधनं नव्हती… खरं तर, खेड्यातलं बालपण म्हटलं की, हसणं-खिदळणं… बागडणं… हुंदडणं… खेळणं… मस्ती… ह्यातच दिवस व्यतीत व्हायचे. अभ्यासाला माझ्या कडून विशेष महत्वच दिलं जात नव्हतं.
तो काळही तसाच… लहान वयात आयुष्याची फार मोठी स्वप्नं ना कोणी दाखविली, ना आम्हाला ती बघण्याची संधी मिळाली. ‘तू भविष्यात कोण होणार?’ हा अवजडवजा मनाला न पेलवणारा प्रश्न शिक्षकांकडून विचारल्या नंतर, रोज आपली जुनीपुराणी… मोडकी-तोडकी सायकल घेऊन, तर कधी पायी, नित्याने घरोघरी पत्रं पोहोचवणारा… आपल्याला जवळचा वाटणारा… सुख-दुःखात सहभागी होणारा, खाकी गणवेशातील- आपला “पोस्टमन मामा किंवा काका” हेच आपलं भविष्याचं साकार होणारं स्वप्नं (!) समजून, मी मोठा झाल्यावर पोस्टमन होणार! ही व्यक्त होणारी निरागस इच्छा अगदी निखालसपणे बोलून दाखवायचो.   

बुद्धीने तल्लख पण अभ्यासातील एकाग्रता कमी, असं माझं शालेय जीवन भरधाव वाऱ्यासारखं निघून गेलं. ती विटी-दांडू… त्या सूर-पारंब्या… तो सूरपाट्यांचा खेळ… स्वतःच बनवलेले  भोवरे… अल्युमिनीयमच्या तारांनी बनवलेली गोल चक्राकार गाडी... लपाछपी… भातुकलीच्या खेळातील गमती-जमती… रात्रीच्या वेळी झोपताना आजी आजोबांच्या त्या रसाळ, ऐकायला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी… अंथरुणावर पडल्यावर ती अंगाई गीतं… जात्यावर दळण दळताना आईच्या हाताला हात देत फिरवलेलं जातं… अन त्यासोबत तिच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न करत गायलेल्या पहाटेच्या ओव्या… या सगळ्याबरोबर त्या खेड्यातल्या मातीत कणाकणाने माझं व्यक्तित्व घडत गेलं… जीवन म्हणजे काय ? आयुष्य ते काय असतं ? हे यक्ष प्रश्न कधी पडलेच नाहीत त्या वयात.  कारण जे आयुष्य मी जगत होतो त्यापेक्षाही काही वेगळं आयुष्य  असतं, याची जाणीवच नव्हती.  मी आणि माझ्या सभोवतालच्या जीवनाचा रंग एकच होता. जात, पात, धर्म जरी वेगळा, तरी थोड्या फार फरकाने आयुष्य, त्याचा जीवनप्रवास मात्र सारखाच…

‘मानवी जीवनांत अनन्य साधारण महत्व कशाला असेल तर ती ‘पोटाची खळगी’. माणसाचे  हात पाय चालतात ते यासाठीच…  जीवन प्रवास कितीही खडतर असला तरी, करावा लागतो तो यासाठीच…’ आणि म्हणून अशाच जीवन प्रवासातला मी एक प्रवासी झालो…

कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून मी निघालो मुंबापुरीला…  नोकरीच्या शोधात...  अडीचशे तीनशे किलोमीटर दूर…  आपल्या वीतभर पोटाची खळगी भरणे हा खरा उद्देश… त्यानंतर कौटुंबिक जबाबदारी.  ते वीतभर पोट आयुष्यात काय काय शिकवून जातं ! कधी जगायला शिकवतं… तर कठीण प्रसंगी मरायला प्रवृत्त करतं… दुःखामध्ये सुख पाहायला शिकवतं, तर हर्षामध्ये संयम राखायला… खेळातील हार पचवायला शिकवतं… तर विजयामध्ये आकाशाला टेकलेल्या हाताबरोबरच, पायांना जमिनीवर राहायला शिकवतं… कधी सहानुभूती घ्यायला, तर कधी गरीबीवर प्रेम करायला शिकवतं… आणि म्हणूनच मला गरिबीची कधी लाज वाटली नाही; की कधी दुःख झालं नाही. कठीण परिस्थितीत, वेदनेच्या काळात सभोवतालच्या जगाकडे पाहायला शिकवलं… त्याचीच परिणती म्हणून मी मित्रांबरोबर आदिवासींचं जीवन अनुभवायला गेलो… अर्थात हातात कॅमेरा घेऊनच…

