जंगल सफारी…
डिसेंबरचा
शेवटचा आठवडा. तो दिवस प्रवासाचाच होता. मुंबई –नागपूर, नंतर सलग
खुश्कीच्या मार्गाने ३ - ४ तासांच्या प्रवासाने पुरा थकून गेलो होतो. तरीही हे सगळ क्षुल्लक वाटत होतं त्या जंगल सफारी समोर! कॅमेऱ्यात जेरबंद करण्याच्या जय्यत तयारीसाठी आमची कॅमेरा बैग परीपूर्ण भरलेली. काहीही झालं तरी वाघाला कॅमेरऱ्यात
बंदिस्त करून आणायचंच, अशी कॅमेऱ्याच्याच पट्ट्याला
गाठ
बांधलेली. अशा आशावादी वातावरण अन गप्पांमधून आमची गाडी मस्त चालली होती
. त्यामुळे प्रवास कधी संपला हे कळलंच नाही. नियमित आणि ठरल्या प्रमाणे, रात्री श्रम परिहार- जेवण- गप्पा,
काही वेळ संगीतात व्यतीत आणी मग सकाळच्या आशेच्या किरणांचा धागा मनात घट्ट पकडत- निद्राधीन.
‘जंगलवेड्या प्राण्यांना, दोन चार महिने भ्रमंती नाही केली तर, जंगल,
दऱ्या-खोऱ्यांची स्वप्न पडतात. कारण जे सुख, चैतन्य तेथे आहे, जी मनःशांती तेथे आहे, ती या सिमेंटच्या जंगलात कोठून असणार ? त्या ओल्या मातीचा अवती-भोवती दरवळणारा सुगंध.... दगडांवर पसरलेली शेवाळं..... पानां-फुलांवरील इवलेसे दवबिंदू......त्यातून लुकलुकत डोळ्यांवर पडणारी सोनेरी किरणे..... झाडा -झुडपांच्या आडव्या-तिडव्या पसरलेल्या छोट्या छोट्या फांद्या....मळकटलेल्या वेड्या-वाकड्या पाऊल वाटा.... त्यातच चिरविश्रांती घेत असलेली हिरवी -पिवळी पाने....... मध्येच संथ वाहणारे झरे... त्यातून पाय घसरणार नाही याची काळजी घेत, चिखलानं बरबटलेली आपली जड पाऊलं! अशी हि निसर्गाची भ्रमंती , शहाण्यांना वेडं करते अन वेड्यांना स्वर्गानन्दाची अनुभूती देते.’
तो आमचा पेंच अभयारण्यातला पहिला दिवस होता. पहाटे
५ वाजताच उठून शिकाऱ्याच्या गणवेशात, हातात तोफ घेऊन स्वाऱ्या निघाल्या. जंगलातली ती बोचरी थंडी गार वाऱ्याच्या झुळुकीने अंगाला चांगलीच झोंबत होती. त्यामुळे
स्वसंरक्षणार्थ -अंगात स्वेटर, कानाला (माकड) टोपी , गळ्यात स्कार्फ, हातात मोजे, आणखी काय काय ! पण तरीही गारव्यामुळे हातमोजे असूनही बोटे बर्फासारखी थंड पडली होती. कानाच्या पाळ्या, नाकाचा शेंडा तर बेशुद्धावस्थेतच होता.
अर्ध्या-एक तासाच्या जंगलातील प्रवासा दरम्यान निसर्गाचं विलोभनीय दर्शन झालं .
घनदाट, उंच-उंच वनराईतून, धुक्याचा दाट पडदा छेदत, हिरव्यागार गालिच्यावर पडलेली सोनेरी किरणं ! त्यातूनच दुडू - दुडू धावत जाणारा हरणांचा कळप ! फांद्या फांद्यांवरून आपल्या पोरांना पोटाशी धरून उड्या घेणारी माकडं !
