Wednesday, June 18, 2014

संदकफू–गुर्डूम

                  संदकफू–गुर्डूम

‘सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्तां हमारा…’ आपल्या भारतभूमीबद्दल किती समर्पक शब्द आहेत हे. आसेतुहिमाचल जरी भ्रमंती केली, तरी भारत देशाचं विलोभनीय चित्रंच जिकडे तिकडे पाहायला मिळेल. विविध संस्कृती… विविध भाषा… विविध धर्म… विविध जाती… हे सारं गुण्यागोविंदानं एकत्र नांदत असल्याचं चित्रं देशाच्या कानाकोपऱ्यात दिसेल. भारताच्या पर्यटन क्षेत्रातील हेच प्रमुख आकर्षण आहे. म्हणूनच भारत देश परदेशी पर्यटकांचं आकर्षण बनलाय. हे सगळं जरी खरं असलं, तरी देशाचं खरं सौंदर्य, हिमालय आणि परिसरातच दडलंय ह्यात तिळमात्र शंका नाही. हे सौंदर्य अनुभवायचं असेल तर त्यासाठी भटकंती हवी. अशीच एक भटकंती संदकफूची…

भारताचा उत्तरपूर्व भाग म्हणजे सौंदर्याची खाणच जणू.  पश्चिम बंगालच्या उत्तरेला उंच उंच डोंगरांच्या चढ उतारावर, समुद्र सपाटीपासून २१३४ मीटर उंचीवर वसलेलं शहर… दार्जीलिंग… एक थंड हवेचे ठिकाण… हिवाळ्यात २ अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरणारा थंडीचा पारा सर्वसामान्यांसाठी मनोरंजनाची मेजवानीच…. स्वप्न पूर्ती…. त्याच बरोबर अशा तापमानातील ट्रेक म्हणजे एक प्रकारचा स्वर्ग असतो आणि अशी स्वर्गायात्रा करण्यासाठी 'राष्ट्रीय हिमालयन ट्रेकींग मोहीम' अंतर्गत ‘युथ होस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया’ चे सभासद बनून आपल्याला त्याचा मनमुराद आनंद लुटता येऊ शकतो. त्यातीलच एक ट्रेक… संदकफू-गुर्डूम…  
  
आम्ही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील तारीख निश्चित केली होती.  असोसिएशनच्या मार्गदर्शक सुचनेसुसार तो थंडीतला ट्रेक असल्यामुळे, शारीरिक हाल होणार नाहीत याची खबरदारी म्हणून गुलाबी नव्हे पण बोचऱ्या थंडीपासून दूर राहाण्यासाठी शॉपिंग मात्र जोरात चालू… अन तेही गटागटाने… आठवड्याला… एकेक जिन्नस आठवेल तसं…

आमचा प्रवास मुंबई-कोलकोता नंतर न्यू जलपायगुरी पर्यंत रेल्वेने नि त्यानंतरचा प्रवास मात्र रोडने होता. सामान्यपणे सर्वच गिर्यारोहक भ्रमंतीसाठी जंगल-दऱ्या-खोऱ्यांना जास्त पसंती देतात. मग ती कोणत्याही भूप्रदेशांतील असुदेत. पण मी मात्र त्याला अपवाद होतो. भ्रमंती आवडते… जंगले आवडतात… डोंगर चढाई मनमुराद आवडते… पण त्या चढाई दरम्यान घामाघूम झालेलं शरीर नि त्यामुळे आलेला थकवा मात्र नकोसा वाटतो… थंड प्रदेशतील ट्रेक जास्त प्रमाणात आवडतो. म्हणूनच त्या ट्रेकची निवड केली होती. त्याला दुसरंही कारण होतं… फोटोग्राफी… केवळ डोळ्यांनी पाहिलेला निसर्ग डोळ्यातच राहणार. फारतर अगदी तपशीलवार मध्ये कागदावर उतरणार. परंतु केवळ एका क्षणात त्या प्रदेशाची वस्तुस्थिती, त्याचं सौंदर्य डोळ्यांसमोर जसच्या तसं उभं करण्याचं काम फक्त फोटोग्राफच करू शकतो… त्याच्यातच ते सामर्थ्य आहे. त्याचीच परिणती माझा फोटोग्राफीचा छंद…

