बदामी-चालुक्य…
जानेवारी महिन्यात बदामीला जाण्याचा योग आला. निमित्त होतं बदामी-चालुक्य उत्सव! खरं तर, उत्सव हे फक्त
निमित्त. पण खरा हेतू होता तो फोटोग्राफी…
फेसबुकवर कन्नड भाषेत काहीतरी पोस्ट होतं. त्यातले “बदामी-चालुक्य
फेस्टिवल” हे इंग्लिश शब्द वाचले अन माझी बदामी-चालुक्य उत्सवाबद्दलची उत्सुकता वाढली. बस्स, तोच धागा हातात आला अन शोध सुरु… राज्य… जिल्हा…
तालुका… शहर… गाव… कार्यक्रम निश्चित. मुंबई-बेळगाव-बागलकोट-बदामी.
सारा प्रवास रस्त्यानेच. मुंबईहून रात्री बसमध्ये
बसल्यानंतर आम्ही दुसऱ्यादिवशी दुपारी बदामी शहरात पोहोचलो. जानेवारीचा महिना असल्याने
थंडीचे वातावरण. त्यामुळे सगळा प्रवास खूप
आनंदात झाला.
बगलकोटवरून सुमारे अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले बदामी शहर आम्हाला
भर दुपारच्या वेळीही अनाहूतपणे आकर्षित करत होते. ‘बदामी’ बद्दल जी उत्सुकता होती,
त्याच वेगाने कर्नाटक राज्याबद्दल माहिती मिळत गेली… दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक
असलेले आत्ताचं कर्नाटक राज्य, १९५६ साली ‘मैसूर’ राज्य म्हणून स्थापन झालं; ज्याला
१९७३ साली ‘कर्नाटक’ हे बिरुद लागलं गेलं. कर्नाटक राज्याच्या इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात
जशी अनेक शक्तिशाली साम्राज्य होऊन गेली तशी शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्वज्ञान, साहित्य
याची अनमोल परंपरा भारताला मिळाली. बौद्ध काळातील कर्नाटकावरील मगध साम्राज्यानंतर
मौर्य साम्राज्य. तद्नंतर जुन्नरच्या सातवाहनांचं राज्य… सातवाहनांनंतर कर्नाटकात स्थानिक
राज्यकर्त्यांच्या उदयाबरोबर ‘कदंब व पश्चिमी गंगा’ राज्यांचा उदय… ह्या राज्यांनंतर
बदामी येथील चालुक्यांचे राज्य… त्या राज्याची राजधानी अन आज बागलकोट जिल्ह्य़ातील एक तालुक्याचे ठिकाण… बदामी.
दुपारच्या विश्रांतीनंतर आणखी थोडी माहिती
गोळा करत गंतव्य स्थानापर्यंत जाण्यासाठी वाहतूक व्यवथा जाणून घेतली. नेहमीप्रमाणे
तयारी केली अन आमचं प्रस्थान बदामीच्या सुप्रसिध्द लेण्यांच्या दिशेने…
बदामीचे प्रमुख आकर्षण म्हणजे पाचव्या शतकात निर्मिती झालेल्या
लेणी. बदामीतील लेण्यांची रचना मात्र अगदी सोप्या पद्धतीची आहे. सर्वच लेण्यांवर उत्तर व दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव असलेला जाणवतो. अजस्त्र पाषाण एकमेकांच्या सोबतीने जमिनीत अगदी घट्ट पाय रोऊन
उभे… लालसर रंगाच्या वाळूखडकातील लेण्या, उभ्या डोंगरात कोरलेल्या असल्याने, त्यांची
खोली मात्र फारच कमी आढळून येते. एकूण चार लेण्यांमधील पहिली लेणी भगवान शिव, दुसरी
आणि तिसरी भगवान विष्णू तर चौथ्या लेण्यात जैन मंदिर कोरलेले असून तेथे तीर्थकार
आदिनाथांची मूर्ती आहे. या लेण्याची निर्मिती १२ व्या शतकात झाली असावी. लेण्यांच्या
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस कोरीव मुर्त्या… विशाल प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, मंडपात वेगवेगळ्या आकारात दिमाखानं उभ्या असलेल्या खांबावरील
कोरीव काम हे विविध शिल्पकलेचे उत्तम उदाहरणच!