मंत्रमुग्ध करणारा पक्षांचा किलबिलाट ! ह्या साऱ्या आनंददायी वातावरणामुळे आमची थंडी गायब झाली. आणि हात सरसावले कॅमेऱ्याकडे......मार्ग बदलत असताना, लांबवर कुठेतरी इवलुशा कोल्ह्यांची जोडी दिसली . फारच चपळ ! मस्तीखोर ! आमच्या मार्गावरच पुढे पुढे चालत होती. अंतर खूप असल्याने फोटो घेण्यासाठी जीप जरा पुढे नेली. पण तेवढ्यात त्यांनी धूम ठोकली.
चक्क गायब! बाजूच्या गवताळ भागात, कोवळ्या उन्हाचा आनंद घेत, मस्ती करत असलेले बाराशिंगे, शिंगात अडकलेले गवताचे भारे घेऊनच गवत तुडवीत मार्ग क्रमण करत होते. असाच अभयारण्याचा आनंद घेत आमची सकाळची सफारी संपवून रेस्ट हाउसवर परतलो. पदरी थोडी निराशा होती कारण वाघोबाचं दर्शन झालं नव्हतं. तरीही
आशा सोडली नव्हती.
संध्याकाळच्या सफारीसाठी, रेंज फॉरेस्ट ऑफिसर आमच्यासोबत जातीने होते. सफारी जीपनेच, पण वणवण करून रिकाम्या हाताने परतणार, एवढ्यात वोकि-टोकी वर निरोप आला. आम्हाला हवा
असलेला तो क्षण समीप आला. आमचे कान टवकारले, निरोप होता- ‘अनेक मार्गांपैकी एका मार्गावर चार बछड्यांसह एक वाघीण अगदी रस्त्यावर विश्रांती घेत होती.’
नकळत आतून आनंदाची एक लकेर, किन्नरी आवाज करत कंठातून बाहेर पडली. आम्ही आनंदून गेलो होतो. त्या मार्गावरील योग्य जागी पोहोचण्या अगोदरच कॅमेरे सरसावले, लेन्सेस बदलल्या. जेवढे काही आवश्यक होती तेवढी सेटिंग्जची खात्री करून घेतली. तेवढ्यात आमची जीप इच्छित स्थळी पोहचली. सुमारे ५००-६०० फूट दूर अंतरावर-रस्त्यावरच परंतु झाडांच्या आडोशाला तीन बछडे आपल्या आईबरोबर शांत बसले होते.
सफारी जीपच्या चालकाला आमची जीप थोडी पुढे घ्यायला सांगितली पण जंगलाचे काही नियम असतात त्यांना मोडून चालणार नव्हते. फक्त प्रतीक्षा करत होतो ते बछडे आणि आमच्यातील अंतर कमी केव्हा होईल याची. कारण आम्हाला सीमा रेषा ओलांडायला परवानगी नव्हती. पाहिजे तसं दर्शन होत नव्हतं म्हणून आमची चुळबुळ चाललेली. तेवढ्यात एकाच जागेवर बसून कंटाळलेले बछडे सावकाश उठले
आणि थोड्या मोकळ्या जागेत रस्त्याच्या
मध्यभागी जाऊन बसले. पश्चिमेकडे कलणारी उन्हं घनदाट झाडीतून, पाना-फांद्यांच्या झारोख्यांतून संथपणे पाझरत होती. पण त्या बछड्यापर्यंत ती पोहचत नव्हती. अंधुकशा
संधी प्रकाशात दुरूनच त्यांचं दर्शन झालं आणि कॅमेऱ्याच्या एलसीडी वर इवलीशी छबी उमटली. प्रतिमा छोटी होती पण समाधान मात्र मोठं होतं
!