मित्राने निश्चित केलेल्या कार्यक्रमाला ज्या उत्कंठतेने मी होकार दिला, त्यातली ती तळमळ माझी मलाच जाणवत होती. कार्यक्रम होता जव्हारच्या आदिवासी पाड्यांना भेट देण्याचा. आपल्या नित्याच्या जीवनातून मनाला भावलेलं विश्व आणि त्यासाठी काहीतरी करण्याची उमेद, माणसाला सामाजिक कार्याला वाहून घ्यायला प्रेरित करते. तशाच विचाराने मित्राच्या सुचनेनुसार आम्ही आदिवासी पाड्यातील लहान मुलांसाठी खाऊ घेऊन जाण्याचे ठरवले. आमचा दोन दिवसांचा कार्यक्रम होता. त्यामुळे विवंचित मनाने आम्ही प्रवासास सुरुवात केली.  जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. मुख्यालयापासून   केवळ १३८ किमी अंतरावर असूनही  समाजातील उदासीनता, मागासलेपणा नष्ट झाला नसल्याचं ते ज्वलंत उदाहरण. पाड्यातील मानवी जीवन, तेथील लोकांचे दैनदिन व्यवहार याबद्दल थोडी उत्सुकता लागलेली. ऐकलेले आणि प्रत्यक्षातील जीवन यातला फरक आज उमजून घ्यायचा होता…मित्राकडून तेथील भोगौलिक परिस्थितीची माहिती मिळालेली होती. त्यानुसार तयारी केली गेली. आमच्या जेवणाची सोय तिथे आमच्या पद्धतीने होणे शक्य नव्हते म्हणून भुसारी मालाचं गाठोडं बरोबर नेण्याचं  ठरलं. त्यात  ज्वारी, तांदूळ, तेल, पालेभाज्या, फळभाज्या, चटणी, कांदा-लसूण इत्यादी जिन्नस काखोटीला मारले. ठाण्यावरून एस टीने जव्हार आणि नंतर पुढे जुनाट जीपने पाड्यापर्यंत प्रवास.. एका जीपमध्ये बारा ते पंधराजण. त्यातच सर्वांचे घरगुती सामान. आमच्या कॅमेऱ्यासोबत ह्याss मोठाल्या सामानाच्या पिशव्या.  पश्चिम दिशेला काळ्या-पांढऱ्या ढगांनी आपलं सामर्थ्य पणाला लावून रविराजाला झाकोळून टाकण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता.  त्यामुळे वातावरणात उष्मा खूप जाणवत होता. त्या वातावरणात जीव गुदमरल्यासारखा झाला होता. मेटाकुटीस आलेला जीव केव्हा एकदा त्या पाड्यातील जमिनीवर उतरतोय असं झालं होतं. एकदाचे त्या पाड्याच्या कोपऱ्यावर पायउतार झालो अन सामानाची कसरत करत इच्छित स्थळी पोहोचलो. 