आम्ही ठरल्या वेळी न्यू जलपायगुरीला पोहोचलो. दार्जीलिंगच्या बेस कॅम्प इन्चार्जशी सतत संपर्कात  राहूनच आमचा प्रवास चालला होता. ज्या हॉटेल वर आम्ही उतरलो होतो तिथूनच आमचं प्रयाण दार्जीलिंगसाठी होणार होतं. त्या प्रवासात मात्र आम्हाला विघ्न आले… दार्जीलिंग शहरात कर्फ्यू होता कोणत्याही पर्यटकाला शहरात प्रवेश नव्हता. पूर्ण शहर शांत होतं. आम्हाला कळायला मार्ग नाही… आता करायचं काय.  रिपोर्टिंगच्या तारखेला आम्ही बेस कॅम्प मध्ये पाहिजेच होतो. परंतु कोणताही गाडीवाला दार्जीलिंगला यायला तयार नव्हता… त्या हॉटेल वर इतर ट्रेकर्स सुद्धा होते. आम्हाला थोडा धीर आला.  शेवटी फार विनंत्या आर्जवं झाल्यानंतर एक गाडी तयार झाली.  आम्ही आठ-दहाजण… एकाच गाडीने जायचं ठरलं. जीव मुठीत घेऊनच तो प्रवास… रात्री १२.४५ ला आम्ही हॉटेल वर पोहोचलो. टेन्शन्स संपली… जीव भांड्यात… शहरातला रात्रीचा थंडगार वारा अंगाला चांगलाच झोंबत होता. अगदी दारे खिडक्या बंद करूनही  दरवाजाच्या फटीतून येणारा थंड हवेचा झोत, आम्ही चार चार पांघरूणं अंगावर घेऊनसुद्धा,  आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता.. तरीही, प्रवासाचा थकवा आणि दंगलीच्या काळजीने आलेला मनाचा थकवा यामुळे तशा वातावरणातही आम्ही अगदी आरामात झोपी गेलो…

ती दार्जीलिंगची पहाट आमच्या अजुनही स्मरणात आहे. दोन दिवसानंतर आम्ही आंघोळीचा बेत केला. थंड पाण्याने तर आंघोळ करणं शक्य नव्हतं म्हणण्यापेक्षा अशक्य होतं. हॉटेल मालकाला विनंती करून सकाळी आंघोळीसाठी एक एक बादली गरम पाणी सांगितले. एका बादलीस दहा रुपये.  इलाज नव्हता. त्यात थंड पाणी मिसळणे अवघड होऊन बसले. त्या बादलीतल्या गरम पाण्यापेक्षा आम्हाला थंडीचा चटका एवढा बसत होता की केवळ दोन तीन मिनिटात आंघोळीचे सोपस्कार उरकणे भाग पडले. भल्या पहाटे उठून फोटोग्राफीच्या दृष्टीकोनातून त्या हॉटेलवरच्या जागेसाठी, आम्ही पहिलीच झाडी मारली होती  अंगावरच्या शाली-रजईसह. थंडीच्या त्या तीव्रतेत हाताच्या बोटांच्या झालेल्या बर्फाच्या कांड्यांनी टेरेस वर जाउन उघड्या जागी फोटो काढणे शक्य नव्हते.  हा शहाणपणा जाणून रूममधूनच मिळेल ते दुष्य कॅमेऱ्यात टिपायचं असा निर्धार केला. पाहटे उठून जेव्हा रूमची खिडकी उघडली तेव्हा झपकन आत शिरलेला  थंड हवेचा  झोत, नाकाचा शेंडा… कानाच्या पाळ्या बेशुद्ध करून गेला. हातात मोजे असल्याने बोटं शाबूत होती. त्याही परिस्थितीत आम्ही, त्या खोलीतून दूरवर असणाऱ्या परंतु नजरेच्या टप्प्यात दिसणाऱ्या कांचनगंगा शिखराचं नयनमनोहर  दृश्य कॅमेऱ्यात कायमचं साठविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो. शटर स्पीड, अपरचर, आयएसओ, ट्राईपॉड, लेन्सेस सगळ्यांचा आधार घेत कायमच्या   स्मरणात राहणाऱ्या काही फ्रेम्स आम्हाला मिळाल्या. हिमालयीन पर्वत रांगांमध्ये अगदी दिमाखात उभे असलेले कांचनगंगा शिखर, मागील निळसर-करड्या रंगाच्या आकाशात, सूर्याच्या पहिल्या किरणांच्या सोनेरी शिडकाव्यामध्ये खुलून दिसत होते. त्या तांबड्या पिवळ्या रंगात पहुडलेले ते बर्फाच्छादित शिखर पाहून डोळ्यांची पारणे फिटली… 