आणि थोड्या मोकळ्या जागेत रस्त्याच्या
मध्यभागी जाऊन बसले. पश्चिमेकडे कलणारी उन्हं घनदाट झाडीतून, पाना-फांद्यांच्या झारोख्यांतून संथपणे पाझरत होती. पण त्या बछड्यापर्यंत ती पोहचत नव्हती. अंधुकशा
संधी प्रकाशात दुरूनच त्यांचं दर्शन झालं आणि कॅमेऱ्याच्या एलसीडी वर इवलीशी छबी उमटली. प्रतिमा छोटी होती पण समाधान मात्र मोठं होतं
!
आमचा कार्यक्रम चार-पांच दिवसांचा ठरलेला होता आणि
तोही वेगवेगळ्या अभयारण्यातला. प्रवास
तसा खडतरंच. भर दुपारी आम्ही कान्हाला पोहचलो. क्षणाचीही उसंत न
घेता दुपारच्या जेवणाचे सोपस्कार आटोपले अन वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सायंकाळच्या
सफारीची तयारी सुरु केली. आता मात्र आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ‘कान्हा अभयारण्य’
हे वाघांसाठी राखीव असल्याने तेथे नक्कीच चांगले फोटोग्राफ्स मिळणार याची खात्री होती.
शिवाय वन अधिकारी आमच्या दिमतीला होतेच. त्यामुळे आमची खात्री आणखी बळावली. प्रत्येकाने
अगदी सामंजस्याने, जीप मध्ये आपापल्या जागा
घेतल्या अन सफारी सुरु झाली. ५०० मीटर अंतर
कापून जातो न जातो तोच, जीपचा ब्रेक कचकन लागला. गाडी थांबली. गाईड-वन अधिकारी यांनी, बाजूलाच उभ्या असलेल्या झाडाच्या डोलीकडे बोट दाखून
घुबडांच्या छोट्या पिल्लांचं दर्शन घडवलं. एक-ना-दोन तर पाच-पाच पिल्लं एका रांगेत
बसून मिश्किल डोळ्यांनी संध्याळच्या तांबूस किरणांचा आस्वाद घेत होती. घुबडाचा तोंड
पाहणं समाज जीवनांत अशुभ मानलं जात असलं तरी निसर्गाचा नियमच वेगळा. 'ह्या पिल्लांचं
दर्शन झालं म्हणजे नक्की काही तरी हाताला गवसणार'
याची ग्वाही आम्हाला त्या अधिकाऱ्याकडून
मिळाली. नुसत्या दर्शनावर आम्ही समाधान मानले नाही. तर पटापट त्या पिल्लांना कॅमेऱ्यात
कैद करून टाकले दुसऱ्या दिवशीच्या आशादायी-यशस्वी
सफारीसाठी…
तो दिवस सोनेरी अक्षरांनी म्हणण्यापेक्षा
‘सोनेरी छायाचित्रांनी’ आमच्या कॅमेऱ्यात कोरला
गेला. सकाळी भल्या पाहटे उठून तशाच थंड वातावरणात
आम्ही, मनोमन देवाची प्रार्थना करत रेस्टहाउस बाहेर पडलो. आज वाघ असल्याची जर बातमी
आली तर आमच्यासाठी हत्तीच्या सफारीची सोय करण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती; पण त्यासाठी
जंगलात त्या मार्गावर वाघाचं असणं महत्वाचं होतं. झालं तसंच. आमच्या सोबत असलेल्या
अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेली एक स्मितहास्याची लकेर पाहून आम्ही देवाचे तिथल्या
तिथे पटकन आभार मानले. आमच्या कानावर ती खबर येण्याअगोदरच आमची जीप, जंगलातील वेगाचे
बंधनं थोड्याफार प्रमाणात झुगारून त्या दिशेने सुसाट धावू लागली.