एका छोट्याश्या खोलीत आमची राहायची व्यवस्था केली होती  ती जागा त्या पाड्याच्या सरपंचांची होती. शिवाय आमच्या जेवणाची सोय सुद्धा त्यांच्याच घरातल्या जेवणाने होणार होती. त्यामुळे राहायचा आणि जेवणाचा प्रश्न सहज सुटल्याचं समाधान होतं.  आम्ही संध्याकाळच्या उष्ण वातावरणातून बाहेर पडण्यासाठी, पिशवीतल्या बिसलेरीच्या थंड पाण्याचा चेहऱ्यावर शिडकावा मारला. प्रवासातील शिल्लक राहिलेले खाण्याचे पदार्थ संपवून बाहेर मोकळ्या, निर्जन रस्त्यावरून दूरवर नजर खिळवत उद्याच्या कार्यक्रमाविषयीच्या गप्पा सुरु होत्या. एव्हाना त्या ढगांच्या वेढ्यातून कशी बशी जागा काढत, सूर्याची ती कोमल किरणं हिरव्यापिवळ्या गवताने आच्छादलेल्या जमिनीवर पसरली होती. आमच्या खोलीच्या समोरील मोकळ्या जागेत, दुपारच्या वेळी अनाहूतपणे पडलेल्या तुरळक सरींच्या आगमनाने ओल्या झालेल्या मातीत, पाड्यातील लहान मुलं घसरगुंडीची मनमुराद मजा लुटत होते. त्यांचं ते खेळातलं रममाण होणं, मला पुन्हा एकदा माझ्या बालपणात घेऊन गेलं…

आम्हीही सवंगड्यासोबत     घराबाहेर   खेळ  खेळत असायचो...  म्हातारीचे पंख …  खूप हलके.... हळुवार...  हवेत तरंगत असायचेहाताला  लागत  नाही  म्हणून  उंचउंच  उड्या मारून पकडण्याचा निकराने प्रयत्न करायचो…  तरी हाताला लागत नाहीवर-वरपुढे-पुढे  जाताहे असं  दिसल्यावर त्याच्या मागे मागे धावत जायचं... मग पायाखाली दगड काय, चिखल कायकाटे काय...क़शाचिही   जाणीव  नाही व्हायची... कारण माहित आहे ?    आपण   नकळत  त्या पंखाच्या हळुवारपणावर  बेफाम,  बेधुंद  प्रेम  करायचो…  कधी कधी ते पंख हातात मिळायचे;  तर कधी कधी  खूssप  दूssरपर्यंत   पाठलाग  करूनसुद्धा  ते हाती  नाही लागायचे...  उंच उंच  आकाशात उडालेलं  पहायचो ते…  खाली येत नाहीसं पाहिल्यावर  जड  पावलांनी गेल्या मार्गाने परतपदरी निराशा… कधीकधी वाटतं… आपलंही आयुष्य त्या हातातून निसटत असलेल्या पंखासारखं तर नाही ना ? आपण सुखाचा शोध घेत असताना वणवण भटकत मात्र राहतो दुःखाच्या छायेत… तुलनात्मक जीवन जगताना अवतीभोवती असलेले सुखाचे क्षण आपल्या डोळ्यांना दिसेनासे होतात… सारं आयुष्य असंच  व्यतीत होतं; पण हाती मात्र विवंचना, दुःख,  मनस्ताप ,पश्चाताप यापेक्षा वेगळं काहीच लागत नाही… सुखाचे धागे दुःखाच्या विचारांनी गुंफत बसतो अन आयुष्य वैराण वाळवंटासारखे करून टाकतो… या प्रयत्नात आपण सभोवतालचं विश्व  विसरून जातो… 

पूर्वेकडचं निळसर आकाश आता रजनिकांताच्या प्रतीक्षेने काळवंडलेलं दिसत होतं… सगळीकडे शांतता…  मोकाट फिरणारे दोन-तीन कुत्रे सोडले तर  रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नव्हते. आता मात्र आमचा आदिवासी पाड्यातील जीवन प्रवास सुरु झाला होता… हातपाय धुवायला पाणी नसल्याने ते आणण्यासाठी बादल्या घेऊन आम्हाला अंधारात घराबाहेर पडावं लागलं.  हातात छोटी विजेरी घेऊन दोनशे मीटरवर एका ओघळीच्या काठी असलेल्या बोरींगवर गेलो. त्या थंड पाण्याने ताजेतवाने झालो व थोडी विश्रांती घेतली. जेवणाचे सर्व जिन्नस देऊनही जेवणाचा स्वाद निराळाच होता. मेणबत्तीच्या प्रकाशात कसेतरी दोन दोन घास खाऊन  जेवण उरकले. अन सकाळच्या तयारीसाठी लवकर झोपून गेलो…