दुसऱ्या दिवशी ‘वायएचएआय’ चे सारे सोपस्कार आटोपून आम्ही, आमच्यानंतरच्या चमुंची सलामी अन शुभेच्छा घेत संदकफूच्या दिशेने कूच केले… एक उत्साही वातावरण… आनंदी मूड… आमच्या चाळीस जणांच्या विचारांची, थोडी का होईना एकमेकांत देवाणघेवाण झाली होती. -५ ते -७ अंश सेल्सिअसच्या थंडीच्या वातावरणाला तोंड देण्यासाठी प्रत्येकाची जय्यत तयारी. सगळ्यांच्या sack कपड्यांनी अन  आमच्या sack मात्र, कपडे आणि कॅमेऱ्यांनी भरल्या होत्या…

आम्ही जीपने धोत्री गावात पोहोचलो.  तिथूनच नाष्टा घेऊन भटकंती सुरु… धोत्रीपासून ७ किमीवर २९०० मीटर वर वसलेले तुमलिंग… सकाळी दहा वाजता सुरु केलेला प्रवास संध्याकाळी ४ वाजता संपायलाच हवा. फोटोग्राफर, आपल्या हातातली वेळ फोटोग्राफी करायची सोडून इतरत्र व्यतीत करेल असं कधीच होत नाही. केवळ ह्याच कारणामुळे, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत, नेमून दिलेल्या वेळेपेक्षा आम्ही तुमलिंग कॅम्पवर उशिरा पोहोचलो. खरंतर तुमलिंगच्या टापूत आम्ही पोहोचलोही होतो; पण हिमालयीन निसर्ग… तिथले वातावरण… आम्हाला नवीन होते. संध्याकाळची सोनेरी उन्हं, दऱ्या खोऱ्यातून उन सावलीचा खेळ खेळत होती. मध्येच पांढऱ्या शुभ्र ढगांनी आच्छादलेला तो डोंगरपरिसर मनाला अन कॅमेऱ्याला भूरळ घालत होता. मग साहजिकच आमचे पाय त्याच ठिकाणी रोवून बसले. प्रत्यक्षात कधीही न पाहिलेले देखावे आम्ही कॅमेऱ्यात टिपत होतो.