एका घनदाट कांजाळात लपून बसलेल्या
बलदंड 4 फूट लांबीच्या वाघाचे, त्या झुडुपांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फान्द्यांच्या
फटीतून दर्शन झाले. कॅमेरे सरसावले होते. हत्तीची पावलं संथ गतीने पडत होती. मोकळ्या
जागेच्या शोधासाठी माहूत प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता अन आमची मात्र, अंबारीत घुसळण
होत होती. वाघ नि आमच्यातील अंतर कमी असल्याने आमची धांदल उडाली होती-लेन्सेस बदलण्यासाठी. सुपर टेली लेन्स वरून वाईड वर येई पर्यंत वाघाच्या
काही हालचालींना मात्र मुकावे लागले. ज्या कांजळात वाघ होता तो आता हळूहळू बाहेर आला
अन समोरच्याच ३-४ फुट उंच असलेल्या गवताळ भागात
शिरला. आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
हत्तीची एक फेरी त्या गवताळ टापूभोवती झाली अन "ईद का चांद" दिसावा तसा वाघाचा चेहरा गवताच्या झुपक्यातून दिसला. काय ते
तेज ! करारी डोळे...भेदक नजर... निश्चल चेहरा...आजूबाजूला पर्यटकांचा गोंधळ...हत्तींची धावपळ... तरीही त्याच्या चेहऱ्यावर याचा कसलाही लवलेश नव्हता. जणू काही त्या
जंगलामध्ये फक्त तो एकटाच आहे ! आणि म्हणूनच
साऱ्या जंगलावर त्याचं
अधिराज्य असणं साहजिकच आहे.
दुपारच्या तळपत्या उन्हांनी कसनुसे चेहरे करून पडलेली तांबूस पिवळसर रंगांची गवताची पातीं, प्रातःकालच्या
दवबिंदूंनी ताजेतवानी होवून आपल्या राजाच्या रंगात रंग मिसळण्यासाठी, एकमेकांच्या खांद्याला खांदा देत, सोनेरी सूर्यप्रकाशात
पुन्हा नव्या उभारीने सळसळत होती. त्या गोंडस चेहऱ्याने आता पूर्णाकृती धारण करत आपला
गवतातला डेरा सावकाशपणे टापूच्या कडेला हालवला होता. तेव्हा मात्र आम्ही आमच्या माहुताला
अगदी कळकळीची विनंती करून, परतीच्या दिशेने निघालेला हत्ती परत फिरवायला सांगितला.
डोळ्यांमध्ये साठवून ठेवलेली मूर्ती कॅमेऱ्यांमधून सोबत आणायची होती. तो निर्विकारपणे गवतामध्येच शांत बसून राहिला. त्याची
नजर जी आम्हाला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, ती थेट अंतर्मनापर्यंत पोहोचली
होती. कशाचीच भीती नसलेला हा प्राणी आमच्याकडे एकटक बघत होता...डोळ्यात डोळे घालून!
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होतो ते आमच्या
कॅमेऱ्याच्या सहाय्याने. त्याचा हिंस्त्र स्वभाव, भेदक नजर, अजस्त्रपण
यातलं आता काहीच दिसत नव्हतं त्याच्या चेहऱ्यावर. पण एक अनामिक चिंता मात्र
डोळ्यातून बाहेर डोकावत होती- ‘पूर्ण विश्वातून दुरापास्त होत चाललेली आपली जमात… एक-एक करत आपल्या भाऊबंधांची संख्याच
कमी होत असल्याची जाणिव... नकळत आपल्यामधून अचानक गायब होणारे आपले सखे- सोबती... आणि हे सर्व प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी
पाहण्याचा नशिबी आलेला करंटेपणा...’