ह्या लेण्यांच्या, डोंगर-खडक पायथ्याशी विस्तीर्ण तलाव. पायथ्याच्या विरुध्द, दोन्ही बाजूला तलावात उतरण्यासाठी सुसज्ज पायऱ्यां. तलावाला लागुनच पूर्व दिशेला, सुंदर शिवमंदिर की ज्याला भूतनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. त्यातील १८ हातांची शिवाची भव्य मूर्ती, पर्यटकांचे आणि भाविकांचे लक्ष वेधून घेते. ह्या मंदिरामुळेच तलावाला भूतनाथ किंवा अगस्त्यातीर्थ हे नाव रूढ झाले असावे. याशिवाय ११ व्या शतकात उभारणी झालेल्या मल्लिकार्जुन मंदिराबरोबरच दत्तात्रय मंदिरही पाहण्यासारखे आहे. बदामीचं
ते शिल्पसौंदर्य मनात आणि कॅमेऱ्यात घट्ट साठवत माझा तो दिवस व्यतीत झाला…
बदामीपासून अवघ्या पाच-सहा कि.मी. अंतरावर असलेल्या चोलाचिगुड येथील
पुरातन बनशंकरी मंदिर खुपच प्रसिद्ध आहे. बनशंकरी किंवा शाकंबरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या
मंदिरात काळ्या पाषाणात कोरलेली पार्वतीची पुरातन मूर्ती आहे. दाक्षिणात्य मंदिरशैलीत
उभारलेल्या या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आला असून सध्याच्या मंदिराची
उभारणी सतराव्या शतकात झाली आहे. देवीच्या उत्सवाला लाखो भाविक अनवाणी पायाने अन भक्ती
भावनेने हजेरी लावताना दिसतात…
चालुक्यन शैलीतील सुप्रसिध्द संरचनात्मक मंदिरांच्या कलाकृतींनी
आम्हाला दुसऱ्या दिवसासाठी आकर्षित केलं होतं. आमचं कुतूहल जागं झालं… बदामी पासून
२२ किलोमीटरवर मलप्रभा नदीच्या किनारी विस्तीर्ण प्रांगणात उभ्या असलेल्या सलग दहा
मंदिरांचा समूह पाहण्याचा योग, म्हणजे त्या दौऱ्यात मिळालेला एक नाविन्यपूर्ण अनुभव
होता… दक्षिण भारतातील कर्नाटकाचा राजवंश असलेल्या चालुक्य राजाचा राज्याभिषेक ज्या
पवित्र स्थानी पार पडला ते ठिकाण म्हणजेच–पट्टडकल…
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सोनेरी प्रकाशात आम्ही पट्टडकल येथे पोहोचलो.
भारतीय पुरातत्व विभागाच्या सोपस्कारानुसार तिकिटे खरेदी करून आम्ही त्या संकुलात प्रवेश
केला. संकुलात प्रवेश केल्या केल्या दुतर्फा
तीन-चारशे मीटर लांबीच्या हिरव्यागार गालिच्याने आच्छादलेला परिसर नजरेत भरतो. त्याच
विस्तीर्ण प्रांगणावर सातव्या ते नवव्या शतकाच्या दरम्यान उभारल्या गेलेल्या दहा मंदिरांमध्ये,
भारतीय विविध संरचनेच्या शैलीतील छोट्या पवित्र जागा आणि खांबांची चौकोनी बैठक यांचा
संगम आढळून येतो. या संकुलातील चार मंदिरे चालुक्य द्रविडीयन शैलीतील, चार मंदिरे उत्तर
भारतीय नागरा शैलीतील तर पापनाथ मंदिर हे मिश्र शैलीतील असल्याचे प्रकर्षाने आढळून
येते. ह्या मंदिरांच्या समूहाचे खास वैशिष्ट्य
म्हणजे- नऊ मंदिरे ही भगवान शिव तर एक जैन बसदीची आहेत. त्यामध्ये विरुपक्ष, सगमेश्वर,
चंद्रशेखर, मल्लिकार्जुन, काशीविश्वनाथ, गाल्गनाथ, काडशिद्धेश्वर आणि जामुलींगेश्वर,
जैन नारायण आणि पापनाथ मंदिरांचा समावेश आहे. ह्या मुख्य मंदिरांव्यतिरिक्त भगवान शिवाची
कित्येक लहान पवित्र मंदिरे पट्टडकल परिसरात पहावयास मिळतात.