जसजसा सूर्य पाशिमिकडे कलत होता, तसतसा हवेतील गारवा वाढत चालला होता. तुमलिंग टापूतील ज्या ठिकाणी आम्ही उभे होतो तेथून फक्त पाचशे मीटर अंतर कापायला आम्हाला अर्धा तास लागला होता. त्यातच पूर्ण परिसर अंधारून गेला. एव्हाना कॅम्पवरील वेलकम ड्रींकबरोबर वातावरणही गरम झालं होतं. ज्या लोकांना फोटोग्राफीची आवडच नव्हती किंवा ज्यांना आमच्या उशिरा पोहोचण्याने वेलकम ड्रिंक उशिरा मिळाल्याची भावना झाली, त्यांनी मात्र चांगलंच तोंडसुख घेतलं. पण कॅम्प लीडरच्या मध्यस्थीने सगळं स्थिरस्थावर झालं.

तुमलींग ते कालीपोखरी हा प्रवास फारच सुखद वाटला. कधी शुभ्र तर कधी राखाडी रंगांच्या ढगांनी व्यापून टाकलेलं आकाश, परिसराच्या सौंदर्यात अधिकच भर टाकत होते. वादळ वाऱ्यापासून आपला बचाव करण्यासाठी, चिमुकली घरं डोंगराच्या आडोशाला लपून बसल्यासारखी दिसत होती. या प्रवासात संरक्षित जंगल असल्याने, प्रथमच वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता असते.  पुढचा सर्व प्रवास भारत-नेपाळ सीमारेषेवरून, तर काही वेळा नेपाळच्या हद्दीतून करावा लागतो. याच सीमारेषेवरील भारतीय जवानांची छावणी पहिली अन मन हेलावून गेलं… आपल्या घरापासून… कुटुंबापासून दूर अशा खडतर परिस्थितीत ते जवान करीत असलेली देशसेवा पाहून मन प्रसन्न झाले. उर अभिमानाने भरून आला. नकळत त्यांच्या बद्दल कौतुकाचे शब्द मुखातून बाहेर आले. त्यांच्या देशसेवेबद्दलच्या, कानावर पडलेल्या…  वाचलेल्या विविध कथा-घटनांना आपापसात चर्चेचे स्वरूप आले. याच चर्चेच्या उत्साही वातावरणात पुढची असह्य चढण केव्हा पार झाली हे मात्र लक्षात आलं नाही.

कडाक्याची थंडी… अंगात दोन दोन स्वेटर… कानाला माकड टोपी… पायात लेगिन्स… मोजे… चेहऱ्याला सन क्रीम… किती ते… एवढं असूनसुद्धा थंडीने बेहाल… त्या नवीन हवामानाची शरीराला सवय होणे आवश्यक असल्याने, कॅम्पवर पोहोचल्यावर नियमानुसार अंथरुणात घुसायचं नाही… अन्यथा जीवाला धोका… हे अवगत असूनही आम्ही कालीपोखरीला रूममध्ये सामान टाकलं आणि अंगावर रजई घेऊन चक्क अंथरुणात गुडूप… त्या उबेने दोन मिनिटात निद्राधीन… जेवनाच्या  वेळेस शोधाशोध… ह्याही वेळेस आमच्या नावाची बोंबाबोंब. कारण त्या ग्रुपमधून गायब होणारे आम्हीच दीडशहाणे फोटोग्राफर.