आम्ही पटापट त्या बछाड्याला कॅमेऱ्यामध्ये
स्थान देवून, परतीचा प्रवास सुरु केला. ‘वाघ’
या नावाला 'हिंस्त्र श्वापद' बिरुद लागल्याचं त्या बछड्याच्या बोलक्या
चेहऱ्या वरून कुठेही दिसत नव्हतं. त्याचा तो शांत, मवाळ, अपराधी चेहरा नजरे समोरून हालायला तयार
नव्हता.... ह्या साऱ्याने माझं मन कासावीस झालं, सैरा वैरा धावत निघालं...बालपणीच्या आठवणीतल्या
धुक्यातून… १९६८-६९ चा काळ. बालपणात घरातील वडिलधाऱ्या मंडळींच्या मुखातून छान-छान
गोष्टी ऐकायला खूप मजा यायची. किंबहुना रात्री
अंगणात अंथरुणावर पडल्यावर, नजर आकाशातील चांदण्यांकडे खिळलेली असायची अन कानावर मात्र आजी-आजोबांच्या हव्याहव्याशा गोष्टी.
त्या कथेतील प्राणी, पक्षी यांच्या आकाराप्रमाणे, आकाशातील चांदण्यांना एकत्र गुंफण्याचा,
जुळवण्याचा एक मजेशीर प्रयत्न करत असायचो..
तो काळ
कमी लोकसंख्येचा... डोंगरपायथ्याशी घनदाट अरण्यात, जेम-तेम चार-पांच कुटुंबाचं मिळून गाव वसलेलं
असायचं. वनराई घनदाट असल्याने दैनंदिन कामं
दिवसाढवळ्या आटोपली जायची. रात्री अपरात्री
घराबाहेर पडायचं कोणाचं धाडस नाही व्हायचं. कारण हिंस्त्र श्वापदांची भीती असायची.
छोटी-छोटी जंगलं असली तरी त्यात प्राणीमात्रांचा वावर होता. निसर्ग- वन्यजीवन यांचं जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी, त्याचा समतोल राखण्यासाठी तशी घडी निसर्गानं
बसवलेली असते. आजोबांच्या तोंडून अशा गप्पा
ऐकताना भीतीने अंग कापत राहायचे, रात्री स्वप्नात सुद्धा वाघ-सिंह दिसायचे. तरीही त्या
गोष्टी कुतूहलाने ऐकत राहायचो. त्या काळी राजे
राजवाडे, श्वापदांच्या शिकारी करत पण ते प्रमाण फार कमी होतं. प्राण्यांची संख्या जास्त
होती त्यामुळे निसर्गाच्या सामतोलावर विशेष परिणाम झालेला दिसून यायचा नाही. परंतु
काळ बदलत गेला...बेसुमार लोकसंख्या वाढली...जंगलतोड वाढू लागली...पैशाच्या हव्यासापोटी
प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले...काळाबरोबर निसर्गचित्रहि बदलले...
सगळ्याचाच कायापालट झाला...त्याची परिणीती मात्र वन्यप्राण्यांच्या
घटणाऱ्या संख्येत झाली. दिवसाढवळ्या दिसणारे
प्राणी आता रात्री रात्री जागवून सुद्धा दिसेनासे झाले. जंगलंच्या जंगलं पालथी घालून
सुद्धा पाउलखुणा दिसेनाशा झाल्या. हिरव्या गार गर्द झाडीने आता ओसाड माळरानाचे रूप
धारण केले होते. उंच उंच वृक्षांनी, झुडुपांची जागा घेतली होती...आणि झुडपांची जागा
सिमेंटच्या जंगलांनी घेतली होती... निसर्गचक्र आता अशा पद्धतीने चालू होतं. श्वापदांना
राहायलाच जंगलं उरली नाहीत तर मग ते थेट लोकवस्त्या मध्ये प्रवेश करणारच...जंगलावरील
अतिक्रमणे त्यांच्या जीवावर उठल्यावर ती रस्त्यांवर उतरणारच...जीव वाचवण्यासाठी त्यांनी
गावं -शहरात शिरकाव करण्यास सुरुवारत केली तर त्यात नवल ते काय ? हिंसेच्या विविध घटना
घडायला लागल्या.