तो परिसर आम्ही सकाळच्या
अन संध्याकाळच्या प्रकाशात, उघड्या डोळ्यांबरोबरच आमच्याकडच्या कॅमेऱ्यांनी न्याहाळत
होतो… विविधांगांनी त्या संरचनेच्या श्रीमंतीचा आस्वाद घेत होतो…
आम्हाला अप्रूप वाटत होतं ते… हिरव्या गालिच्यावर
एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या फिकट लालसर रंगातील त्या मंदिरांवरचं कोरीव काम, त्यांची
रचना, बांधकामाची पद्धत अन शैलीचं. आणि म्हणूनच हजारो पर्यटक बांधवांचं ते आकर्षणाचं
केंद्रस्थळ बनलं आहे. त्या काळातल्या कारागिरांचं कौतुक करता करताच आमचा दुसरा दिवस,
दिवसभराच्या प्रवासाने थकून-भागून पश्चिमिकडे कलणाऱ्या सुर्यासोबतच मावळला…
ज्या कुतूहलाने आणि एकाग्रतेने गेले दोन दिवस आमचे छायाचित्रण चालू
होते, त्याच उत्कंठतेने आम्ही ऐहोळला सकाळी सकाळी पोहोचलो. बदामी पासून ३४ किमी आणि पट्टडकल पासून १३ किमीवर मलप्रभा नदीच्या किनारी वसलेले ऐहोळ…
हे कर्नाटकच्या कलेच्या इतिहासात एक विशेष उल्लेखनीय ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. पूर्व
आणि उत्तर चालुक्य काळातील विविध शैलीतील, बावीस गटात विभागलेल्या एकशेपंचवीस महत्वपूर्ण
मंदिरांचे गाव म्हणूनही ते प्रसिध्द आहे…
ह्या मंदिर संकुलातील आकर्षणाचे केंद्र आहे ते- दुर्गा मंदिर. हे मंदिर चालुक्यन काळातील अद्वितीय आणि भव्य मंदिर
म्हणून समजले जाते. पाचव्या ते आठव्या शतकात बांधलेल्या ह्या मंदिरावर द्राविडी संरचनेचे
प्राबल्य असून काही ठिकाणी नागरा शैलीचा सुद्धा वापर केलेला दिसून येतो. ह्या मंदिराचा मागचा भाग हा, योजनेतील अर्धवर्तुळ आकाराचा असल्याने तो
भारतीय पारंपारिक संरचनेतील गजप्रस्थ नावाने ओळखला जातो. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या सभोवतालचा भाग हा चौकोनी खांबांनी आधारस्थ आहे;
तर आतल्या भिंतींवर विवीध देव-देवतांच्या मूर्तींचे कोरीव काम हे मंत्रमुग्ध करुन टाकणारे
आहे. ह्या मंदिराचे नाव जरी दुर्गा असे असले,
तरी ते दुर्गा देवीला समर्पित नसून सूर्य देवाला समर्पित केलेले आहे. दुर्गा किल्ल्यावरून
ह्या मंदिराला “दुर्गा मंदिर” हे नाव रूढ झाले
आहे. ऐहोळ मधली काही मंदिरे उदा. लाडखान मंदिर,
मल्लिकार्जुन मंदिर संकुल, हुच्चीमल्ली मंदिर संकुल, रावणफडी रॉक-कट मंदिर, जैन मंदिर,
रामलिंगेश्वर मंदिर संकुल, गल्गनाथ मंदिर संकुल
इ. पहाण्यासारखी आहेत. अन ती चालुक्यन संस्कृतीची ओळख पटवून देतात…
कर्नाटक राज्याच्या ‘बदामी-पट्टडकल-ऐहोळ’ ह्या भूमीवर, चाल्युकन
संस्कृती व त्यातील कला ह्यांचा उत्तम संगम आम्हाला पाहायला मिळाला. सांस्कृतिक परंपरेचा
मिळालेला आस्वाद अन बदामीच्या त्या पवित्र वातावरणातील आमचं अविस्मरणीय वास्तव्य, आम्हाला
परतीच्या प्रवास काळात पुन्हा पुन्हा आनंद देत होते अन पुढेही आयुष्यभर मनाला आनंद
देत राहणार ह्यात तिळमात्र शंका नाही… ह्याच सुखद आठवणींची मोsssठी शिदोरी घेऊन मी
नित्याच्या मायाजालात परतलो…
----x----
दिनांक- 21-02-2014
[This Aarticle published in PRAHAR newspaper dtd 30-3-2014- http://epaper.prahaar.in/detail.php?cords=10,88,1472,1328&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/30032014/Mumbai/Suppl/Page8.jpg ]





No comments:
Post a Comment