 आम्हाला असह्य होणाऱ्या थंडीमुळे अन आमच्या कॅमेरासेल रक्षणामुळे, जेवणाच्या वेळेआधीच आम्ही किचनमध्ये प्रवेश मिळवायचो. पण आज आम्हाला थोडा उशीर झाला होता. आम्ही जेवण घेत घेतच  किचनमध्ये गप्पा मारत उभे होतो. इथेही आम्ही शेवटी राहिलो. दरम्यान त्या हॉटेलच्या लोकांशी गप्पा सुरु झाल्या… ‘दार्जीलिंग शहरापासून जवळपास ६२ ते ७० किमीवरील कालीपोखरी-संद्कफु. डोंगराळ भागातून सर्व अत्यावश्यक जिन्नस घेऊन वर यायचं म्हणजे तारेवरची कसरत. शिवाय हे सर्व अंगाखांद्यावरून पायी चालत आणलं तरच परवडणारे. वाहतूक व्यवस्था सहज उपलब्ध नसल्याने आणि खर्चिक असल्याने ते शक्यही नाही. इकडे पर्यटकांची तशी वर्दळ फार नसते. ट्रेकर्स काही आले तरंच. त्यामुळे आम्हाला आधार तो फक्त युथ होस्टेल्सचाच.’ हे बोलत असताना त्यांचा सूर जरा वेगळा वाटला. त्याला व्यथेचा गंध होता. तेही खरंच होतं… एवढी मोठी गुंतवणूक करायची… रोज कष्ट उपसायचे… तर त्याची परतफेड व्हायला हवी ना. सारं आयुष्य असं डोंगराळ प्रदेशात काढायचं… निव्वळ कष्ट… मौज-मजा, सुंदर स्वप्न असं काही नाही… त्यात ऋतुमान हे असे… त्यामुळे ठराविक ऋतूतच ट्रेकर्स, पर्यटक येतात. नंतरचा काळ उद्योगाविनाच.  ह्या काळात जे काही कमावलं असेल तेच वर्षभर पुरवून खायचं. ‘युथ होस्टेल्स कडून जी रक्कम ठरवली जाईल तीच मिळणार आणि त्यावर समाधान मानायचं. पण जी रक्कम मिळते ती फार तुटपुंजी असते त्यात हा सर्व खर्च करून उरत मात्र काहीच नाही. मुलाचं शिक्षण… त्यांचं भविष्य… त्याचं जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतरगोष्टीं… हे सारं काही करता येत नाही. त्यामुळे पिढ्यानपिढ्या उत्पन्नाचं साधन अशाच प्रकारचं… पूर्णपणे जंगलावर आधारित… त्यासाठी ती रक्कम वाढवून मिळायला हवी हीच आमची रास्त इच्छा अन मागणी आहे' असं ते अगदी कळकळीने सांगत होते आम्हाला. त्यांच्या व्यथेवर काही उपाय निघतोय का ते पाहत होते. आम्ही काय करणार होतो. इतरांसारखे आम्हीही ट्रेकर्स होतो; फक्त युथ होस्टेल कडून आलेलो इतकंच काय ते…

असं म्हणतात… खूप आनंद झाला की  'आकाश ठेंगणे होते'.  मला त्या रात्री आकाश ठेंगणे  झाल्याचं प्रत्यक्ष पाहायला मिळालं. रात्री १२ च्या सुमारास एकटाच बाहेर आलो होतो. कडाक्याची बोचरी थंडी… त्यातच लघुशंका उरकून घेतली. नजर आकाशाकडे गेली… निरभ्र आकाशात टपोऱ्या चांदण्या… बालपणी अंगणातून आकाश पाहायचो… त्यातल्या चांदण्या खूप छोट्या दिसायच्या… ह्या टपोऱ्या चांदण्या धरतीवर स्वछ… शीतल प्रकाश पेरत होत्या. खूप जवळ वाटत होत्या त्या. प्रत्यक्षात असा आकार पाहून, बाजूलाच असलेल्या टेकडीवर जाऊन त्यांना पकडण्याचा मोह झाला. जंगलातील श्वापदं… खोल  दऱ्या… सगळं काही  विसरलो होतो. एकटक ते सौंदर्य न्याहाळत होतो. ते चांदणं पिऊन घेत होतो. पण क्षणात भानावर आलो. शांत उघड्या वातावरणातील थंडीच्या गार लाटेने पूर्ण  शरीर थंड पडल्याचं जाणवलं. क्षणाचीही उसंत न घेता,  उबेसाठी रुममध्ये जाऊन अंथरुणात शिरलो…