आदिवासी वस्तीतील आमचा सकाळचा प्रवास सुरु झाला… मुलांसाठी आणलेला सगळा खाऊ बरोबर घेऊन घराबाहेर पडलो.  एका पाड्यात पोहोचतो न पोहोचतो तोच मुलांचा हाsss मोठा गलका. ती छोटी छोटी बाळं फेर धरल्यासारखे सभोवताली जमा झाली. उघडी… नागडी… पोट पुढं आलेली … हातापायाच्या काड्या झालेली… पण चर्येवर जरासुद्धा त्या परिस्थितीचं प्रतिबिंब नाही. वेगळ्या जगातून ही माणसं आली आहेत ह्या नजरेनं ती आमच्या कडे पाहत होती. उत्कंठा… जल्लोष… आनंद… सारं सारं काही त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं… खाऊचे  वाटप करताना त्यावर सगळ्यांच्या उड्या पडत होत्या. जी लहान-सान पोरं घाबरून घराबाहेर पडली नव्हती त्यांना त्यांच्या आया खाऊ आणण्यासाठी आमच्या दिशेने धाडत होत्या. काही लहान  मुली आपल्या लहान भावंडांना कडेवर घेऊन त्या घोळक्यात सामील झाल्या होत्या. हेही एक परिस्थितीचं विदारक चित्र आम्हाला पाहायला मिळालं! त्यांना खुश करून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपला…


 आनंदाने फुलून गेलेले त्यांचे चेहेरे पाहून शरीरातला माणूस जागा झाला. तिथल्या वडीलधाऱ्यांची जातीने विचारपूस करत होतो. काही मंडळी मित्राच्या  परिचयाची म्हणून त्यांच्यात मिसळायला  विशेष कष्ट सोसावे लागले नाहीत आम्हाला. आमचा डेरा तसाच दुसऱ्या पाड्यात निघाला. सगळा प्रवास चालतच होता.  आदिवासींसाठी काम करणाऱ्या एन जी ओ मधील एक कर्मचारी आमच्या मदतीला होता.  त्यामुळे   कॅमेरा सोडला तर  इतर पिशव्यांचं ओझं त्याच्या मोटार साइकलवर ठेवूनच आमचं मार्गक्रमण चालू होतं.  प्रत्येक कुटुंबाला भेट देत होतो… त्यांचं जीवन अगदी जवळून बघत होतो… घरात जावून त्यांच्या जीवनाची परिभाषा समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो. वितभर पोटाची खळगी भरायला सुद्धा पुरेसं अन्न नाही… अंगभर वस्त्राला पारखी झालेली ती मंडळी, अशाच समाजसेवी संस्थांकडून मिळालेल्या कपड्यांनी आपलं अंग झाकाताना दिसत होती.… छोट्यातील छोटी भेट सुद्धा त्यांना आसमानाएवढी वाटत होती… मनीचे स्वप्न साकार झाल्याची भावना प्रकटलेली दिसली… कसं  आयुष्य असतं  माणसाचं ?  केवळ मुलभूत गरजा जरी भागल्या तरी सामान्य माणूस समाधानानं जीवन कंठीत असतो. पण इथं फक्त सामाजिक बांधिलकीनं, एकमेकांना साहाय्य करून बांधलेल्या, गवताने शाकारलेल्या कुडाच्या झोपड्या, हाच निवारा होता. पण मग अन्न-वस्त्राचं काय?