जेव्हा ‘मानवाच्या’ जीवाला धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले
तेव्हा मात्र मानवाच्या सुरक्षिततेबरोबरच वन्य प्राण्यांच्या संवर्धन अन सुरक्षेचा
साधा वाटणारा प्रश्न, सामान्य वन्यप्रेमींप्रमाणेच सामाजिक संस्था आणि सरकारलाहि भेडसावू
लागला. हा समतोलच मुळी ढळत चालला होता. यावर आजवर बऱ्याच उपाय योजना झाल्या. सामजिक
वनीकरण हाती घेतले गेले… अस्तित्वात असलेली जंगले वन्य प्राण्यांसाठी राखीव म्हणून
घोषित करण्यात आली… राखीव जंगलांचे हळू हळू प्रमाण वाढत चालले… तरीही आज मितीस लाखो
पर्यटक, वाघांसाठी राखीव असलेल्या अभयारण्याला भेट देताना अन दुखी कष्टी मनाने परत
येताना दिसतात. मुळातच कमी झालेल्या वाघांच्या संख्येमुळे, पाच-पाच सहा-सहा दिवस जंगलात
काढून सुद्धा वाघांचं मुख दर्शन दुर्लभ झालं. आणि हे दर्शन आता तर आपल्या नशिबावर अवलंबून
राहू लागलं. त्याला आपल्या पाप-पुण्याच्या
दुर्दैवी किनारीची झालर लागली. अगदी
पाचशे-हजार फुटावरून जरी वाघ बघायला मिळाला तरी हर्षोल्लित होऊन भगवंताचे आभार मानताना कैक लोकांना
पाहिले आम्ही. कुटुंबाच्या-कुटुंबं आपल्या लहानग्यांना घेवून जंगल सफाऱ्या करताना दिसतात. कारण नामशेष
होता चाललेला हा वन्य प्राणी भविष्यात कधी पाहायला मिळणार की नाही ह्या शंकेनं ! अशा विचारांच्या गर्तेत आमचा प्रवास संपून रेस्ट हाउस वर पोहोचलो
तरी मन मात्र उद्विग्न झाले होते.
एक प्रकारच्या चिंतेनं मन ग्रासलं
होतं. ‘उत्तरोत्तर जंगलांचा होत असलेला ऱ्हास आणि वन्य प्राण्यांच्या संवर्धन अन सुरक्षिततेची
होत असलेली हेळसांड... एकीकडे भरमसाठ वेगाने वाढत असलेला लोकसंख्येचा भस्मासूर अन दुसरीकडे
रोडावत चाललेली वन्य प्राण्यांची संख्या…’ जंगले...वन्यप्राणी...निसर्ग समतोल...संवर्धन...सुरक्षा...ह्यावर
खरोखरच काही कठोर उपाय योजना होईल का ? या प्रश्नाने माझं मन कुरतडलं जात होतं. एक मात्र खरं, ह्या सामाजिक जबाबदारीला प्रत्येकाने आपले प्रथम कर्तव्य
समजून या उपाय योजनेच्या मोहिमेत सहभागी झाले
तर आणि तरच उद्याच्या पिढीला वन्य जीवांच्या
जीवनाचा आनंद लुटता येईल.
आमच्या छायाचित्रणाच्या भ्रमंतीत,
वन्य प्राण्यांच्या सहज सुलभ दर्शनाचा, त्यांच्या अस्तित्वाचा, पाहिजे तसा आनंद लुटण्याचे
अहो भाग्य जरी आमच्या वाट्याला आले नाही, तरी भविष्यात ते जरूर येईल...आज जंगला जंगलामध्ये
अस्तित्वात असलेल्या परिस्थितीत अमुलाग्र बदल होवून, वन्य प्राण्यांची शेकड्यात असलेली
संख्या लाखात जाईल, केवळ याच आशेचा लामण दिवा डोळ्यासमोर ठेवून आम्ही परतीच्या प्रवासाला
लागलो…



No comments:
Post a Comment