 तो ट्रेकचा तिसरा दिवस होता.  आमच्या स्वप्नपूर्तीचा दिवस.  सकाळी लवकर उठून नाष्टा घेतला. संदकफू समोर होतं आमच्या… अगदी नजरेच्या टप्यात… सर्व  तयारी करून मार्गस्थ. समुद्र सपाटीपासून ३६३६ मीटर उंचीवरचं ठिकाण… -५ ते -७ अंश सेल्सिअस तापमान. दिसायला नजरेच्या टप्प्यात असलेलं संदकफू, पण  चढाई  करता करता नाकी नऊ  आले. तब्बल सहा- सात तास चालत होतो. जंगल, डोंगर दऱ्या, खोरी… ह्या सगळ्याचा त्या सुखद वातावरणातून भटकंती करताना आनंद घेत होतो. एवढ्या उंचीवरचा ट्रेक आम्ही पहिल्यांदाच करत होतो. मुंबईतील धकाधकीच्या जीवनात दैनंदिन कामे उरकायलाच दिवस पुरत नाही तर रोज मॉर्निंग वॉक कुठून होणार ? अर्थात केवळ त्यामुळेच शरीर थकून जात होतं. पाहटे-सकाळी-दुपारी अन रात्री मनाची उभारी साथ देत होती; पण शरीर मात्र थकत होतं…
तो संदकफूच्या प्रवासातील शेवटचा टप्पा… मोठी चढण होती. आता खरी, आमच्या शरीराची परीक्षा सुरु होती. हाकेच्या अंतरावर दिसणारं संदकफू… पण प्रवास मात्र काही केल्या संपत नव्हता.  चार चार पाऊलांवर पाच पाच मिनिटांसाठी थांबावं लागत होतं. ‘धूर निघणे’ कशास म्हणतात ते तेव्हा जाणवत होतं. पाठीवर  हीss भली मोठी sack , पोटावर कॅमेरा बॅग, एका हातात ट्राईपॉड, दुसऱ्या  हातात प्लास्टिकची थैली… बेसकॅम्पवरून निघताना फार रुबाबदार वाटत होतं. अशाच प्रकारच्या पेहाराव्यामध्ये आपण कसे दिसतो ही उत्सुकता म्हणून, प्रत्येकजण आपली छबी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आपापल्या मित्रांना लडीवाळपणे सांगत होते. आम्हालाही तसा मोह आवरला नाही. कालीपोखरीहून निघल्यावर छानशा वळणावर आम्हीही अशाप्रकारचे आमचे फोटो खाढून घेतले…

 आयुष्याच्या अशाच वळणावर घडलेल्या घटना… प्रसंग… आठवणी बनून जीवनभर साथ देत असतात. सामान्यपणे जीवनांत बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडत असतात… त्या  करायलाही मिळतात… पण अशा गोष्टींचा पुन्हा पुन्हा आनंद घ्यायला त्या मिळतातच असं नाही… काही वेळा भौतिक कारणास्तव ते शक्य नसतं… काही वेळेस काळाच्या ओघात ते शक्य नसतं… अशावेळेस तोच आनंद, आपण वर्तमान जगात असताना, भूतकाळात प्रवास करून मिळवितो… आठवणींच्या स्वरुपात.  आपल्याला मिळालेली निसर्गाची देणगी… स्मरणशक्ती… तिच्या सहाय्याने तो आनंद आपण स्वतः घेऊ शकतो. फारतर तो शब्दांनी वाटून घेतो. पण तोच फोटोग्राफ असेल तर? तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवता येतो… शब्दाविना…  जसाच्या तसा… आणि हीच अनिमिक इच्छा असते प्रत्येकाची…