 आमच्यासोबत चालत असलेली मंडळी, त्यांच्या प्रामणिकपणाचा, गरिबीचा बळी कसा जोतोय याची उदाहरणं ऐकवत होती. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ती मंडळी शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवण्याची आपली नैतिक जबाबदारी समजून पार पाडण्याचं सफाईदारपणे नाटक करतात. योजनांतर्गत मिळालेला पैसा हा राजा हरीश्चन्द्राच्या कथेतील, रांजणातील पाणी होतं ते.  रांजणात कितीही पाणी भरलं तरी रांजण मात्र रिकामाच. तद्वतच  आदिवासींच्या कल्याणार्थ कितीही योजना राबविल्या… त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला…. तरी आदिवासीं पर्यंतच्या त्या पैशाच्या प्रवासाला गळती लागलेली असते… ह्या प्रवासातील दहा टक्केतरी पैसा शेवटच्या स्थानापर्यंत सुखरूप पोहोचतो की  नाही ही शंकाच वाटते… सामाजिक सुधारणा… भौगोलिक सुधारणा… सांस्कृतिक सुधारणा… अशा प्रकारच्या योजना आणि त्याबद्दलच्या घोषणा,  कानांना ऐकायला सुखद आणि आशावादी वाटल्या, तरी त्या प्रत्यक्षात धरतीवर  लाभार्थीसमोर अवतरल्या तरच, त्याचा मूळ उद्देश सफल झाल्यासारखा वाटेल आणि दिसेलही… पैशाच्या लोभापायी आजकाल सगळी मंडळी माणुसकीला तिलांजली देताना दिसतात. ज्यांचा, ज्या गोष्टींवर  अधिकार आहे तो हिरावून घेण्याचा हक्क ह्या मंडळींना दिला कोणी ? या समाज जीवनात अशाही प्रकारे ‘माणूस’ नावाच्या प्राण्याचं शोषण केलं जातय आणि तेही राजरोसपणे... हे सगळं दिःड्मुठ होऊन आपण पाहत राहतो… हतबल होतो… आवाज उठवण्याचा प्रयत्न  केला तरी तो दाबला जातो… त्यामुळे जैसे थे अवस्था… या विचारांनी मन कासावीस होतं… तेवढ्यापुरतं अंगातलं रक्त सळसळून येतं… पण पुन्हा सारं शांssत…



परिस्थितीचा मागोवा घेत दुसरा, तिसरा पाडा करत गेलो. दुपारची वेळ...  जवळपास दीड दोन तासांच्या त्या डोंगराळ भागातल्या प्रवासाने आमची पुरी दमछाक झाली होती. जेवणासाठी परत मुक्कामाच्या ठिकाणी परतणे शक्य नव्हते. मध्येच तुरळक जलधारा बरसल्याने उष्माही चांगलाच वाढला होता. पाड्यातल्या मंडळींना जेवणाच्या सोयीबद्दल विचारले असता तशी सोयच नव्हती. मात्र त्यातल्या एकाने विचारणा केली 'साहेब दुपराचं जेवण माझ्याच घरी घ्याल का ?' आमचा होकार नकार ऐकायच्या अगोदरच  'चला तर मग जेवायला'  म्हणून आमच्यापुढे स्वतःच्या घरी गेला. त्याच्या मागून आम्ही… जेवणाची सोय होतेयसं पाहून आनंदून गेलो. कॅमेरा बाहेर ठेवून आम्ही जेवायला बसलो. एका थाळीत उकड्या तांदळाचा भात आणि उकडलेली चवळी…  बस्स... ते बघूनच थोडं विचित्र वाटलं. पण इलाज नव्हता.  समोर आलेलं ब्रम्हान्न होतं आमच्यासाठी… दोन-चार घास, मिठाचा नि पाण्याचा आसरा घेत घशाखाली कसे बसे उतरवले. आमच्यावर दाखवलेल्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो होतो… त्यांना दोन-चारशे रुपये देऊ केले. मनोमन त्यांचे आभार मानले. परतत असताना डोक्यात विचार चक्र सुरु झाले… माणुसकीचा झरा होता तो ! त्याला पैशाची श्रीमंती लागत नाही…