ती चढण चढायला शरीराला फार कष्ट पडत होते.  विश्रांतीचेही नियम… चढण चढताना कितीही थकवा आला तर खाली बसायचं नाही. विसावा उभा राहूनच. त्यामुळे त्या थंड वातावरणातही दम लागल्याने तोंड उघडे… आणि तोंड उघडे म्हणून वाफा बाहेर… उंच वातावरणात प्राणवायूची कमतरता येऊ नये म्हणून पाणी भरपूर प्यायचं अन ते तोंडावाटे वाफेच्या स्वरुपात बाहेर टाकायचं. हेच काम चालू होतं आमचं.  एक उत्सुकता होती… उल्हास होता… आवड होती… जिद्द होती…  या साऱ्यामुळे शरीराची थकान निघून जात होती.
दुपारचे साडेतीन वाजत आले होते. पण भौगोलिक रचनेनुसार सूर्य मावळतीच्या दिशेने कलू लागला होता. आम्हाला आता खूप घाई झाली. सूर्यास्तापूर्वी कांचनगंगा शिखराचं दर्शन व्हायला हवं होतं. नेटाने आम्ही चढाई सुरु केली.  दहा मिनिटात आम्ही संदकफूच्या छोटेखानी पठारावर पोहोचलो. एक विलक्षण आकर्षण… विलक्षण समाधान… शाळेच्या अभ्यासक्रमातील पुस्तकातून वाचलेले कांचनगंगा शिखर आज ‘हेचि देही हेचि डोळा’ पाहायला मिळणार होते. ह्यामुळे हर्शोल्लीत झालेलो आम्ही, नेहमी प्रमाणे aclamiatise साठी बादल्या घेऊन पाणी आणायला न जाता, कॅमेरा घेऊन हॉटेल बाहेर पडलो. दोन्ही उद्देश साध्य होत होते…

निळ्याभोर आकाशात, एखाद्या चित्रकाराच्या फराट्यासारखे पांढरे शुभ्र ढग त्या शिखाराभोवती वेढा   टाकून घुटमळताना दिसत होते. शांत… धीरगंभीरपणे… ऐटीत, दिमाखानं उभं असलेले कांचनगंगा शिखर… त्यावर गोठलेल्या हिमनगाच्या गर्तेतुनही स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देते…  त्याचं सामर्थ्य,  जिद्द पाहून ते आपल्या अंगी का उतरत नाही? याची चिंतनवजा हुरहूर मनाला लागून राहते.  कांचनगंगा शिखाराबरोबर इतर हिमालयीन रांगांचा थाटही आपल्या डोळ्यात भरून राहतो. संदकफू म्हणजे ट्रेकर्सचं नंदनवन. स्वर्गच. ह्याच ठिकाणावरूनच, कितीतरी महाकाय हिमालयीन रांगांमध्ये एका कुटुंबातील सदस्यासारखे  मांडीला मांडी लावून बसलेली-माउंट एवरेस्ट, कांचनगंगा, लोथसे , नुप्त्से,  मकालू, जानू , पम्डीम,  चोमोल होरी आणि अरुणाचल प्रदेशापर्यंतची कितीतरी शिखरे  आपल्या दृष्टीस पडतात.   

संदकफू हे ह्या ट्रेकचं अत्युच्च टोक. त्या ठिकाणी एक हॉटेल आणि भारतीय जवानांची छावणी सोडली तर काहीही नाही. मनुष्य वस्ती नाहीच. ह्या भ्रमंती मध्ये संदकफूला फक्त एक रात्र आणि एक सकाळ एवढाच कालावधी. त्यामुळे संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात विविध कोनातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून जेवढ्या प्रतिमा मिळतील त्या आम्ही नजरेत आणि कॅमेऱ्यात साठवत गेलो. रात्रीच्या जेवनानंतरचा आमचा  वेळ एकमेकांच्या कॅमेऱ्यातील फोटो पाहण्यात आणि त्यावर कॉमेंट्स करण्यात व्यतीत  झाला. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचं सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न करत होता. आपलं फोटोग्राफिक कौशल्य पणाला लावत होता. त्यामुळे साहजिकच आमच्या प्रत्येकाच्या इमेजेस वेगवेगळ्या होत्या. संध्याकालीन सौंदर्य पाहता पाहताच अंगावर सगळी पांघरूनं लपेटूनच बाजुच्यांची पर्वा न करता, संगीताचा मनमुराद आनंद लुटत झोपी गेलो…
 पहाटे ४ वाजताचे अलार्म लावूनच झोपी गेलेलो. पण त्या अगोदरच सगळे तयार. अंगावर शाल… हातात मोजे… कानाला टोपी… सगळं तसंच… म्हणजे अंथरुणातून उठून थेट कॅमेरा गळ्यात अडकवून आम्ही बाहेर पडलो. पायातही दोनदोन मोज्यांवर बूट होते. हॉटेल समोरच्या हौदातील पाण्याचा बर्फ झाला होता. तापमान उणे २ अंश सेल्सिअस होते. अगोदरच्या रात्री फिरून पाहिलेला परिसर, सकाळच्या शूटिंग साठी कितपत योग्य आहे ह्याची खातरजमा करून आम्ही निघालो. उगवत्या सूर्याच्या कोमल किरणाची सोनेरी झालर त्या शिखरांवर सोनसाखळी सारखी वाटत होती.