 शहरीकरणामुळे माणूसपण हरवलेली आम्ही माणसं, स्वतःच्या मस्तीत, स्वतःच्याच वलयात स्वःताला गुरफटून घेत असतो. परिणामी माणूसकीतलं देवपणच विसरून गेलोय… अशा सामाजिक प्रश्नांच्या विचारचक्रामधुनच, जव्हारच्या उत्तरेकडील, नासिक हद्दीलगतच्या पाड्यात जायचं  ठरवलं. डोंगर दऱ्यातून चालून चालून दमछाक झाली असली तरी आणखी काही वेगळं चित्र पाहायला मिळतंय का या उत्सुकतेने भराभर पाउलं उचलत आम्ही पाड्यात पोहोचलो. समोर एक चित्र दिसत होतं. त्या पाड्यात एक सायकलस्वार आमच्या अगोदर पोहोचला होता. त्याच्या भोवती लहान मुलांचा, बायांचा गराडा पडला होता. कारण स्पष्ट होत नव्हते.  न राहवून आम्ही जवळ जाऊन पाहिलं, तर तो भंगारवाला होता…

 बाजूलाच एका लहानग्याच्या हातात एक पाव दिसला. तो पाव खात असताना, त्याच्या उघड्या पोटावर पावाचे लहान लहान तुकडे पडलेले दिसले. त्या पावाला वरच्या बाजूस काहीतरी लागलं होतं. पावावर, पोटावर, चेहऱ्यावर माशा घोंगावताना दिसत होत्या. ते ओंघळवाणे दृश्य पाहून मन चलबिचल झालं.  तो भंगारवाला अन पाववालाही होता.  काचेच्या दारूच्या बाटल्यांच्या बदल्यात तो पाव विकत होता. पैसा नाही… पाणी नाही… अंगावर कपडे नाहीत… खायला अन्न नाही… जे अन्न मिळेल ते सकस आहे की नाही हे माहित नाही… मग कुपोषण होणारच !  "कुपोषणाचे बळी” म्हणून दिवसागणिक वर्तमानपत्रात ठळक अक्षरात बातम्या छापल्या जाणार… पण याचं कोणाला सोयरसुतक…? जो तो आपल्याच धुंदीत मश्गुल. डोंगराळ भागातल्या त्या कुटुंबांच्या मालकीच्या शेतजमिनीचे लहान लहान तुकडे! काय पिकणार आणि काय पिकवणार ?  निसर्गावरच अवलंबून सगळं… जे पिकेल ते खायचं… असेल तेवढंच खायचं… अशी पद्धतीने गुजराण. आपल्या संसाराला हातभार लागेल म्हणून काही रोजगार करायचा तर त्याचा मोबदला कुठे ? तो कष्टाचा मोबदला त्या आदिवासींच्या ओंजळीत नाही तर ठेकेदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या खिशात… निबर मनाचे लोकच गबर होत असतात… अशा जगात कष्टाचं मुल्य शुन्य असतं… गाळलेला घाम व्यर्थ असतो… सामाजिक, शैक्षणिक सुधारणा कशा होणार ? शाळा नाही… शाळा असेल तर शिकवायला शिक्षक नाहीत… मुलांविना ओसाड पडलेल्या शाळा पडझडीला आलेल्या दिसल्या. दूssर दूरवर, डोंगराळ भागातल्या शाळांमध्ये आठवड्यातून एक दोन दिवसच शिक्षक हजेरी लावणार तर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार कसा होणार ?  हे सगळे अनुत्तरीत प्रश्न, त्या बालकांचं भविष्य धुसर करत होते हे मात्र निश्चित.

 पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा, त्या पाड्यात चालवली जात होती. मुलींच्या वयाच्या अठरा-एकोणिसाव्या वर्षीच, त्यांच्या झोपडी बाहेर पाच पाच मुलं रांगताना दिसत होती. त्या बिचाऱ्या कन्यांचा तरी काय दोष ? पुरुषप्रधान संस्कृती, परंपरा आणि पंचायत… याला बळी पडलेल्या त्या अबला… एनकेन प्रकारेन शिक्षण झालं तरी पाडा सोडून जाणार कुठे? तिथेच… त्याच जंजाळात आयुष्य वेचायचं… ज्या मातीत जन्म घ्यायचा, त्याच मातीत ठरल्या पद्धतीने जीवन कंठत राहायचा… स्वःताच्या जगात बदल नाही की बाहेरच्या जगाचा स्पर्श नाही… तरीही त्या लोकांच्या नजरेत आशावाद ठासून भरला होता. आमच्या बेचैन झालेल्या मनाला त्यांचा आशावाद हाच एक सुखावह किरण वाटत होता…

दुपार टळून गेलेली. आम्ही एका दिवसांत पाहिलेलं, अनुभवलेलं गरिबीचं दारूण चित्र समोर उभं राहिलं होतं. त्याच चित्राच्या झाडा-झुडुपातून वाट काढत आम्ही डांबरी सडकेवर येउन पोहोचलो… चालून चालून पायांचा पिट्टा पडला होता. छायाचित्रणाला तसा वाव नव्हता म्हणून कॅमेरे आत ठेवले होते.  ती पाड्यातली गंभीर परिस्थिती, मळभ बनून आकाशात पसरली होती. गुरांना चरायला घेऊन आलेली पोरं ठोरं रस्त्यात मस्ती करत होती.  हातातल्या काठ्यांवर  चढून लांब उड्या घेणं…. गाई-म्हशींच्या  पाठीवर बसून गाणी गुणगुणत एकमेकांच्या खोड्या करणं… गुरांना पळविण्यासाठी त्यांच्या शेपटीला चावा  घेणं इत्यादी मजेशीर प्रकार चालले होते. दिवसभराच्या शेतीतील कामातून थोडीशी उसंत मिळालेली मंडळी, रस्त्याच्या कडेला येऊन झाडाखाली शांत बसली होती. तसेच पुढे येताना दूरवर रस्त्याच्या कडेला एक बाई 


उभी असलेली आम्हाला दिसली.  तिच्या बाजूलाच खाली आडवं पडलेलं लहान पोर होतं. ते पाहून आमचे डोळे विस्मयचकित झाले.  ह्या वेळेस असं चित्र कसं  असू शकतं ? ती घटना होती ?  अपघात होता ? की  विश्रांती होती ? हे कळायला मार्ग नव्हता…

फोटोग्राफर म्हटला की आनंद असो, दुःख असो,  अपघात असो, की  मयत असो  तिकडे धावलाच पाहिजे. त्याही परिस्थितीत थोडं तसंच झालं… आमचा कॅमेरा बाहेर आला एक-दोन इमेजेस क्लिक केल्या आणि मग जवळ गेलो. ते बाळ रस्त्यावर झोपल्याचं कारण विचारलं असता, ‘सकाळपासून त्याच्या अंगात ताप भरला होता. घरात एकट्याला कसं ठेवायचं  म्हणून सोबत घेऊन आले होते.  आई-वडील दोघेही शेतमजूर. आज काम नाही केलं तर मजुरी कशी मिळणार ?  कोणीतरी काम केलंच पाहिजे ह्या विचाराने, ती बिचारी मुलाला कसेबसे कडेवर घेऊन शेतातून बाहेर रस्त्यावर आली होती. ताप पाहिला तर एकशेचारच्या वर. आम्ही कपाळाला हात लावून पाहिले.  चटके बसत होते. ते बाळं बेशुध्दच होते. कदाचित ताप डोक्यात गेला आहे की काय ? या विचाराने आम्ही हवालदिल झालो होतो. त्या वेळेस त्याला द्यायला कोणत्याच प्रकारचं औषध नव्हतं.  मग त्याचा ताप उतरणार कसा ? तो मेंदूपर्यंत गेला होता तर मग तो शुद्धीवर येणार कसा ? त्याला तातडीच्या उपचाराची गरज होती.  काय करावं  हे सुचत नव्हते. आम्ही आणलेले मेडीसीनसुद्धा आमच्या सोबत नव्हते.  आता काय करणार ? विचारलं असता  'त्याच्या वडिलांना बोलावणं पाठवलंय. ते आल्यानंतर ह्याला घेऊन घरी जातील आणि मी कामावर जाईन.'  त्या बाईच्या ह्या उत्तराने आम्ही अवाक झालो.  ती पुढे सांगत होती ‘देवाची देण… जगलं तर आपलं… दवाखाना नाही… डॉक्टर नाही… औषध नाही… ह्याला घेवून जायचं तरी कुठे ?’ आम्ही ज्या ठिकाणी उतरलो होतो तेथून पंधरा वीस किलोमीटर दूर होतो. लगेच औषध उपलब्ध होणंही शक्य नव्हतं. असाच थोडा वेळ विचार् करत उभे… नंतर मन घट्ट करून,  काळजावर दगड ठेवला नि परतीचा प्रवास सुरु केला…