प्रत्येक माणूस जे जे काही डोळ्यांनी पाहणार, त्याचा पुन्हा पुन्हा आनंद घेण्यासाठी, ते डोळ्यात किती साठवणार ? आणि म्हणूनच, तो निसर्ग… त्याची किमया… त्याच्यात होणाऱ्या सप्तरंगांची उधळण… हे सारं काही कॅमेऱ्यातही साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पाहिलेला निसर्ग… घेतलेला आस्वाद… अनुभवलेलं सानिध्य… हाच इतर गोष्टींपेक्षा अधिक मोलाचा साठा घेऊन तो संसार रुपी मायाजालात परतत असतो…

संदकफूचा निरोप घेण्याची वेळ समीप आली. सकाळचा नाष्टा केला… सामान उचललं… हॉटेल समोर एक ग्रुप फोटो घेतला… अन दोन्ही हात वर करून त्या जवानांना सलामी देत परतीच्या प्रवासासाठी डोंगर उतरु लागलो.

बराच वेळ डोंगर उतरणीवरून चालत जंगलातील रस्ता पादाक्रांत करत होतो. फक्त शरीर खाली उतरत होतं असं जाणवत होतं. परंतु मन मात्र तिथेच होतं… अजुनही त्या भ्रमंतीतून बाहेर आलेलं नव्हतं… हिमालयीन परिसर… तिथलं वातावरण… भौगोलिक परिस्थिती…  सौंदर्य… तिथलं जीवनमान… ह्या  सगळ्यात ते अडकलेलं होतं… मनीची इच्छापूर्ती झाल्याचं  समाधान होतं चेहऱ्यावर; पण त्याचबरोबर त्या डोंगर दऱ्या-खोऱ्यात आपलं आयुष्य वेचणाऱ्या कुटुंबाची, त्यांनी आमच्या समोर मांडलेली व्यथा मनाला पोखरून  काढत होती… एकीकडे भारत देशाला लाभलेलं वैविध्यपूर्ण… अतुलनीय असे सौंदर्य, तर दुसरीकडे कोणत्याही उच्च जीवनाचे स्वप्न न पाहता केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी… सामान्य आयुष्य जगण्यासाठी… धडपड करणारी… त्याच वातावरणात राहणारी सामान्य कुटुंबं… ही दरी मला, हिमालयीन पर्वत रांगांमधल्या असंख्य दऱ्या खोऱ्यांहूनही फाsssर मोठी वाटली…     
                                                              

दिनांक- 19-11-2013

[Article published in PRAHAR newspaper dtd.22/12/2013-
http://epaper.prahaar.in/detail.php?cords=16,88,1488,1434&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/22122013/Mumbai/Suppl/Page8.jpg  ]                                                       
                                                                                                                                                                       
         

  

No comments:

Post a Comment