विकसीनशील देशात मागासलेपणा…   स्वातंत्र्याच्या अठ्ठावन्न-साठ वर्षाच्या काळात एवढीही मानसिक सुधारणा होऊ नये की, जी सामाजिक सुधारणा आपल्या हातून झालेली नाही, किंबहुना ती करण्याची टाळाटाळ केली, त्याची लाज वाटावी. आपली सामाजिक कर्तव्यच आपण विसरलो आहोत.  त्या गरीब कुटुंबाची फसवणूक करून माणुसकीला कलंक फासतोय याची चाड उरली आहे कुठे ? केवळ औषध उपचार नाहीत, तशी सुविधा नाही म्हणून त्या निरपराध बालकाचा हकनाक बळी जातोय याला जबाबदार कोण ? अशा एक न अनेक प्रश्नांनी मनाचा ताबा घेतला होता. आमची परतणारी पाउलं जड झाली होती. अंतर कापलं जात नव्हतं. समोरच्या सडके ऐवजी ते बालक समोर दिसत होतं…. नंतरच्या कालावधीत त्याचं काय होणार ? ते शुद्धीवर येणार की नाही ? त्याला औषधोपचार मिळणार की नाही ? त्याचं  भावितव्य  काय असणार ? समाजात मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, शिक्षणाशिवाय सुशिक्षितपणा येणार कोठून ? अशा प्रकारच्या शंकेचं काहूर माजलं होतं मनात… एवढ्या महाभयाण वास्तवाचं, काळजाला पीळ पडेल असं चित्र…. परंतु त्या बाईच्या चेहऱ्यावर दुःखाचं किल्मिषही दिसत नव्हतं… जी पोरं जन्माला आली ती देवाची देण आणि मरणासन्न झाली तरी त्याचीच इच्छा… मनुष्यजन्म किती स्वस्त झाला आहे… आम्ही कसे बसे आमच्या सामानाच्या ठिकाणी पोहोचलो. गाठोडी उचलली आणि घरच्या रस्त्याला लागलो..


 आदिवासींचं जीवन…आयुष्य अनुभवायला आनंदाने आलो होतो पण जाताना मात्र  दुःखाने भरलेले अंतःकरण घेवून निघालो  होतो... घरी गेल्यावर दोन दिवस अन्नाचा घास माझ्या व्याकूळ  घशाखाली उतरला नव्हता. विचार… चिंता चालूच होती… दोन दिवसांनी एन जी ओ च्या कर्मचाऱ्याचा फोन आला तो आनंदाची वार्ता घेऊनच… ‘त्या बाळावर ओढवलेला धोका टळला होता… ते बाळ मृत्युच्या जबड्यातून बाहेर आलं होतं आणि आता त्याची प्रकृतीही ठीक होती.’ ते शब्द कानावर पडल्या पडल्या माझ्या हातातून फोन खाली केव्हा निसटला हे समजायच्या आतंच माझे दोन्ही हात चटकन वर गेले त्या आदिवासीं सारखेच… विधात्याचे, हात जोडून शतशः आभार मानायला…    
                         -----------x----------
दिनांक- 22-10-2013                                                           

[This article is published in PRAHAR newspaper dtd.23-03-2014-
    


2 comments: